मस्कत : भारतीय ज्युनियर हॉकी संघाने (Hockey Team India) चमकदार कामगिरी करत सलग तिसऱ्यांदा पुरुषांच्या ज्युनियर आशिया चषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. पुरुष ज्युनियर आशिया चषक २०२४ च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा ५-३ ने पराभव केला आहे. टीम इंडिया हॉकी स्पर्धेत पुन्हा एकदा चॅम्पियन बनली आहे. या विजयात अरायजितसिंग हुंदलची भूमिका महत्त्वाची ठरली. त्याने स्फोटक खेळ करत ४ गोल केले. त्याच्या मदतीने गतविजेत्या भारताने बुधवारी झालेल्या पुरुषांच्या ज्युनियर आशिया चषकाच्या अंतिम फेरीत दिमाखात विजय मिळवला. आशियाई स्पर्धेतील भारताचे हे पाचवे विजेतेपद आहे.
या सामन्यातील पहिला गोल पाकिस्तानने केला. त्याच्यासाठी हनान शाहितने पहिल्या क्वार्टरच्या तिसऱ्याच मिनिटाला गोल केला होता. मात्र यानंतर लगेचच भारताने पुनरागमन केले. टीम इंडियासाठी अरिजित सिंगने पेनल्टी कॉर्नरचे यशस्वी रूपांतर करत चौथ्या मिनिटाला गोल केला. अशाप्रकारे पहिल्या क्वार्टरअखेर दोन्ही संघ १-१ असे बरोबरीत होते. दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने आपला खेळ सुधारला आणि त्याला १८व्या मिनिटाला दुसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला जो हुंदलने गोलमध्ये रुपांतरित केला. एका मिनिटानंतर दिलराजने केलेल्या उत्कृष्ट मैदानी गोलने भारताची आघाडी ३-१ अशी वाढली. ३०व्या मिनिटाला एक आणि ३९ व्या मिनिटाला दुसरा असे सुफियानच्या पेनल्टी कॉर्नरच्या गोलमुळे पाकिस्तानने सामना पुन्हा बरोबरीत आणला.
तिसरा क्वार्टर पाकिस्तानसाठी चांगला होता. सुफियानने ३९व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरला यश मिळवून दिले. तिसऱ्या क्वार्टरच्या अखेरपर्यंत भारत आणि पाकिस्तानचे संघ ३-३ असे बरोबरीत होते. भारताने ४७व्या मिनिटाला तिसरा पेनल्टी कॉर्नर जिंकला पण हुंदलचा तो फटका पाकिस्तानचा गोलरक्षक मुहम्मद जंजुआने वाचवला. तरीही हुंदलने काही सेकंदांनी मैदानी गोल करत भारताला पुन्हा आघाडी मिळवून दिली. भारताने (Hockey Team India) शेवटच्या १० मिनिटांत पाकिस्तानवर जोरदार दबाव आणला आणि आणखी काही पेनल्टी कॉर्नर जिंकले. त्यात हुंदलने पुन्हा एकदा शानदार व्हेरिएशन गोल करून संघाला ५-३ असा विजय मिळवून दिला.