तुळजापूर : महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे (Tuljabhavani Devi) तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. नवसाला पावणाऱ्या तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी (Tuljabhavani Mandir) भाविकांची नेहमीच मोठी गर्दी असते. अशातच तुळजापूर देवी मंदिर समितीने देवी तिर्थक्षेत्राचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला आहे. (Tuljabhavani Temple Transformation)
मिळालेल्या माहितीनुसार, मंदिर समितीच्या स्वनिधीतून ५८ कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात आली आहेत. यामध्ये तुळजाभवानी मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार असलेल्या राजमाता जिजाऊ आणि राजे शहाजी महाद्वाराचा समावेश आहे. सध्या यासाठीचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार आहे.
तुळजाभवानी मंदिराच्या दोन्ही महाद्वाराचं स्ट्रक्चरल ऑडिट होणार आहे. ऑडिट रिपोर्ट नकारात्मक आला तर दोन्ही महाद्वार पाडून १०८ फुटी नवं महाद्वार बांधलं जाणार आहे. तर ऑडिट रिपोर्ट सकारात्मक आला तर दोन्ही महाद्वारांच्या मध्ये नवीन महाद्वार तयार बांधले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी दिली.
भाविकांची विशेष काळजी
पुरातत्व खात्याच्या निगराणीखाली कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिराच्या सभामंडपचा काही भाग पूर्ण पाडून पुन्हा नव्याने मजबूत केला जाणार आहे. तसेच मंदिरासह आजूबाजूचा भागही मोकळा करून घेतला जाणार आहे. दरम्यान याकाळात भाविक, पुजारी बांधव आणि व्यापारी वर्गाला त्याचा त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे
पुढील काळात लिफ्ट आणि रॅम्प उभारणार
तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येणार्या ज्येष्ठ आणि दिव्यांग भाविकांच्या सुविधेसाठी पुढील काळात लिफ्ट आणि रॅम्पची व्यवस्थाही केली जाणार आहे. तुळजाभवानी देवीच्या दर्शनानंतर प्रत्येक भक्त हा अत्यंत उत्साहात आणि समाधानाने आपल्या घरी जावा, असेही नियोजन करण्यात येत आहे.