Saturday, May 10, 2025

महाराष्ट्रब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

Dr. Manmohan Singh : देशाने एक उमदा प्रशासक, अर्थतज्ञ गमावला - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Dr. Manmohan Singh : देशाने एक उमदा प्रशासक, अर्थतज्ञ गमावला - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग(Dr. Manmohan Singh) यांच्या निधनाने देशाने एक उमदा प्रशासक, अर्थतज्ञ गमावला आहे, अशी शोकसंवेदना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.


आपल्या शोकसंदेशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, अर्थमंत्री, पंतप्रधान अशा विविध भूमिकांमधून त्यांनी काम केले आणि देशवासियांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. भारताच्या राजकारणात स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अर्थशास्त्राशी संबंधित विपूल लेखन सुद्धा त्यांनी केले. त्यांनी केलेले कार्य कायम देशवासियांच्या स्मरणात राहील. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि चाहत्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. हे दु:ख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबीयांना लाभो, अशी मी प्रार्थना करतो.


राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला. डॉ मनमोहन सिंग यांनी आधी वित्तमंत्री आणि नंतर पंतप्रधान असतांना देशाच्या आर्थिक विकासाला वेग देणारी दमदार पाऊले उचलली आणि अर्थव्यवस्थेचे दरवाजे खुले करून एक नवी आर्थिक क्रांती आणली, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली श्रद्धांजली वाहिली आहे.



साध्या सरळ आणि शांत स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या मनमोहन सिंग यांनी एक नामवंत अर्थतज्ञ म्हणून ख्याती मिळवली होती. त्यांच्या निधनाने एक धोरणी आणि हुशार असा ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि दूरदृष्टी असलेले राजकीय नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली वाहिली.



राजकीय, सामाजिक, आर्थिक क्षेत्राची मोठी हानी - उपमुख्यमंत्री अजित पवार


भारतासारख्या विकसनशील देशाला जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरणाच्या वाटेवर नेण्याचा क्रांतिकारी निर्णय घेणारे आणि तो निर्णय कमालीचा यशस्वी करुन दाखवणारे देशाचे माजी पंतप्रधान, जागतिक किर्तीचे अर्थतज्ञ डॉ. मनमोहनसिंह यांचं निधन ही देशाच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक क्षेत्राची मोठी हानी आहे. भारताला आर्थिक महासत्ता बनवण्याच्या कार्याचा पाया डॉ. मनमोहनसिंह यांनी रचला. गेल्या अनेक दशकात आलेल्या प्रत्येक जागतिक मंदीसमोर भारताची अर्थव्यवस्था पाय घट्ट रोवून भक्कमपणे उभी राहिली, याचं बहुतांश श्रेय डॉ. मनमोहनसिंह यांनी देशाचे अर्थमंत्री आणि पंतप्रधान म्हणून त्याकाळात घेतलेल्या दूरदष्टीपूर्ण निर्णयांना आहे, असे सांगत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी डॉ. मनमोहनसिंह यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन त्यांना आदरांजली वाहिली.



उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, डॉ. मनमोहनसिंह यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देशाचे अर्थमंत्री आणि पंतप्रधान म्हणून यशस्वीपणे काम केलं. जागतिक अर्थव्यवस्थेचा सखोल अभ्यास, दूरदष्टीपूर्ण निर्णय घेण्याची क्षमता आणि देशातील सर्वसामान्य जनतेच्या कल्याणाचा ध्यास या बळावर त्यांनी भारतीय अर्थव्यवस्था कठीण परिस्थितीतून रुळावर आणली. अर्थव्यवस्थेचा पाया अधिक मजबूत केला. मजबूत अर्थव्यवस्थेचा उपयोग समाजाला होईल याची काळजी घेतली. भारतीय अर्थव्यवस्थेला आज जे मजबूत स्वरुप प्राप्त झाले आहे, त्याचं मोठं श्रेय डॉ. मनमोहनसिंह यांना आहे. त्यांच्या निधनाने देशाचं सभ्य, सुसंस्कृत, विश्वासार्ह नेतृत्वं हरपलं आहे. देश आपल्या सुपुत्राला मुकला आहे. देशाचे यशस्वी अर्थमंत्री, साहसी पंतप्रधान आणि जनमानसाचा विश्वास प्राप्त केलेला नेता म्हणून ते कायम स्मरणात राहतील.

Comments
Add Comment