गुरुनाथ तेंडुलकर
महाभारतात एक कथा सांगितली आहे. एकदा भगवान श्रीकृष्णांनी धर्मराज आणि दुर्योधन दोघांना वेगवेगळ्या वेळी बोलावलं. दुर्योधन आला. श्रीकृष्ण म्हणाले, ‘कुरुवंशाच्या उन्नतीसाठी आपल्याला एक यज्ञ करायचा आहे. त्या यज्ञाच्या प्रसंगी यजमान म्हणून आम्ही तुला बसवणार आहोत. त्या यज्ञाच्या वेळी प्रमुख व्यक्ती म्हणून कुणातरी एखाद्या सत्शील आणि चारित्र्यसंपन्न माणसाची निवड करून त्याची पाद्यपूजा करावी लागते. त्याचे पाय यजमानानं धुवायचे अशी प्रथा आहे. तेव्हा असा एखादा सद्गुणी आणि निर्मळ मनाचा माणूस तू शोधून आण; म्हणजे आपल्याला यज्ञाची पुढील तयारी करता येईल.’
झालं, दुर्योधन त्याच्या सर्व लवाजम्यासह निघाला. अर्थात सोबतीला दुःशासन, शकुनीमामा आणि कर्ण होतेच. सज्जन माणूस शोधायला निघताना सुद्धा दुर्योधनानं अफाट सैन्य बरोबर घेतलं होतं. त्यानंतर श्रीकृष्णानं धर्मराजाला बोलावलं आणि त्यालादेखील त्या यज्ञाबद्दल माहिती दिली आणि म्हणाले, ‘या यज्ञात आपल्याला एक नरबळी द्यायचा आहे, त्या नरबळीसाठी कुणीतरी दुष्टातला दुष्ट, अधमातला अधम, नीचातला नीच असा माणूस शोधून त्याचा बळी द्यायला हवा. ज्या माणसाचा या पृथ्वीवर जिवंत राहून काहीही उपयोग नाही असा माणूस शोधायला हवा, जो केवळ भूमीला भाररूपच नव्हे, तर समाजाला उपद्रव देतो असा पापी माणूस तू शोधून आण म्हणजे आपल्याला यज्ञाची पुढची तयारी करायला सोपं जाईल.’ झालं, धर्मराज निघाला, ‘नीच माणसाला शोधायला. एकटाच निघाला आहेस, तर बरोबर एखादा अंगरक्षक तरी घे. भीमानं दिलेला सल्ला नाकारून धर्मराज एकटाच निघाला.
आठ दिवस झाले, पंधरवडा उलटला, अगदी पार महिना लोटला, पण ना दुर्योधनाचा पत्ता ना युधिष्ठिराचा आणि साधारण महिना दीड महिन्यानंतर दोघांचाही शोध लागला. दोघंही हात हलवीत परत आले होते. युधिष्ठिर म्हणाला, ‘कृष्णा, माफ कर, पण ज्याच्या जगण्याचा समाजाला काहीही उपयोग नाही असा एकही दृष्ट माणूस मला भेटला नाही. ज्याच्यापासून समाजाला केवळ उपद्रवच होतो अशी एकही व्यक्ती मला सापडली नाही.’ त्याच्या नेमकं विरुद्ध दुर्योधनचं मत होतं. दुर्योधन म्हणाला, ‘कृष्णा, अरे कसली अवघड कामगिरी सोपवलीस रे माझ्यावर? जगात मला असा एकही सज्जन माणूस भेटला नाही की, ज्याची मी पूजा करावी, ज्याचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवावा, असा एकही चांगला माणूस मला आढळला नाही.’ लहानपणी शालेय जीवनात गोष्टींच्या तासाला वर्गात शिक्षकांनी सांगितलेली ही गोष्ट. गोष्ट सांगून झाल्यानंतर शिक्षकांनी या गोष्टीचं तात्पर्य सांगितलं होतं, ‘आपण जर चांगले असलो, तर जग आपल्याला चांगलं दिसतं अन् आपणच जर वाईट असलो, तर जगसुद्धा वाईट माणसांनीच भरलेलं आहे असं आपल्याला वाटत.’ बालवयात ऐकलेली ही गोष्ट मला आवडली आणि त्या गोष्टीचं तात्पर्यसुद्धा. पण पुढे जसजसं वय वाढत गेलं तसतशी समज येत गेली. बालवयात अबोध वाटणाऱ्या अनेक गोष्टींचे उलगडे होत गेले आणि त्यामुळेच कदाचित धर्म आणि दुर्योधनाच्या गोष्टीतलं शिक्षकांनी सांगितलेलं तात्पर्य काहीसं पटेनासं झालं.
‘आपण चांगले, तर जग चांगलं दिसतं. आपण वाईट, तर जग वाईट भासतं’. हे काही अंशी खरंही आहे. पण दुर्योधनाला एकही सज्जन माणूस मिळाला नाही या मागे त्याची स्वतःची कुटिल वृत्ती की, त्याचा जगाकडे पाहण्याचा अपरिपक्व दृष्टिकोन? युधिष्ठिराला वाईट माणूस शोधूनही सापडेना, हा त्याचा चांगुलपणा की, आंधळेपणा? माझ्या मते, दोघांचीही दृष्टी अधूच… दोघेही जगाकडे एका विशिष्ट चष्म्यातून पाहणारे. लाल रंगाचा चष्मा लावणाऱ्याला जग लाल दिसतं आणि हिरवा रंगाचा चष्मा लावला, तर जग हिरवं दिसतं ही वस्तुस्थिती. पण म्हणून जर एखादा माणूस हिरव्या रंगाचा चष्मा लावून म्हणाला की, जग फक्त हिरवंच आहे, तर त्याचं म्हणणं कितपत योग्य म्हणता येईल? जगात अनेक रंग आहेत. लाल आहे तसाच हिरवा पण आहे. किंबहुना लाल आणि हिरव्याव्यतिरिक्त इतरही अनेक रंग आहेत. एकच रंग जरी पाहिला तरी त्यातही अनेक विभिन्न छटा आपल्याला आढळतात. अगदी निळ्याच रंगाचं उदाहरण घेऊ या. आकाशाचा निळा वेगळा नि समुद्राच्या पाण्याचा निळा वेगळा. भगवान शिवशंकराचा हालाहल पिऊन झालेला कंठ, त्याचा रंग निळा आणि भगवान श्रीकृष्णाचा मेघश्याम वर्ण… तोही निळाच. एकाच रंगाच्या विविध छटा आणि अशा विविध रंगांनी नटलेली सृष्टी.
जी गोष्ट रंगांच्या बाबतीत, तीच गोष्ट माणसांच्याही बाबतीत खरी ठरते. विविध रंगांप्रमाणेच विविध स्वभावाची माणसं आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा आपण पाहतो की, जग हे बऱ्या आणि वाईट लोकांनी बनलेलं आहे. इथं सुष्ट आहेत तसेच दुष्टदेखील आहेत. सुष्ट-दुष्टांच्या मिश्रणाचंच हे जग आहे. इथं सज्जन आहेत तसेच दुर्जनही आहेत. चोर आहेत तसेच सावही आहेत.
किंबहुना माणसाच्या स्वभावाचे विविध पैलू बारकाईनं अभ्यासल्यानंतर आपल्या लक्षात येतं की, कुणीही माणूस अगदी पार दुष्ट नसतो किंवा कुणीही अगदी शंभर टक्के सज्जनही नसतो. एखाद्या माणसाचं सज्जन किंवा दुर्जनपणे वागणं हे स्थळ आणि कालसापेक्ष असतं, त्या त्या वेळेवर आणि त्या त्या परिस्थितीवरही अवलंबून असतं. अगदी रामाच्या कालखंडातही रावण होतेच… अगदी महाभारताच्या काळातही विदुर होते तसेच शकुनीही होतेच. भीष्माचार्य होते तसेच जरासंध, शिशुपालदेखील होतेच की. जगात कधीही केवळ सज्जन किंवा केवळ दुर्जन असत नाहीत. किंबहुना कोणताही माणूस पूर्णपणे सज्जन नसतो किंवा पूर्णपणे दुर्जनही नसतो. म्हणूनच युधिष्ठिराचं ‘एकही माणूस वाईट नाही. किंबहुना माणसात वाईट गुण नसतातच’ असं म्हणणं चुकीचं आहे. आणि त्याचबरोबर ‘जगात वंदनीय अशी एकही व्यक्ती नाही’ असं दुर्योधनाचं म्हणणं तेही तितकंच चुकीचं आहे. युधिष्ठिर काय किंवा दुर्योधन काय, दोघांची विधानं परस्परविरोधी. पण दोन्हीही चुकीचीच. ही दोन्ही विधानं म्हणजे रंगीत चष्म्यातून जगाकडे पाहण्याचा प्रकार. फरक फक्त इतकाच की, दोघांच्या चष्म्याचे रंग भिन्न, पण तरीही दोन्ही रंग मूळ रंगापेक्षा भिन्न, फसवे. आपणही अनेकदा चष्मे लावून माणसांकडे पाहतो आणि त्यांच्या गुणदोषांची चर्चा करतो, त्यांची आपापल्या कुवतीनुसार पारख करतो आणि फसवणूक करून घेतो स्वतःचीच… ज्या रंगाचा चष्मा त्या रंगाचं जग दिसतं आणि फसगत होते आणि म्हणूनच कोणत्याही प्रकारचे चष्मे न लावता जग जसं आहे तसं पाहणं हेच खरं शहाणपणाचं लक्षण असं म्हणता येईल.