नियमभंग करणाऱ्यांकडून २ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल
मुंबई : शहरातील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी, विशेषतः धूळ नियंत्रणासाठी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने समर्पित प्रयत्न सुरू केले आहेत. वायू गुणवत्ता सुधारणा अभियान अंतर्गत आज संपूर्ण स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यात, एकाच दिवसात १८९ मेट्रिक टन राडारोड्याचे (डेब्रीज) संकलन करण्यात आले, तर सुमारे २४३ किलोमीटर लांबीचे रस्ते पाण्याने धुऊन स्वच्छ करण्यात आले. तसेच नियमभंग करणाऱ्यांकडून २ हजार ५०० रुपयांचा दंड देखील वसूल करण्यात आला आहे.
वातावरणातील बदलांमुळे मुंबई प्रदेशातील हवेच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम होऊन वायू प्रदूषणात वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. या पार्श्वभूमीवर वायू प्रदूषण नियंत्रणासाठी पालिकेच्या वतीने मार्गदर्शक तत्त्वे आणि प्रमाणित कार्यपद्धती यापूर्वीच लागू करण्यात आली आहे.
मुंबई शहरात गेल्या ५४ आठवड्यांपासून संपूर्ण स्वच्छता मोहीम सुरू आहे. या मोहिमेला व्यापक स्वरूप देत दर शनिवारी प्रत्येक प्रशासकीय विभागात (वॉर्ड) नियमितपणे स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. संपूर्ण २२७ स्थानिक संस्था प्रभागांमध्ये ही मोहीम निरंतर सुरू आहे.
या अंतर्गत आज सर्व प्रशासकीय विभागात लोकसहभागातून संपूर्ण स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. दरम्यान, स्वच्छतेचे नियमभंग करणाऱ्या नागरिकांकडून २ हजार ५०० रुपयांचा दंड देखील वसूल करण्यात आला आहे.
१ हजार ६८२ कामगार, कर्मचाऱ्यांची कामगिरी
यामध्ये, १ हजार ६८२ कामगार, कर्मचाऱ्यांनी १९० संयंत्राच्या सहाय्याने ही कामगिरी केली आहे. जेसीबी, डंपर, कॉम्पॅक्टर, मेकॅनिकल स्वीपर, ई-स्वीपर, लीटर पीकर मशीन, कचरा संकलन करणारी वाहने, पाण्याचे टँकर अशी विविध आणि फायरेक्स मशीन, मिस्टींग मशीन यासह अन्य अद्ययावत यंत्रणा दिमतीला होती.