Wednesday, March 19, 2025
Homeब्रेकिंग न्यूजGadchiroli Naxalite : राज्यात ११ जहाल नक्षलवाद्यांचे मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण!

Gadchiroli Naxalite : राज्यात ११ जहाल नक्षलवाद्यांचे मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण!

गडचिरोली : आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) गडचिरोली (Gadchiroli) दौऱ्यावर असून त्यांनी गडचिरोतील गट्टा ते वांगेतुरी दरम्यान एसटी बसला हिरवा झेंडा दाखवला. त्याचबरोबर डोक्यावर कोट्यवधी रुपयांचे बक्षीस असणारे नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलीस मुख्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आत्मसमर्पण केले आहे. यामुळे नक्षलग्रस्त भागात दंतेवाडा येथे पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.

Gadchiroli ST Bus : स्वातंत्र्याच्या ७६ वर्षानंतर गट्टा ते वांगेतुरीतील गावकरी करणार एसटी प्रवास!

मिळालेल्या माहितीनुसार, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ११ जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यामध्ये झोनल कमिटीच्या प्रमुख आणि भूपतीची पत्नी ताराक्का यांच्यासह ८ महिला, ३ पुरुष आणि दोन दाम्पत्यांचा समावेश आहे. या सर्व नक्षलवाद्यांवर छत्तीसगड सरकारसह महाराष्ट्रात १ कोटींपेक्षा अधिकचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.

दरम्यान, निवडणूक आचारसंहितेच्या काळात ५ नक्षली ठार झाले होते. २०२४ या वर्षांत २४ नक्षली ठार झाले आणि १८ माओवाद्यांना अटक करण्यात आली. गेल्या ६ महिन्यात १६ जहाल नक्षलवादी आणि आज ११ असे २७ जण मुख्य प्रवाहात आले आहेत.

गडचिरोली पोलिसांचा जाहीर सत्कार

नक्षली भागात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल गडचिरोली पोलिसांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली पोलीस मुख्यालयात उपस्थित राहणार आहे.

गडचिरोलीला पोलाद सिटीचा दर्जा मिळणार – देवेंद्र फडणवीस

उत्तर गडचिरोली माओवादापासून मुक्त झाली, लवकरच दक्षिण गडचिरोली सुद्धा होईल. गेल्या ४ वर्षांत एकही युवक किंवा युवती माओवादात सहभागी झाली नाही, ही फार मोठी उपलब्धी आहे. 11 गावांनी नक्षलवाद्यांना बंदी केली आहे. सी-60 च्या जवानांनी जनतेचा विश्वास संपादन केला. आता संविधानविरोधी चळवळीत कुणीही जायला तयार नाही, ही आनंदाची बाब आहे. न्याय मिळायचा असेल तर भारतीय संविधानानेच मिळू शकतो, तो माओवादी विचारसरणीने मिळू शकत नाही, हे जनतेला आता पटले आहे. येत्या काळात गडचिरोलीला पोलाद सिटीचा दर्जा मिळणार, असे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची अतिशय मोलाची मदत या अभियानात मिळते आहे. आता माओवादाविरोधात लढाईत राज्यांच्या सीमा उरलेल्या नाहीत. महाराष्ट्राने सुद्धा सीमेबाहेर जाऊन कारवाया केल्या आहेत. शरणागती पत्करलेल्या नक्षल्यांचे संपूर्ण पुनर्वसन करण्यात येईल, असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

गडचिरोली दौऱ्यात विविध कामाचेही झाले शुभारंभ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गडचिरोली दौऱ्यादरम्यान दुपारी कोनसरी येथे, लॉईड्सच्या विविध उपक्रमांचा त्यांनी शुभारंभ केला. यामध्ये कोनसरी येथे डीआयआय प्लांट (४०० कोटी रुपये गुंतवणूक, ७०० रोजगार), पेलेट प्लांट आणि स्लरी पाईपलाईन (३००० कोटी रुपये गुंतवणूक, १००० रोजगार), हेडरी, एटापल्ली येथे आयर्न ओअर ग्राईडिंग प्लांट (२७०० कोटी रुपये गुंतवणूक, १५०० रोजगार), वन्या गारमेंट युनिट (२० कोटी रुपये गुंतवणूक, ६०० रोजगार) याचा समावेश आहे.

त्याचबरोबर लॉईडस काली अम्मल हॉस्पीटल आणि लॉईडस राज विद्यानिकेतन सीबीएसई शाळेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. सुमारे १२०० विद्यार्थ्यांना येथे शिक्षण मिळणार आहे. पोलिसांसाठी निवासस्थाने, जिमखाना, बालोद्यान इत्यादींचेही लोकार्पण करण्यात आले.

कामगार आणि पूर्वाश्रमीच्या नक्षलवाद्यांना कंपनीचे १००० कोटींचे शेअर्स प्रदान करुन एकप्रकारे मालकी देण्याचाही स्तुत्य उपक्रम लॉईड्सने हाती घेतला. हे शेअर्स मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

ग्रीन माईनिंगचा शुभारंभ

गडचिरोलीत ग्रीन माईनिंगचाही शुभारंभ करण्यात आला. यामुळे आता खाणींचे संरक्षण होणार असून लोहखनिजासाठी स्लरी पाईपलाईनमुळे इंधनबचतही होणार आहे. तसेच कार्बन उर्त्सजन, रस्त्यावरील अपघात देखील कमी प्रमाणात होण्यास मदत मिळणार आहे. याबाबतचा प्रयोग प्रथमच गडचिरोलीत राबविण्यात येत आहे. गोंडवाना विद्यापीठ ऑस्ट्रेलियन विद्यापीठाशी एक करार करणार असून त्यातून मायनिंगशी संबंधित सर्व अभ्यासक्रम सुरु करण्यात येतील. यामुळे गडचिरोलीतील तरुणांना रोजगार मिळू शकणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -