Saturday, February 8, 2025
Homeसंपादकीयअग्रलेखCM Devendra Fadnavis : देवाभाऊ होणार तिसऱ्यांदा मुख्यमंत्री

CM Devendra Fadnavis : देवाभाऊ होणार तिसऱ्यांदा मुख्यमंत्री

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची माळ अखेरीस गुरुवारी, ५ डिसेंबरला देवेंद्र फडणवीसांच्या गळ्यात पडणार आहे. देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी बुधवारी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड केली. या सर्व निवड प्रक्रियेनंतर आता देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार, हे आता स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघांपैकी तब्बल २३० जागांचे दान महाराष्ट्रातील जनतेने भरभरून महायुतीच्या पारड्यात टाकले आहे. शहरी भागातील सुशिक्षित मतदारांनी पंतप्रधान मोदी यांना पाहूनच भाजपाला मतदान केले असले तरी ग्रामीण भागात भाजपाकडून मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हेच विराजमान होणार हे गृहीत धरूनच भाजपाला मतदान झाले आहे, हे नाकारता येणार नाही. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या वादळी यशामुळे महाविकास आघाडीचा अक्षरश: पालापाचोळा उडाला. महाविकास आघाडीला सभागृहात विरोधी पक्षनेतेपदही मिळणार नाही. महायुतीच्या यशामध्ये महिला मतदारांचा सिंहाचा वाटा आहे.

महिला मतदारांमध्ये फडणवीस यांची ‘लाडक्या बहिणींचा देवाभाऊ’ अशीच प्रतिमा आहे. देवेंद्र फडणवीस यांची भाजपाच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड होताच महायुतीच्या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे उधाण आले असून शहरी व ग्रामीण भागात जल्लोष साजरा केला जात आहे. देवाभाऊंची जनसामान्यांमध्ये सोज्वळ प्रतिमा असली तरी राज्यकारभारात ते ‘खमक्या’ स्वभावाचे म्हणून ओळखले जात आहेत. चुकीच्या गोष्टींची पाठराखण न करणे, अयोग्य गोष्टींचे समर्थंन न करणे, गुन्हेगारांना वठणीवर आणणे अशा स्वरूपाची त्यांची कामगिरी गृहमंत्री म्हणून, मुख्यमंत्री म्हणून मंत्रालयातील प्रशासकीय सनदी अधिकाऱ्यांनी जवळून पाहिली आहे, अनुभवली आहे. देवेंद्र फडणवीस गुरुवारी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची तिसऱ्यांदा शपथ घेतील. शरद पवारांपाठोपाठ सर्वांधिक वेळा म्हणजेच तीन वेळा मुख्यमंत्रीपद मिळविण्याच्या विक्रमाची देवेंद्र फडणवीस यांनी बरोबरी केली आहे. सध्याची त्यांची वाटचाल व महाराष्ट्रीय जनतेचा त्यांना असलेला पाठिंबा पाहता ते शरद पवारांचाही मुख्यमंत्रीपदाचा विक्रम मोडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. २०१४ ते २०१९ या पाच वर्षांच्या कालावधीत सलगपणे पाच वर्षे देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे.

शरद पवार हे जरी महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री झाले असले तरी त्यांना सलग पाच वर्षे एकदाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविता आलेले नाही. जसे देवाभाऊंनी सलग पाच वर्षे मुख्यमंत्रीपद भूषविण्याचा विक्रम केला, तसाच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा कारभार अवघ्या ८० तासांकरिता सांभाळण्याचा विक्रमही देवाभाऊंच्या खात्यात जमा आहे. २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदावरून शिवसेनेशी वाद झाल्यावर अजित पवार व त्यांच्या समर्थंक आमदारांच्या पाठिंब्यावर देवाभाऊंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. पण हे सरकार अवघे ८० तासच टिकले. देवेंद्र फडणवीस यांचीच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी निवड होणार, याची जनतेलाही ठाम खात्री होती. आज फक्त त्या खात्रीवर, विश्वासावर, दाव्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

देवेंद्र फडणवीस यांना सभागृहात राज्याचा कारभार हाकताना विरोधकांचे संख्याबळ अत्यल्प असल्याने फारशा अडचणी येणार नाहीत. तथापि मुख्यमंत्रीपदाची काटेरी खुर्ची सांभाळताना त्यांना महायुतीमधील शिवसेना व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांची मर्जी सांभाळावी लागणार आहे. राज्यकारभार हाकताना निर्णय घेण्यापूर्वी महायुतीमधील मित्र दुखावले जाणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे. अर्थांत देवाभाऊ १९९९ पासून विधानसभेत सक्रिय असल्याने व त्यांची प्रतिमा अभ्यासू प्रशासक असल्याने त्यांना फारशा अडचणी येणार नाहीत. नगरसेवक ते मुख्यमंत्री अशी देवाभाऊंची वाटचाल असल्याने त्यांना सर्वसामन्य कार्यकर्ता ते विधान भवन यांचा अनुभव आहे. देवाभाऊंच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित राहणे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना शक्य नसले तरी दूरचित्रवाणीच्या माध्यमातून ते हा सोहळा पाहण्याची शक्यता आहे. देवाभाऊंच्या शपथविधीनंतर महाराष्ट्र राज्याच्या तिजोरीचाही त्यांना कानोसा घ्यावा लागणार आहे. सरकारने लोकसभा निवडणुकीनंतर अनेक जनकल्याणकारी योजनांचा शुभारंभ केला आहे. त्या योजना सुरू ठेवण्याचे अग्निदिव्य देवाभाऊंना पेलावे लागणार आहे. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेमुळे राज्याच्या अर्थकारणावर ‘बोजा’ आला असल्याचे बोलले जात आहे.

लाडक्या बहिणींना दर महिन्याला १,५०० रुपयांची भेट दिल्याने मतदान वाढल्याचे बोलले जात असल्याने ही योजना सुरू ठेवण्याची किमया देवेंद्र फडणवीस यांना साध्य करून दाखवावी लागणार आहे. ही योजना बंद पडल्यास अथवा ज्या महिलांना योजनेचा लाभ मिळाला आहे, त्या लाभधारकांची छाननीमध्ये कपात झाल्यास महिला वर्गाचामोठ्या प्रमाणावर रोष पत्करावा लागण्याची भीती आहे. याशिवाय फडणवीस मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच मराठा आरक्षणाबाबत सातत्याने आंदोलन करणारे मनोज जरांगे-पाटील पुन्हा मैदानात उतरण्याची शक्यता आहे. त्यातून मराठा व ओबीसी वादाचा कलगीतुरा रंगण्याची शक्यात आहे व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. लाडक्या बहीण योजनेसाठी निधीची उपलब्धता आणि मराठा-ओबीसी वाद या अडचणींची सलामी झडण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यावर सामना कराव्या लागणाऱ्या संभाव्य अडचणींची कल्पना देवाभाऊंना असणार. गुरुवारी देवाभाऊ मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत असताना राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये भाजपाकडून फटाके फोडून जल्लोष साजरा केला जाईल. महाराष्ट्रामध्ये महायुतीला मिळालेले भरघोस यश व भाजपाचे प्रथमच इतक्या संख्येने निवडून आलेले आमदार ही देवेंद्र फडणवीसांच्या कार्याची पोहोचपावती आहे. भाजपाने देवेंद्र फडणवीसांकडे मुख्यमंत्रीपद सोपविताना त्यांच्या परिश्रमाची पोहोचपावती दिलेली आहे. सभागृहाबाहेर व सभागृहात कितीही अडचणी निर्माण झाल्या तरी त्या अडचणींचा निवारण करण्यास देवेंद्र फडणवीस सक्षम आहेत. त्यांना महाराष्ट्राचा कारभार हाकताना महायुतीचाही कारभार सांभाळायचा आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -