मुंबई : आज नाताळसणानिमित्त अनेक कार्यालयांना सुट्टी असते. मात्र काही कार्यालयांना सुट्टी नसल्यामुळे कर्मचाऱ्यांना नोकरीच्या निमित्ताने घराबाहेर पडावे लागत आहे. परंतु मध्य रेल्वेचा (Central Railway) प्रवास करणाऱ्या या कर्मचाऱ्यांसह इतर प्रवाशांना ख्रिसमसच्या सुट्टीचा (christmas holiday) फटका बसत आहे.
नाताळसणाच्या सुट्टीमुळं मध्य रेल्वेने आज रविवारच्या वेळापत्रकाप्रमाणे लोकल चालविण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेच्या डीआरएम यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून यासंदर्भातील अधिकृत माहिती देण्यात आली. त्यामुळे आज काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांच्या प्रवासात अडथळे निर्माण होत असून नागरिकांनी वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा, असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.
मध्य रेल्वेवर दररोज १८१० लोकल सेवा चालवल्या जातात आणि रविवारी त्यापैकी सुमारे ३५० ते ४०० लोकल कमी धावतात. दरम्यान, आज प्रवाशांना रेल्वे गर्दीचा त्रास कमी राहणार असला तरीही रेल्वेच्या वेळापत्रकातील या बदलामुळे दररोजच्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.