मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या बॉर्डर – गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाच्या सॅम कोंस्टासला धक्का दिला. मेलबर्नच्या क्रिकेट मैदानावरील या घटनेचा व्हिडीओ थोड्याच वेळात व्हायरल झाला. कोहलीचा खांदा लागल्यामुळे कोंस्टासचा सहकारी उस्मान ख्वाजा संतापला. यानंतर विराट कोहली आणि उस्मान ख्वाजा यांच्यात शाब्दिक चकमक झाली. ही चकमक थोड्याच वेळात थांबली. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या शिस्तीचा भंग झाल्यामुळे प्रकरण सामनाधिकाऱ्यांकडे गेले. सामनाधिकाऱ्यांनी मैदानावरील वेगवेगळ्या कॅमेऱ्यांनी रेकॉर्ड केलेल्या या घटनेचा आढावा घेतला आणि विराट कोहलीवर दंडात्मक कारवाई केली.
Virat Kohli and Sam Konstas exchanged a heated moment on the MCG. #AUSvIND pic.twitter.com/QL13nZ9IGI
— cricket.com.au (@cricketcomau) December 26, 2024
विराट कोहलीच्या मेलबर्न कसोटीच्या मानधनातील वीस टक्के रक्कम कापून दंड म्हणून वसूल करण्याचे आदेश सामनाधिकाऱ्यांनी दिले. तसेच शिस्तभंग प्रकरणी विराटला एक डिमेरिट गुण देण्यात आला. डीमेरिट गुण वाढल्यास खेळाडूच्या आयसीसी रँकिंगवर प्रतिकूल परिणाम होतो. यामुळे सामनाधिकाऱ्यांची केलेल्या कारवाईची जाणीव ठेवून कोहली भविष्यात शिस्तभंग करणार नाही, अशी आशा क्रिकेट वर्तुळातून व्यक्त होत आहे.
Ind vs Aus : बॉक्सिंग डे कसोटीत विराट कोहली भडकला, सॅम कॉन्स्टासशी रंगला वाद, Video
आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी आयसीसीने आचारसंहिता तयार केली आहे. या आचारसंहितेनुसार क्रिकेटमध्ये कोणत्याही प्रकारचा अयोग्य शारीरिक संपर्क निषिद्ध आहे. खेळाडूंनी मुद्दाम, बेपर्वाईने आणि/किंवा निष्काळजीपणे दुसऱ्या खेळाडू किंवा पंच (अंपायर) यांच्या खांद्याला खांदा लावणे अथवा धक्का देणे निषिद्ध आहे. या नियमांतर्गत सामनाधिकाऱ्यांनी विराट कोहलीवर कारवाई केली आहे.
मेलबर्न कसोटीत नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताची गोलंदाजी सुरू झाली आणि दहाव्या षटकानंतर विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाचा नवोदीत सलामीवीर सॅम कोंस्टासला धक्का दिला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी कोहलीच्या कृत्याचा निषेध केला. विराट कोहलीने एक अनावश्यक कृती केली, असे मत भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांन व्यक्त केली.
मेलबर्न कसोटी
मेलबर्न कसोटीत पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात आतापर्यंत सहा बाद ३११ धावा केल्या आहेत. स्टीव्हन स्मिथ ६८ आणि पॅट कमिन्स ८ धावांवर खेळत आहे.
बॉर्डर – गावसकर ट्रॉफी (भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया)
पहिली कसोटी, पर्थ – भारताचा २९५ धावांनी विजय
दुसरी कसोटी, अॅडलेड – ऑस्ट्रेलियाचा दहा गडी राखून विजय
तिसरी कसोटी, ब्रिस्बेन – सामना अनिर्णित
चौथी कसोटी, मेलबर्न – खेळ सुरू आहे
पाचवी कसोटी, सिडनी – खेळ ३ जानेवारी २०२५ पासून सुरू होणार