अलिबाग : रायगडमध्ये घरगुती कोंबड्यांना बर्ड फ्लूची (Bird Flu) लागण झाली असून जिल्ह्यात आतापर्यत १ हजार कोंबड्यांची विल्हेवाट लावण्यात आली आहे. यामुळे जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे.
Bhandup Update : ट्रायडेंट पाठोपाठ भांडुपच्या मॉलमध्ये आढळला महिलेचा मृतदेह!
रायगड जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाल्याचे अहवालातुन समोर आले आहे. उरण तालुक्यातील चिरनेर गावात घरगुती कोंबड्यांना हि लागण झाली असून तसा अहवाल भोपाळच्या पशुरोग प्रयोग शाळेने दिला आहे. त्यामुळे आता जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून सतर्कता म्हणून उपाय योजना करण्यास सुरुवात केली आहे. खबरदारी म्हणून गावातील १ हजाराहून अधिक कोंबड्या तसेच अंड्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट देखील लावण्यात आली आहे.
तसेच परिसरातील चिकनची दुकान ९ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. पशुसंवर्धन, आरोग्य, महसूल, ग्रामविकास, पोलीस, वनविभाग, परिवहन इत्यादी विभागांच्या समन्वयाने बाधित क्षेत्रात कृती आराखड्याप्रमाणे कारवाई करण्यात येत आहे. सदर रोगस्थिती नियंत्रणात असून कुक्कुट व्यवसायिक व नागरिकांनी घाबरून न जाता सतर्कता बाळगण्याबाबत पशुसंवर्धन विभाग व जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.
दहा किमी परिसरात अलर्ट झोन
बर्ड फ्लूचा पुन्हा एकदा शिरकाव झाला आहे. यामुळे धोका वाढला असून अनेक ठिकाणी कोंबड्यांना लागण झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. तर बाधित क्षेत्रात नागरिकांच्या हालचाली पक्षी प्राण्यांच्या वाहतुकीला प्रतिबंध करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी येथील बाधित क्षेत्रापासून एक किलोमीटरपर्यंतचा परिसर बाधित क्षेत्र व एक ते दहा किलोमीटर पर्यंतचा परिसर सर्वेक्षण क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. बाधित क्षेत्रात कुक्कुट पक्षांचे सर्वेक्षण आणि वैद्यकीय नमुने संकलित केले जाणार आहेत. नागरिकांनी कसलीही भीती बाळगू नये असे आवाहन करण्यात येते आहे.