नाम निष्ठेने घ्यावे

अध्यात्म - ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज


नाम श्रद्धेने घेणे म्हणजे काय? तर आपल्या गुरूने किंवा ज्याच्याबद्दल आपली पूज्य भावना असते अशा व्यक्तीने, सांगितले म्हणून घेणे. अशा श्रद्धेने नाम घेणाऱ्याच्या मनात शंका येत नाही. ही स्थिती फार भाग्याची, पण तितकीच दुर्मीळ. निष्ठेने नाम घेणे म्हणजे शंकारहित नाम घेणे. शंका अनेक तऱ्हेच्या असतात. नाम घेताना भगवंताकडे लक्ष नसले तर त्या नामाचा उपयोग आहे की नाही, नाम घेताना बैठक कोणती असावी, दृष्टी कशी असावी, शुचिर्भूतपणेच नाम घ्यावे किंवा कसे, अशा तऱ्हेच्या अनेक शंका मनात येतात. थोडक्यात असे म्हणता येईल की, आपण जे नाम घेतो ते भगवंतापर्यंत पोहोचते की नाही, या एका शंकेत सर्व शंकांचा समावेश होतो. भगवंत आणि त्याचे नाम एकरूपच असल्याने त्या दोहोंच्या आड काहीच येऊ शकत नाही. एखाद्या व्यक्तीच्या पाठीमागून आपण चाललो असताना आपल्या तोंडून त्याचे नाव उच्चारले गेले तर तो लगेच मागे वळून बघतो. ही जर मनुष्याची स्थिती, तर भगवंताच्या बाबतीत त्याचे नाव त्याच्यापर्यंत पोहोचत नाही हे कसे शक्य आहे? खरे पाहिले तर भगवंताचे नाव त्याच्याच कृपेने आपल्या मुखात येते; म्हणजे त्याचे नाव तोच घेत असतो; मग नाम भगवंतापर्यंत पोहोचते की नाही या शंकेला वावच कोठे राहिला? समजा, दोन माणसे जेवायला बसली. त्यातल्या एकाच्या मनात काही विचार घोळत असून त्याचे जेवणाकडे लक्ष नव्हते, पण हाताने तोंडात एकेक घास घालण्याचे काम चालू होते. दुसरा इसम मात्र लक्षपूर्वक जेवण जेवत होता. दोघेही जेवून उठले. यात उपाशी कोण राहिला? दोघांचीही पोटं भरलीच ! तसे, नाम घेतल्यानंतर त्याचा उपयोग झाला नाही असे कसे होईल?



समजा, आपण परगावच्या एका अनोळखी इसमाला पत्र लिहून त्याला बोलविले; तो आला आणि त्याने सांगितले की, ‘तुम्ही ज्याला पत्र पाठविले तोच मी’, तर त्याच्या वचनावर विश्वास ठेवून आपण त्याला जवळ करतो. तसे, भगवंताने सांगितले आहे की, ‘जेथे माझे नाम तेथे मी पुरुषोत्तम’, तर मग या वचनावर विश्वास ठेऊन नाम घ्यावे आणि त्यातच त्याला पाहावे, असे का करता येऊ नये? हीच श्रद्धा. आपण ज्याचे पोटी जन्माला आलो त्याचेच नाव आपण आपल्या नावापुढे लावतो, तसे भगवंताच्या बाबतीत करावे. त्याच्याच नावाने जगावे; म्हणजे माझा सर्व कर्ता, रक्षिता, तो एकच असून, त्याच्याशिवाय माझे या जगात दुसरे कोणीही नाही, या भावनेने राहावे. असा जो भगवंताचा होतो, त्याचे महत्त्व भगवंत स्वत:पेक्षाही जास्त वाढवतो.


तात्पर्य : नामाने भगवंताची प्राप्ती होणार ही खात्री असावी. अशा नामालाच ‘निष्ठेचे नाम’ असे म्हणतात.

Comments
Add Comment

गुढीपाडवा का साजरा केला जातो? जाणून घ्या गुढीपाडव्याचे महत्त्व, पूजा विधी आणि परंपरा

मुंबई : महाराष्ट्रात गुढीपाडवा हा सण हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. साडेतीन

कधी आहे पापमोचनी एकादशी ? काय आहे या दिवसाचे महत्त्व ? कशी करावी या दिवशी पूजा ?

मुंबई : हिंदू पंचांगाप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षातील अकरावी तिथी म्हणजे एकादशी. हा दिवस

कधी आहे नृसिंह द्वादशी ? त्या दिवशी नेमके काय करावे ?

भगवान विष्णूचा चौथा अवतार म्हणजेच भगवान नृसिंह यांची द्वादशी ही यंदा शुक्रवार २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी दहा

संत कबीर

पंडित होय के आसन मारे पंडित होय के आसन मारे, लंबी माला जपत है। अंतर तेरे कपट करतनी, सो भी साहब लिखता है ।। - डॉ.

महर्षी याज्ञवल्क्य 

भारतीय ऋषी वैशंपायनांच्या आश्रमातून सांजसमयी बाहेर पडलेले याज्ञवल्क्य पूर्ण रात्रभर चालतच होते. अरुणोदयाच्या

सत्संग : अंतर्मुखतेकडून आत्मोन्नतीकडे

प्राची परचुरे वैद्य मानवी जीवन हे केवळ भौतिक गरजांच्या पूर्ततेपुरते मर्यादित नसून ते विचार, मूल्ये, भावना आणि