Wednesday, May 27, 2026

Konkan Legislative Council : कोकण विधानपरिषदेच्या बदल्यात रायगडचे पालकमंत्रीपद शिवसेनेला?

Konkan Legislative Council : कोकण विधानपरिषदेच्या बदल्यात रायगडचे पालकमंत्रीपद शिवसेनेला?

जागावाटपाचा तिढा सुटला; भरत गोगावले अखेर अंगावर 'कोट' चढवणार

मुंबई : महायुतीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला कोकण (Kokan) विधानपरिषद (Legislative Council) जागावाटपाचा तिढा अखेर सुटल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. नव्या तडजोडीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) अनिकेत तटकरे यांच्यासाठी कोकण विधानपरिषदेची जागा सोडण्याच्या बदल्यात, रायगडचे

"> पालकमंत्रिपद शिवसेनेला देण्याचे निश्चित झाले आहे. परिणामी, शिवसेनेचे फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्या गळ्यात अखेर रायगडच्या पालकमंत्रिपदाची माळ पडणार असल्याचे स्पष्ट झाले असून, गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेले गोगावले आता अंगावर 'पालकमंत्र्याचा कोट' चढवण्यासाठी सज्ज झाले आहेत.

विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने रायगडमध्ये शिवसेना (ShivSena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) यांच्यात निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी महायुतीच्या सर्वोच्च नेत्यांनी हा सुवर्णमध्य काढल्याचे समजते. कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीमध्ये मोठी रस्सीखेच सुरू होती. मंत्री भरत गोगावले (Bharat Gogavle) यांनी आपले सुपुत्र विकास गोगावले यांच्यासाठी या जागेवर दावा ठोकला होता. कोकणात शिवसेनेचे संख्याबळ जास्त असल्याचा युक्तिवाद करत ही जागा पक्षालाच मिळावी, असा आग्रह त्यांनी धरला होता. मात्र, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनेही प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे यांच्या पुनर्वसनासाठी या जागेवरील आपला हक्क सोडण्यास स्पष्ट नकार दिला होता. अखेर या दोन्ही बड्या नेत्यांची राजकीय सोय लावण्यासाठी वरिष्ठांनी दोन्ही पक्षांची मनधरणी केली. अनिकेत तटकरे यांचा विधानपरिषदेचा रस्ता मोकळा करत, त्या मोबदल्यात रायगडचे पालकमंत्रिपद शिवसेनेला बहाल करण्याचा तोडगा काढण्यात आला आहे.

तटकरे विरुद्ध गोगावले' संघर्षावर पडदा?

अजित पवार गटाने महायुतीत प्रवेश केल्यापासून रायगडच्या पालकमंत्रिपदावरून अजित पवार गट आणि शिंदे यांच्या शिवसेनेत तीव्र शीतयुद्ध सुरू होते. अदिती तटकरे यांच्याकडे पालकमंत्रिपद जाण्याची शक्यता असल्याने भरत गोगावले आणि त्यांचे पाठीराखे कमालीचे नाराज होते. जिल्ह्याच्या मुख्यालयातील ध्वजारोहण आणि अधिकृत बैठकांचे अधिकार आपल्याकडे असावेत, अशी भावना गोगावले यांनी अनेकदा उघडपणे बोलून दाखवली होती. आता नव्या तडजोडीनुसार गोगावले यांची अनेक वर्षांची ही इच्छा पूर्ण होणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा