नवी दिल्ली: माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग(manmohan singh) यांचे वयाच्या ९२व्या वर्षी गुरूवारी निधन झाले. त्यांनी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. यातच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मनमोहन सिंग यांच्या समाधीसाठी मागणी केली आहे.
मल्लिकार्जुन खरगेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या फोनवर बातचीत करून तसेच एक पत्र लिहून अपील केले की मनमोहन सिंग यांचे अंत्यसंस्कार आणि स्मारकाची निर्मिती करणे ही त्यांच्यासाठी खरी श्रद्धांजली असेल.
मनमोहन सिंग यांच्यावर शनिवारी होणार अंत्यसंस्कार
मनमोहन सिंग यांच्यावर शनिवारी अंत्यसंस्कार केले जातील. याआधी त्यांचे पार्थिव शरीर शनिवारी सकाळी काँग्रेस कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवले जाईल. मनमोहन सिंग यांचे गुरूवारी निधन झाले होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस संसदीय दलाच्या प्रमुख सोनिया गांधी, पक्ष अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधींसह अनेक प्रमुख नेत्यांनी शुक्रवारी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निवासस्थानी जात श्रद्धांजली अर्पण केली.
तिरंग्यात लपेटलेले माजी पंतप्रधानांचे पार्थिव शरीर त्यांच्या निवासस्थानी फुलांनी सजवलेले ठेवले होते. यावेळेस मनमोहन सिंग यांची पत्नी गुरशरण कौर आणि कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते.
त्यांचे जीवन भविष्यातील अनेक पिढींसाठी शिकवण आहे – पंतप्रधान मोदी
पंतप्रधान मोदींनी मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण करताना त्यांच्या निधनामुळे देशात एक पोकळी निर्माण झाली आहे. मनमोहन सिंग यांना एक दयाळू व्यक्ती, विद्वान अर्थशास्त्री आणि आर्थिक सुधारणांद्वारे देशाला एका नव्या युगात नेणाऱे नेता म्हणून आठवले जातील.