आले नवीन वर्ष,
झाला आम्हांस हर्ष
हसू आणून गाली,
साधू आम्ही उत्कर्ष
गाऊ नवीन गाणी,
बोलू मधाळ वाणी
बंधुता, मानवतेची,
सांगू नवी कहाणी
ज्ञानास अंत नाही,
शिकूया नवीन काही
घेऊ उंच भरारी,
बागडू दिशांना दाही
अन्यायाला वाचा फोडू,
न्यायासाठी लढू
विज्ञानाचे पाईक होऊन,
प्रगतिपथावर चढू
कष्टावर श्रद्धा ठेवू,
मदतीचा हात होऊ
नवध्यासाच्या या पर्वाला,
चला सामोरे जाऊ
नव्या नव्या या गोष्टी,
देती नवीन दृष्टी
नववर्ष स्वागताला,
आतूर झाली सृष्टी
काव्यकोडी
एकनाथ आव्हाड
१) दही घुसळून त्यात
घालतात पाणी
तयार होणारे पेय
रूचकर, बहुगुणी
वायूनाशक, पित्तशामक
शीतलता देते
अन्न पचवायला
मदत कोण करते ?
२) गव्हाच्या जातीतील
हे धान्य ओबडधोबड
गव्हापेक्षा हलके
पचण्यास मात्र जड
औषधातही याचा
उपयोग करतात बरं
आहारातल्या धान्याचं
नाव काय खरं?
३) लाव्हारस थंड होऊन
तयार हा होतो
भूपृष्ठाच्या खाली वर
मग दिसून येतो
ग्रॅनाईट हे सुद्धा
त्याचेच एक नाव
ओळखा या खडकाला
काय म्हणतात राव?
उत्तर –
१) ताक
२) सातू
३) अग्निजन्य खडक