मुंबई : घाटकोपर येथील पेट्रोल पंपावर सात महिन्यांपूर्वी महाकाय होर्डिंग कोसळले (Ghatkopar Hoarding Collapsed) होते. या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाल्याची घटना यावर्षी मे महिन्यात घडली होती. या दुर्घटनेतील आरोपी सात महिन्यांपासून फरार होता. फरार असणाऱ्या अर्षद खान याला अखेर ३० डिसेंबर रोजी उत्तर प्रदेशातील लखनौ येथून अटक करण्यात आली आहे.
Mumbai News : प्रदूषण नियमकांचे पालन न करणाऱ्यांवर पालिका करणार गुन्हा दाखल!
घाटकोपर होर्डिंग प्रकरणातील व्यवसायिक अर्शद खान याला मुंबई गुन्हे शाखेकडून सात महिन्यांनंतर अटक करण्यात आली. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अर्शद खान याला सोमवारी लखनऊमध्ये अटक करण्यात आली आहे. या होर्डिंग घटनेशी संबंधित आर्थिक व्यवहार उघड करण्यासाठी त्याची अटक महत्त्वपूर्ण मानली जात आहे. रेल्वेचे माजी पोलीस आयुक्त यांचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जाणारा अर्षद खान याने दुर्घटनाग्रस्त होर्डिंग कंपनी इगो मीडिया कडून ४६ लाख रुपये घेतले असे तपासात समोर आले होते.तपासनंतर अर्षद खान याला या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले होते. मुंबई पोलिसांनी अर्शद खान याचा सर्वत्र शोध घेतला होता. परंतु तो आतापर्यंत मिळाला नव्हता. अखेर सोमवारी अर्षद खान याला अटक करण्यात आले आहे. अर्षदला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला ६ जानेवारी पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी कंपनीच्या मालकासह चार जणांना पूर्वी अटक झाली होती, अर्षद खान ही पाचवी अटक आहे.
घाटकोपर होर्डिंग प्रकरणात यापूर्वी पंतनगर पोलीस ठाण्यात होर्डिंग कंपनी इगो मीडियाचे मालक भावेश भिंडे सह कंपनीच्या माजी संचालक जान्हवी मराठे , होर्डिंगच्या देखभालीची जबाबदारी सांभाळणारे सागर पाटील आणि स्ट्रक्चरल अभियंता मनोज संघू यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान हा गुन्हा मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग करून विशेष तपास पथक गठीत करण्यात आले होते. त्यांनतर या प्रकणात विशेष तपास पथकाने भावेश भिंडे कंपनीच्या मालकासह चार जणांना अटक करण्यात आली होती. मुंबईत १३ मे २०२४ रोजी घाटकोपरमधील छेदा नगरातील पेट्रोप पंपावर असलेले मोठे होर्डिंग कोसळले होते. हे अवैध होर्डिंग १५ हजार वर्ग फूटापेक्षा मोठे होते. या होर्डिंगची नोंद लिम्का बुक ऑफ रिकॉर्ड्समध्ये होती. या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला होता. तसेच ७० पेक्षा जास्त जण जखमी झाले होते. (Ghatkopar Hoarding Collapsed)