प्रतिभारंग – प्रा. प्रतिभा सराफ
‘पार्टी’ या शब्दातच गंमत आहे. कोणी पार्टी देतेय म्हटले की, सगळे बरोबर पोहोचतात. कोणीही कोणतेही कारण देत नाही. पार्टी म्हणजे मज्जा-हसायचे, खेळायचे, गायचे, नाचायचे आणि खूप वेगवेगळे पदार्थ पोट सुटेस्तोर खायचे. आता फक्त खायचे हा शब्द बरोबर वाटत नाही ना? ‘प्यायचे’सुद्धा. आता इथे पिणे म्हणजे काही ‘ताक’ नाही हो. ‘पिणे’ म्हणजे ड्रिंक्स. ड्रिंक्स म्हणजे कोल्ड्रिंक अजिबातच नाही. ड्रिंक्स म्हणजे शुद्ध मराठीत दारू. हो, इंग्रजीत त्याला खूप छान छान शब्द आहेत वाईन, बियर वगैरे वगैरे.
तर परत मूळ मुद्द्याकडे वळते. एकदा शाळेतल्या मित्राने नवीन घर घेतले म्हणून सर्व शाळासोबती त्याच्या घरी गेलो होतो. तो सारखा ‘जेवून घ्या’ म्हणत होता. आमच्यातले काही मित्र म्हणाले हा खरंच ‘जेवून घ्या’ म्हणतोय का? मला तर सपाटून भूक लागली होती. मी म्हटले, “अरे त्याने दोनदा सांगितलंय.” त्यावर मुले रेंगाळत राहिली. नशीब माझ्याबरोबर एक मैत्रीण आली आणि मी सरळ ताट घेऊन जेवायला सुरुवात केली. आम्हा दोघींचे जेवण झाले तरी आमचे अर्धे मित्र काही जेवायला आले नाहीत. त्यांचे आपसात काय बोलणे झाले किंवा ज्याने नवीन घर घेतले होते त्याच्याशी काय बोलणे झाले, हे ऐकायला आम्ही नव्हतो पण ते सगळे म्हणाले, “जवळचं चांगलं हॉटेल आहे तिथे आम्ही जेवायला चाललोय.”
आम्हा दोघींना काहीच कळले नाही. मी म्हटले, “आमचं तर जेवण झालंय.” तर ते म्हणाले, “आपण बसू शकता!” आता ‘बसूया’ या शब्दाचा अर्थसुद्धा मला अलीकडे कळला होता. सगळे जमले आहेत तर पार्टी झालीच पाहिजे, फक्त जेवायचे म्हणजे चुकीचे आहे. त्याआधी दारू पिणे आणि मग जेवणे हे त्यांना संयुक्तिक वाटते. मी मात्र दुसऱ्या दिवशी सकाळचे कॉलेज आहे सांगून तिथून सटकले. माझी मैत्रीण जी माझ्याबरोबर जेवली होती ती त्यांच्याबरोबर गेली.
काही दिवसांनंतर आम्ही काही मित्रमैत्रिणी एका हॉटेलमध्ये गेलो. प्रत्येकाला त्याचा ‘ब्रँड’ विचारण्यात आला. मी ‘घेत नाही’, असे सांगितले. त्यावर माझा मित्र म्हणाला, “जो घेणार नाही त्यांनी आजच्या पार्टीचे बिल द्यायचे.” या वाक्याने प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे न पिणाऱ्याची कधी कधी घुसमट होऊन जाते, तशीच माझी झाली. मित्र-मैत्रिणी हे काय प्रकरण आहे ते तुम्हाला माहीतच आहे. म्हणजे ते पिण्याच्या आधी जे बोलतात ते प्यायल्यानंतरही विसरत नाहीत! जोक अपार्ट.
माझा एक मित्र गावातल्या मळ्यामध्ये राहतो. त्यानेच सांगितलेली गोष्ट, आज मी तुम्हाला सांगते. हा मित्र गावात फिरायला गेला तेव्हा दहा-बारा मित्र भेटले. ते म्हणाले की, खूप दिवसांमध्ये निवांतपणे भेटलेलो नाही, तर तुझ्या मळ्यामध्येच आपण जाऊन मस्त गप्पा करू! तो म्हणाला,
“काही हरकत नाही, चला.”
मग आमचा मित्र घरात शिरताच त्याची बायको म्हणाली,
“अहो, तुम्ही इतक्या मित्रांना घेऊन आलात पण मी तुम्हाला सांगायचे विसरले की, तुम्ही बाहेर जात आहात तर साखर घेऊन या. घरात अजिबात साखर नाही.”
मित्र तिच्याकडे दोन मिनिटे शांतपणे पाहत राहिला आणि म्हणाला,
“तू काळजी करू नकोस. चहा बनव. मी काय ते पाहतो.”
घरात होते ते फरसाण, चिवडा, लाडू, बिस्किटं वगैरे त्याने बाहेर आणून ठेवले. शाळेतले लंगोटीयार, खाण्याचे पदार्थ बाहेर येताच त्यांनी त्याच्यावर मस्त ताव मारला. शाळेतला मित्र स्वयंपाकघरातून चहाने भरलेला ट्रे बाहेर घेऊन आला. कोणाच्याही हातात चहा देण्याच्या आधी तो म्हणाला,
“आज मी आणि बायकोने मिळून एक गंमत केली आहे.” हे ऐकून सगळे आश्चर्यचकित झाले आणि मित्र पुढे काय बोलणार यासाठी सगळ्यांनी कान टवकारले. मित्र पुढे बोलला,
“आज आम्ही मुद्दाम एक कप चहा हा बिनासाखरेचा बनवला आहे. ज्याला तो बिनासाखरेचा चहा आला असेल त्याने आमच्याकडून साखर मागून घ्यावी; परंतु त्याने उद्या त्याच्या घरी मित्रांना पार्टी द्यायची आहे.”
सगळे गंभीर झाले आणि मनातून घाबरले की काय ब्याद आहे. उद्याच्या उद्या पार्टी? ‘पार्टी घेणे’ ही गोष्ट जितकी सरळ साधी सोपी आहे आणि खूप आनंददायी तितकीच ‘पार्टी देणे’ ही कठीण आणि त्रासदायक गोष्ट आहे असे बहुतेकांना वाटते. सगळ्यांनी एक एक कप उचलला आणि चहा प्यायला सुरुवात केली. त्यानंतर माझ्या मित्रांनी दोन-तीनदा सगळ्यांना विचारले की, कोणाच्या चहात साखर नाही, तर एकानेही माझ्या चहात साखर नाही, असे सांगितले नाही. मित्राने आपल्या हुशारीने घरात साखर नसल्याचा प्रसंग तारून नेला.
एकंदरीत काय तर पार्टी घेतली तर पार्टी देण्याची मानसिकता ठेवावी. आपल्या कुवतीप्रमाणे निश्चितपणे आपण कधीतरी कोणाला तरी पार्टी देऊ शकतो. पार्टी म्हणजे सर्वांचे एकत्रित जमणे, हास्यविनोद, गप्पागोष्टी, खाणेपिणे, नाचगाणे आणि रूक्ष आणि रुटीन आयुष्यातील ताणेबाणे विसरून खऱ्या अर्थाने काही काळ स्वतःसाठी जगणे!