विश्वनाथन आनंदनंतर भारताचा दुसरा विश्वविजेता- ११ वर्षांनी देशाला मिळाला पुन्हा मान
मुंबई : भारताचा युवा स्टार डी गुकेश बुद्धिबळ विश्वाचा नवा चॅम्पियन बनला आहे. सिंगापूर येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत गुकेशने चीनच्या डिंग लिरेनचा पराभव करून विजेतेपद पटकावले. यासह गुकेश बुद्धिबळाच्या इतिहासातील सर्वांत युवा विश्वविजेता ठरला आहे. विश्वनाथ आनंदनंतर दुसरा विश्वविजेता बनला आहे.
गुकेश हा केवळ 18 वर्षांचा असून तो जगातील सर्वांत तरुण विश्वविजेता ठरला आहे. गुकेशने याआधी गॅरी कास्पोरोव्ह याचा विक्रमही मोडला. गुकेशची कामगिरी ही भारतीयांसाठी अभिमानास्पद ठरली आहे. त्याच्या आधी विश्वनाथन आनंदने 2012 मध्ये बुद्धिबळ चॅम्पियन बनला होता. गुकेशने याआधी वयाच्या 17 व्या वर्षी FIDE ही मानाची बुद्धिबळ स्पर्धाही जिंकली होती. आज गुरुवारी (12 डिसेंबर) चॅम्पियनशिपच्या १४व्या आणि शेवटच्या फेरीत दोघांमध्ये चुरशीची स्पर्धा झाली, यात गतविजेता लिरेन याने एक छोटीशी चूक केली, जी त्याला महागात पडली. त्याने चीनच्या लिरेनचा 14 डावानंतर 7.5-6.5 अशा गुणांनी पराभव केला. यासह वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी भारताच्या गुकेशने विश्वविजेता बनून विक्रम केला. गुकेशच्या आधी 2013 साली भारताच्या विश्वनाथन आनंदने जागतिक बुद्धिबळ विजेतेपद मिळवले होते. त्यानंतर ११ वर्षांनी देशाला हा मान पुन्हा मिळाला आहे.
डी गुकेश यांचे पूर्ण नाव डोमराजू गुकेश असून तो मूळचा चेन्नईचा रहिवासी आहे. त्याचा जन्म 7 मे 2006 रोजी चेन्नई येथे झाला. त्याने वयाच्या सातव्या वर्षी बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली. त्याला सुरुवातीला भास्कर नागय्या यांनी प्रशिक्षण दिले. नागय्या हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील बुद्धिबळपटू आहेत तसेच ते चेन्नईमध्ये होम चेस ट्यूटर आहेत. त्यांच्यानंतर विश्वनाथन आनंदने गुकेशला खेळाची माहिती देण्याबरोबरच त्याला प्रशिक्षणही दिले. गुकेशचे वडील डॉक्टर असून आई व्यवसायाने मायक्रोबायोलॉजिस्ट आहे.