मुंबई: भारत आणि आयर्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना १० जानेवारीला खेळवण्यात आला. राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या या सामन्यात भारतीय महिला संघाने सहा विकेटनी विजय मिळवला. भारताला विजयासाठी २३९ धावांचे आव्हान मिळाले होते. हे त्यांनी ३४.३ षटकांत पूर्ण केले. आता दोन्ही संघादरम्यानचा मालिकेतील दुसरा सामना १२ जानेवारीला याच मैदानावर खेळवला जाईल.
प्रतिकाची जबरदस्त खेळी, स्मृतीने रचला इतिहास
भारताकडून सलामीवीर प्रतिका रावलने सर्वाधिक ९६ बॉलमध्ये ८९ धावांची खेळी केली. या दरम्यान प्रतिकाने १० चौकारांच्या शिवाय एक सिक्सर लावला. प्रतिका प्लेयर ऑफ दी मॅच निवडण्यात आली. तेजल हसबनीसनेही ४६ बॉलमध्ये ५३ धावांवर नाबाद राहिली. यात ९ चौकारांचा समावेश होता. तर कर्णधार स्मृती मंधानाने २९ चेंडूंचा सामना करताना ४१ धावा केल्या. मंधानाने आपल्या डावात ६ चौकाराशिवाय एक सिक्सर ठोकला. आयर्लंडसाठी हॅरी मॅगुइरेने सर्वाधिक तीन जणांना बाद केले.
स्मृती मंधानाने ४१ धावांच्या खेळीदरम्यान महिला वनडेमध्ये आपले ४ हजार धावा पूर्ण केल्या. ही कामगिरी करणारी ती दुसरी भारतीय फलंदाज आहे. याआधी मिताली राजने ही कामगिरी केली होती. तसेच वेगवान चार हजार धावा पूर्ण करण्याच्या बाबतीत ती मितालीच्या पुढे गेली आहे. एकूण मिळून स्मृती महिला वनडेमध्ये सर्वात वेगवान ४ हजार धावा बनवण्याच्या बाबतीत तिसऱ्या स्थानावर आहे.