थर्टी फर्स्टसाठी मुंबईत कडेकोट बंदोबस्त

  101

मुंबई : २०२४ला अलविदा करण्यासाठी आणि २०२५ चे जल्लोषात स्वागत करण्यासाठी थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर व उपनगरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शासकीय कार्यालये तसेच खासगी कार्यालयांनाही रोषणाईने सजविण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर कोणतीही अनुचित घटना घडू नये व जल्लोषाला कोठे गालबोट लागू नये म्हणून मुंबई पोलिसांनी व रेल्वे पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेसाठी कंबर कसली आहे.


नवीन वर्षाच्या स्वागतवेळी मुंबई शहर आणि उपनगरामध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून ८ अप्पर पोलीस आयुक्त, २९ पोलीस उपायुक्त, ५३ सहाय्यक पोलीस आयुक्त, २१८४ पोलीस अधिकारी आणि १२ हजार ४८ पोलीस अंमलदार गस्तीवर आहेत. शहरातील महत्वांच्या चौकात नाकाबंदी ठेवण्यात आली आहे.



गेट वे ऑफ इंडिया व ताज हॉटेल परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त


गेट वे ऑफ इंडिया व ताज हॉटेलचा परिसर तसेच सभोवतालचा परिसरात पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला असून येणाऱ्या व जाणाऱ्यांची तपासणी केली जात आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी, एसीपी व अन्य अधिकारी सतत घटनास्थळी येऊन सुरक्षेचा आढावा घेत आहेत. दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरदेखील रेल्वे पोलिसांनी स्टेशनवरील प्रत्येक प्लॅटफॉर्मवर श्वानांकडूनही तपासणी करण्यात आली आहे.



ड्रग्ज पार्टीवरही विशेष लक्ष


जगातील सुरक्षित शहर म्हणून मु़ंबईची ओळख आहे. ती प्रतिमा कायम ठेवण्यासाठी थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून आटोकाट प्रयत्न सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस प्रशासनला सुरक्षेबाबत सूचना दिलेल्या आहेत. नव वर्षाच्या सुरक्षेसाठी १२ हजार अंमलदार असतील तर महिला पोलीसही ठिकठिकाणी बंदोबस्ताला तैनात आहेत. नव वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकरांनी कोणतेही दडपण बाळगू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

पोलीस मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी सज्ज असून ड्रग्जचे सेवन खासगी पार्टीत मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्यावर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. ड्रग्ज पार्टींवर कडक कारवाई होणार आहे. विकणारा आणि विकत घेणारा या दोघांवरही कारवाई होणार असून मद्यपान करुन गाडी चालवणाऱ्यांविरोधात विशेष मोहिम सुरू राहणार आहे. आतापर्यंत ८०० गाड्या जप्त केल्या आहेत. रेव्ह पार्टी किंवा इतर गुप्त पार्टींवर एटीसी व अंमली पदार्थ विभागाचे पोलीस लक्ष ठेवून आहेत. सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे, महिलांशी गैरवर्तवणूक, अनधिकृत मद्य विक्री, अंमली पदार्थ विक्री/सेवन यांवर कडक करवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.



बेस्टही सज्ज


३१ डिसेंबरच्या रात्री नववर्ष स्वागतासाठी' गेट वे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी, गोराई बीच, मार्वे बीच आणि मुंबईतील इतर समुद्र किनाऱ्यांवर रात्रीच्या वेळी येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट उपक्रमाच्या वतीने विविध बसमार्गावर रात्री एकूण २५ जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. आवश्यकता भासल्यास अधिक प्रमाणात बसगाड्या सोडण्यात येतील. प्रवाशांच्या मदतीसाठी बेस्ट उपक्रमातर्फे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक जुहू चौपाटी, गोराई बीच तसेच चर्चगेट स्थानक (पूर्व) व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इ. ठिकाणी वाहतूक अधिकारी तसेच बसनिरीक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे.


तसेच नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर बेस्ट उपक्रमातर्फे ३१ डिसेंबर रोजी दक्षिण मुंबईतील विविध ऐतिहासिक तसेचे प्रेक्षणिय स्थळांचा फेरफटका नवीन वातानुकुलित दुमजली इलेक्ट्रिक बसद्वारे घडविण्याच्या हेतूने हेरिटेज टूर चालविण्यात येणार आहेत. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक (म्युझियम) - गेट वे ऑफ इडिया - मंत्रालय एनसीपीए नरिमन पॉईंट विल्सन कॉलेज नटराज हॉटेल चर्चगेट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हुतात्मा चौक रिझर्व बँक ओल्ड कस्टम हाऊस म्युझियम या मार्गावर सकाळी १०.०० ते मध्यरात्री ३.०० वाजेपर्यंत प्रत्येकी ४५ मिनिटांच्या प्रस्थानानंतर सदर बसगाड्या प्रवर्तित करण्यात येतील. सदर हेरिटेज टूरसाठी वरच्या मजल्यासाठी प्रत्येकी रु. १५०/- व खालच्या मजल्यावर प्रत्येकी रु.७५/- तिकीट दर आकारण्यात येणार आहे.



ठाण्यात २०२ तळीरामांवर कारवाई


ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी ३१ डिसेंबरच्या अनुषंगाने सुरू केलेल्या ड्रंक अँड ड्राइव्हच्या कारवाईत तीन दिवसांत २०२ तळीरामांवर कारवाई केली आहे. वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा इशारा दिला आहे; मात्र तळीरामांवर त्याचा परिणाम झाला नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ही कारवाई आणखी कठोर करण्यात येईल, असा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे.


३१ डिसेंबर आणि नववर्षाच्या निमित्ताने ठाणे वाहतूक विभागाने ड्रंक अँड ड्राइव्हच्या कारवाईचा वेग वाढवला आहे. ठिकठिकाणी नाकेबंदी केली आहे. त्यात मोठ्या प्रमाणात वाहनचालकांची तपासणी केली जात आहे. २६, २७ आणि २८ डिसेंबर या तीन दिवसांत वाहतूक पोलिसांनी २०२ तळीरामांना कायद्याचा दणका दिला आहे. ३१ डिसेंबरच्या अनुषंगाने पोलिस आयुक्तांच्या आदेशाने सर्व ठिकाणी कारवाया सुरू केल्या आहेत. त्यासाठी चार सहाय्यक पोलीस आयुक्त, १७ पोलीस निरीक्षक, २३ पोलीस उपनिरीक्षक, ११० कर्मचारी तैनात ठेवले आहेत. हॉटेल, बारमालकांना मद्यपींना घरी सोडून देण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती ठाणे वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाट यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Hartalika 2025: अखंड सौभाग्य आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी केले जाते हरतालिकेचे व्रत

मुंबई : हिंदू धर्मातील महत्त्वाच्या सणांपैकी एक असलेला हरतालिका व्रताचा सण यंदा २६ ऑगस्ट २०२५ रोजी साजरा होत

Mumbai Police: मुंबई पोलिसांची कौतुकास्पद मोहीम, चोरीला गेलेले ८,००० मोबाईल परत मिळवून दिले

मुंबई: मुंबई पोलिसांनी चोरीला गेलेले मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यासाठी एक विशेष मोहीम सुरू केली

GSB Ganpati First Look: मुंबईतील सगळ्यात श्रीमंत बाप्पाची पहिली झलक दिमाखात सादर

मुंबईच्या GSB सेवा मंडळाच्या बाप्पाच्या फर्स्ट लुकचे दिमाखात अनावरण  मुंबई: गणेश चतुर्थीसाठी आता एकच दिवस बाकी

Ganeshotsav 2025: वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने साकारले ५२ फूटी काशी विश्वनाथ मंदिर

मुंबई: दरवर्षी प्रसिध्द मंदिरांची हुबेहुब आरास साकारणाऱ्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘अरण्य’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच मराठी चित्रपट ‘अरण्य’ च्या पोस्टरचे अनावरण करण्यात

मुंबईत अंधेरीमध्ये पाच मजली मासळी बाजार बांधणार ?

मुंबई : मुंबईत अंधेरीमध्ये जे. बी. नगर येथे पाच मजली मासळी बाजार बांधण्याचा १३८ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुरी