स्टेटलाइन- डॉ. सुकृत खांडेकर
गेल्या वर्षी २०२४ मध्ये भगवानबाबा गडावर झालेल्या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे या मंचावर बसलेल्या नेत्यांची समोर जमलेल्या हजारोंच्या सभेला मोठ्या उत्साहाने ओळख करून देत होत्या. तेव्हा गर्दीतून वाल्मीक अण्णांच्या नावाने ओरडा झाला. तेव्हा पंकजा म्हणाल्या, वाल्मीकशिवाय धनंजय यांचे पानही हालत नाही… पंकजा यांच्या वक्तव्यावर गर्दीने मोठा प्रतिसाद दिला व पंकजा म्हणतात ते खरे आहे, यावर शिक्कामोर्तब झाले. पण या प्रकाराने मंचावर बसलेले धनंजय मुंडे मात्र काहीसे अस्वस्थ झालेले दिसले. बीडमधील मस्साजोगचे तरुण सरपंच संतोष देशमुख यांचे झालेले अपहरण आणि त्यांच्या झालेल्या निर्घृण हत्याप्रकरणी वाल्मीक कराड यांची नेमकी काय भूमिका आहे हे अजूनही तपासात पुढे आलेले नाही पण भाजपाच्या आमदारांसह इतर बड्या नेत्यांनी केलेल्या आरोपांमुळे संशयाची सुई त्यांच्या दिशेने फिरत आहे. सरपंच संतोष देशमुखची हत्या झाल्यापासून वाल्मीकवर गेले तीन आठवडे आरोपांच्या फैरी झडत आहेत. बीड जिल्ह्यात ‘वाल्मीक बोले व पोलीस-प्रशासन डोले’ असे म्हटले जात आहे. धनंजय मुंडे यांचा राजकीय वरदहस्त असल्यामुळेच वाल्मीक हा शक्तिशाली बाहुबली बनलाय असे आरोप उघडपणे होत आहेत. सरपंच संतोष देशमुख याच्या खुनाशी आमचा काही संबंध नाही, जो दोषी असेल त्याला फाशीची शिक्षा द्यावी, असे धनंजय मुंडे व वाल्मीक कराड यांनी म्हटले आहे. जर संबंध नाहीत तर वाल्मीक २२ दिवस पोलिसांच्या हाती का लागत नव्हता. नागपूर, उज्जैन, गोवा, अक्कलकोट, पुणे असा फिरत का होता? विशेष म्हणजे सरपंचाच्या हत्येनंतर वारंवार वाल्मीकचा उल्लेख होत असताना व त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल
झाला असताना तो पोलिसांना गुंगारा का देत राहिला?
गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा पुतण्या धनंजय मुंडे यांचे बीड जिल्ह्यात प्रस्थ वाढले. गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा व प्रीतम या दोन्ही बहिणी त्यांच्या खऱ्या राजकीय वारस. गोपीनाथ मुंडेंनी पंकजालाच राजकारणात पुढे केले. पण धनंजय मुंडेंच्या राजकीय ताकदीपुढे पंकजा यांना आपल्या अस्तित्वासाठी सतत संघर्ष करावा लागला. गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूनंतर धनंजय मुंडेंनी जिल्ह्यात आपले साम्राज्य उभे केले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यावर शरद पवारांनी त्यांना भरपूर संधी दिली. मिळालेल्या सत्तेतून आपली फौज, आपले नेटवर्क निर्माण केले. त्यातूनच धनंजय मुंडे यांचा राजकीय वरदहस्त लाभलेल्या वाल्मीक कराड हा शक्तिशाली बनला. धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड म्हणजे बीड जिल्ह्याचे नंबर १ व नंबर २ अशी ओळख निर्माण झाली. छोटा आका आता सीआयडीच्या ताब्यात आहे. धनंजय मुंडेंनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात आहे. मी कशासाठी राजीनामा देऊ, माझा काहीच संबंध नाही, असे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.
पोलिसांच्या व सीआयडीच्या रडारवर असताना बावीस दिवसांनी वाल्मीक कराड आलिशान स्कॉर्पिओमधून पुण्याच्या पाषाण येथील सीआयडी ऑफिसमध्ये शरण आला व त्या अगोदर त्याने एक व्हीडिओ वायरल करून त्याची भूमिका जनतेपुढे मांडली. व्हीडिओत तो म्हणतो, मला अटकपूर्व जामीन घेण्याचा अधिकार असताना, मी पुणे सीआयडी ऑफिसमध्ये शरण येतो आहे. सरपंचाच्या हत्येमध्ये आपले नाव राजकीय द्वेषापोटी गुंतवले आहे… पोलिसांना शरण येतानाही त्याची मस्ती कायम होती की, त्याच्या रणनितीचा भाग होता? सीआयडी ऑफिसमध्ये शरण येणे हा त्याचा स्टंट होता की, कोणाच्या सल्ल्यानुसार तो तसा वागला? वाल्मीकचे नाव तीन आठवडे मीडियातून रोज ठळकपणे प्रकाशात असताना तो व्हीडिओ व्हायरल करून शरण येतो ही पोलिसांना नामुष्की नाही का? वाल्मीक आलिशान वातानुकूलित मोटारीतून पोलिसांना शरण आला हे पोलिसांचे अपयश म्हटले पाहिजे. पोलिसांना शरण यायचे ते कुठे व कोणत्या वेळेला याचा निर्णयही त्याने घेतला. त्याला व अन्य फरारी आरोपींना अटक व्हावी यासाठी २८ डिसेंबरला बीडमध्ये सर्वपक्षीय विराट मोर्चा निघाला. दोन हजार ग्रामपंचायतींचे कामकाज तीन दिवस बंद राहिले. नागपूरला विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या काळात सरपंचांच्या निर्घृण हत्येवरून आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर यांनी बीड जिल्ह्यातील दहशतवादाचे सारे वास्तव प्रखर शब्दांत मांडले. तीन वेळा जनतेतून निवडून आलेल्या सरपंचाला हल्लेखोर उचलून नेतात, मोटारीतून अपहरण करतात नि त्याला लाठ्या-काठ्या, कोयता आणि धारदार शस्त्रांचे वार करून त्याच्या शरीराची चाळण करतात, हे सर्व चित्रपटातील कथानकालाही लाजवणारे आहे.
सरपंचांची क्रूर हत्या करणाऱ्या टोळीचा म्होरक्या कोण आहे? दहशत, खंडणी, हत्या करणाऱ्या टोळीमागे कुणाचे पाठबळ आहे? बीड जिल्ह्यातील पोलीस प्रशासन अशा बाहुबलीपुढे हतबल आहे काय? वर्षानुवर्षे दहशत आहे. मग सरपंचांची हत्या झाल्यावर लोकक्षोभ कसा प्रकटला? कोणाचेही सरकार असो, गृह खाते बीड जिल्ह्यातील दहशतवादाविषयी अनभिज्ञ होते की तिथल्या आका नि बाहुबलीच्या गुंडगिरी व हुल्लडबाजीकडे दुर्लक्ष केले जात होते? केवळ खंडणीचा गुन्हा पुरेसा नाही, तर खुनाचा गुन्हा दाखल करा, कट-कारस्थान आहे का याची चौकशी करा, वाल्मीक दोषी नव्हता, तर फरार का झाला हे शोधा अशा मागण्या विधिमंडळात व जाहीरपणे झाल्या. संतोष देशमुखच्या खुन्यांना अटक करताना त्यांच्या मास्टर माईंडलाही जेलमध्ये टाका अशी सातत्याने मागणी आमदार-खासदारांकडून झाली. संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना कोण वाचवत आहे हे सुद्धा समजले पाहिजे. सरपंचाची हत्या ९ डिसेंबरला झाली, आरोपी सापडत नाहीत म्हणून जनतेत प्रक्षोभ वाढला.
२७ डिसेंबरला रेणापूरला आक्रोश मोर्चा निघाला, २८ डिसेंबरला बीडमध्ये लाखोंच्या संख्येने सर्वपक्षीय मूक मोर्चा निघाला. दोषींना कठोर शिक्षा द्यावी यासाठी खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर, छ. संभाजी राजे, मराठा आंदोलकांचे नेते मनोज जरांगे-पाटील, जितेंद्र आव्हाड, नरेंद्र पाटील, नमिता मुंदडा आदींनी सरकारकडे तगादा लावला आहे.
परळीच्या औष्णिक ऊर्जा प्रकल्पातून निघणाऱ्या राखेची अवैध वाहतूक हा मुद्दा यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे. काही शेकडो कोटींचा हा व्यवहार आहे. खरं तर पंधरा-सोळा कंपन्यांना राखेची वाहतूक करण्याची परवानगी आहे, पण राख माफियांच्या रांगेत ते कोणी घुसू शकत नाहीत, एवढी मोठी दहशत आहे. वाल्मीक हा मूळचा परळी तालुक्यातील पांगरी गावचा. दहावीनंतर तो परळीत आला. जत्रेत सिनेमा दाखवायचा. गोपीनाथ मुंडे यांच्याकडे घरकाम करायचा. त्यांच्या मुलींना शाळेत सोडायचा. काका-पुतण्या वेगळे झाल्यावर त्याने धनंजय मुंडेंशी जवळीक केली. परळी नगर परिषदेचा सदस्य, उपनगराध्यक्ष, गटनेता झाला. पुढे धनंजय मुंडेंचा विश्वासू माणूस बनला. धनंजय मुंडेंच्या राजकीय व्यवस्थापनाची जबाबदारी तोच संभाळत असे. विधिमंडळात संतोष देशमुखच्या हत्येवरून आवाज उठवला गेल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फरारी आरोपींच्या शोधासाठी सीआयडीकडे तपास सोपवला. अगोदर पोलीस, मग सीआयडी, आता एसआयटी पथक कार्यरत झाले. तरीही आरोपी सापडत नाहीत व वाल्मीक नाट्यमय शरण येतो हे सर्व गूढ आहे. वाल्मीक हा जिल्ह्याचा प्रति पालकमंत्री अशा थाटात वागत होता का?बीड जिल्ह्यातील धनंजय मुंडेंचा राईट हॅण्ड असलेल्या वाल्मीककडे जणू जिल्ह्याचे सारे अधिकार आहेत, असा सर्वत्र समज होता. जिल्ह्यात किती जणांवर बोगस गुन्हे दाखल झाले, कोणी कोणाला सुपारी दिली, किती हल्लेखोरांना पकडले व कितींना शिक्षा झाली, जिकडे तिकडे मर्जीतली माणसे असल्यावर नि:पक्ष तपास तरी कसा होणार?
सन २०१९ मध्ये धनंजय यांनी पंकजांचा पराभव केला. सन २०२४ मध्ये भाजपा व राष्ट्रवादी महायुतीत असल्याने लोकसभा निवडणुकीत धनजंय यांनी पंकजाचा, तर विधानसभा निवडणुकीत पंकजा यांना धनंजय यांचा प्रचार करावा लागला. बीडच्या हत्या व दहशतवादी घटनांविषयी अंजली दमानीया व सुरेश धस रोज नवनवीन माहिती व पुरावे उघड करीत आहेत. बाहुबली समजणारे हातात रिव्हॉल्वर घेऊन आकाशात गोळ्या झाडताना व्हीडिओ सोशल मीडियावर पोस्ट झाले आहेत. सर्वपक्षीय बड्या नेत्यांबरोबर वाल्मिकचे फोटोही व्हायरल झाले आहेत. एकेकाळी धनंजय मुंडेंचा जीव तोडून प्रचार करणारे सुरेश धस आता जीव तोडून त्यांच्या टोळीवर आरोपांचा भडीमार करीत आहेत. सरपंचांच्या हत्येनंतर बीडची रांचीशी तुलना सुरू झाली आहे. कमरेला पिस्तूल, छेडछाड व दादागिरी, अशा उडाणटप्पूंच्या टोळ्या खुलेआम भटकत असतील, तर सामान्य जनता, व्यापारी, व्यावसायिक, सुशिक्षित जनतेला सुरक्षित कसे वाटणार? आरोपींची संपत्ती जप्त करा, बँक खाती गोठवा, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा, आरोपींना मोक्का लावा अशा मागण्या केल्या जात आहेत. जिल्ह्यातील दहशतवाद रोखण्यासाठी व बाहुबली, माफिया व आकाला लगाम घालण्यासाठी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्याचे पालकमंत्रीपद घ्यावे अशी मागणी होत आहे. सरपंच संतोष देशमुखांची लेक म्हणते, काल ढगाआड गेलेला सूर्य आज दिसतोय, पण माझे वडील कधीच दिसणार नाहीत… गोपीनाथ मुंडे विराेधी पक्षात असताना राजकारणातील गुन्हेगारीच्या विराेधात संघर्ष करीत हाेते. आज त्यांचा बीड िजल्हा दहशतवाद, खंडणी, खून, गुन्हेगारी अशा घटनांनी केंद्रस्थानी आहे, हे दुर्दैव आहे.