पुणे : प्रो कबड्डी लीगच्या(Pro Kabaddi League) अकराव्या पर्वाचा अंतिम थरार पुण्यात पाहायला मिळणार आहे. अकराव्या पर्वातील हैदराबाद व नोएडा येथील दोन्ही टप्पे संपन्न झाले असून मंगळवारपासून या स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्याला शिवछत्रपती संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथील बॅडमिंटन हॉल येथे सुरुवात होणार आहे.पहिल्या टप्प्यात जी तीव्रता खेळामध्ये दिसून आली आहे, ती तीव्रता नोएडाच्या टप्प्यात आणखी वाढली.
आता, पुणे येथील टप्प्यात ती तीव्रता कळस गाठेल आणि स्पर्धेतील सामने जास्तीत जास्त चुरशीचे होतील, असे मशाल स्पोर्ट्सचे प्रमुख व कबड्डी लीगचे चेअरमन अनुपम गोस्वामी यांनी सांगितले. पुण्यामध्ये ३ ते २४ डिसेंबर दरम्यान स्पर्धेचा तिसरा टप्पा संपन्न होणार आहे. पुण्याचा टप्पा २४ डिसेंबर रोजी संपल्यानंतर येथेच २६ ते २८ डिसेंबर दरम्यान बाद फेरीचे सामने होणार आहेत. २६ आणि २७ डिसेंबर रोजी उपांत्य फेरीच्या लढती होणार आहे, त्यांपुर्वी एलिमिनिटर लढती होणार आहेत. २९ डिसेंबर रोजी येथेच अकराव्या हंगामाचा रोमहर्षक शेवट बघायला मिळणार आहे. पुणे टप्प्यातील पहिला व स्पर्धेतील ८९ वा सामना रात्री ८ वाजता बेंगळुरू बुल्स विरुद्ध गुजरात जायंट्स यांच्यात तर दुसरा सामना यू मुंबा विरुद्ध पुणेरी पलटण यांच्यामध्ये रात्री ९ वाजता सुरू होईल.
नोएडा येथील टप्प्यातील अखेरच्या दिवशी पार पडलेल्या दोन सामन्यात दबंग दिल्ली आणि पटणा पायरेट्स यांनी बाजी मारली. स्पर्धेतील ८७ व्या सामन्यात दबंग दिल्लीने तमिळ थलायवाजचा ३२-२१ अशा फरकाने तर ८८ व्या सामन्यात पटणा पायरेट्स संघाने बंगाल वॉरियर्सचा ३८-३५ अशा फरकाने पराभव केला. दरम्यान, प्रो कबड्डी लीग २०२४ मध्ये आतापर्यंत एकूण 88 सामने खेळले गेले आहेत आणि हरियाणा स्टीलर्स १५ सामन्यातील १२ विजय आणि ६१ गुणांसह पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर आहे. तर पाटणा पायरेट्स ५२ गुणांसह दुसऱ्या तर दंबग दिल्ली ४८ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.