नाशिक: आशिया खंडातील सर्वांत मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीसह जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांत सध्या कांद्याच्या भावात(Onion Price) चढउतार होत आहेत. कांद्याला सरासरी ४,१५१ रुपये बाजारभाव मिळाला. यातच लाल कांद्याची आवक वाढण्याचे चिन्ह दिसून येत आहेत. वातावरणातील बदलाचा परिणाम उत्पादनावर झाल्याचे दिसते आहे.
चांगल्या वातावरणात कांद्याचे अंदाजे एकरी सव्वाशे क्विंटलच्या आसपास उत्पादन शेतकऱ्यांनी घेतले आहे. पण सद्यःस्थितीत हवामानातील बदलामुळे उत्पादन ५० टक्क्यांनी घटल्याचे खेडलेझुंगे येथील कांदा उत्पादक शेतकरी गजानन घोटेकर यांनी सांगितले. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात लाल कांद्याचे ट्रॅक्टरमधून ३०९, तर पिक-अपमधून १००३ असे एकूण १,३१२ नगातून १६ हजार ३६२ क्विंटल लाल कांदा विक्रीसाठी आला होता. त्यास कमीत कमी १४००, जास्तीत जास्त ५,३५१ आणि सरासरी ४,१५१ रुपये भाव मिळाला.
हवामानात होणाऱ्या सततच्या बदलामुळे कांद्याच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. एकरी सव्वाशे ते दीडशे क्विंटल कांद्याचे उत्पादन घेणारा शेतकरी वारेमाप कष्ट करूनही ५० क्विंटल कांद्याचे उत्पादन घेऊ शकत नाही. एकरी कांद्याचे उत्पादन घेण्यासाठीचा खर्च ७०-८० हजार रुपये होतो. म्हणजे घटलेल्या उत्पादनातून मजुरी, खते व कीटकनाशके यांचा मेळ घालताना बळीराजाची मोठी दमछाक होत आहे. त्यामुळे आज जरी कांद्याला मिळणारा भाव जास्त वाटत असला, तरी त्यातून शेतकऱ्यांना म्हणावा तसा नफा होताना दिसत नाही.
शेतकरी हवालदिल
रासायनिक खते व कीटकनाशकांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यातच हवामानात सातत्याने होणाऱ्या बदलामुळे रासायनिक औषधांच्या फवारण्या आठ- नऊ दिवसांतून कराव्या लागत आहेत. कांदा लागवडीपासून ते काढणीपर्यंत साधारणतः सात-आठ फवारणी कराव्या लागत आहेत. एका फवारणीसाठी अंदाजे तीन हजारांपर्यंत खर्च येतो. यामुळे लागवडीपासून तणकाढणीपर्यंत खर्च मोठ्या प्रमाणावर येत आहे. त्यामुळे सध्या वाढलेले कांदा बाजारभाव हे फक्त दृश्यातील चित्र आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात मजुरीचेदेखील पैसे येत नाहीत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.