Saturday, February 15, 2025

आयुष्याचा खो-खो

ऋतुराज – ऋतुजा केळकर

आज अचानक लहानपणी खेळलेला एक खेळ आठवला, ‘खो-खो’. आपण साऱ्यांनीच हा खेळ अगदी मनापासून आणि आनंदाने खेळला असेल नाही…! एक धावणारा खेळाडू आणि एक त्याला पकडणारा. त्या धावणाऱ्या खेळाडूला कसेही वेडेवाकडे धावण्याची मुभा असते पण पकडणारा मात्र फक्त एकाच दिशेने धावत असतो. पण जर का त्याला दिशा बदलायची असेल, तर तो कुणालाही खो देऊन आपले राज्य देऊ शकतो आणि मग तो दुसरा खेळाडू तिसऱ्याला असे करता करता अखेरीस तो धावणारा पकडला जातो.

पुरुष सुक्त

आयुष्यात सुख आणि दुःख याचे असेच असते, सुख कधी कसे दुःखाला खो देईल ते सांगता येत नाही. आपल्या आयुष्यात नक्की काय आणि कसे येणार आहे हे आपण कधीच सांगू शकत नाही. अगदी भाकीत सांगणारे ज्योतिष्यांबद्दल ही बोलायचे झाले तर चार ज्योतिषी चार वेगवेगळी भाकितं सांगतात. कोणावर आपण विश्वास ठेवायचा ते आपण ठरवून प्राप्त परिस्थितीत कुणी काय करायचे ते ज्याचे त्याने ठरवायचे असते असे मला वाटते. इथे मी नक्कीच हेही म्हणेन की, अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे हे ही तितकेच महत्त्वपूर्ण आहे कारण, एकतर त्यांनी आपल्यापेक्षा चार पावसाळे जास्त पाहिलेले असतात त्यामुळे कायम पुढे काय वाढून ठेवलंय हे माहिती नसले तरीही निदान अनुभवातून आलेले शहाणपण हे नक्कीच आपल्याला उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जाते.

पुढे जाऊन मी म्हणेन की, कायम, ‘कुत्ते भोंकतें हैं, हाथी चलता हैं’ ही वृत्ती अंगी बाळगावी कसे आहे ना, आता मी नोकरी सोडली माझे ते सात-तास प्रवासात जातात… माझ्या तब्येतीवर परिणाम होतो म्हणून हे माझे मला माहिती ना? मग कुणीतरी काहीतरी अपप्रचार करतं असेल तर ते त्याचे कर्म, मग ते मी दुरुस्त कशाला करू त्याचे शासन त्याला ब्रम्हांडनायकच देईल मी कशाला त्याचा त्रास करून घेऊ. शिवाय आपल्या आयुष्यात जे घडतं ते फक्त वेळ आणि परिस्थितीही ठरवत असली तरीही त्यातील चांगल्या गोष्टी कशा टिकतील, वाढतील, बहरतील हे आपण आपल्या वर्तणुकीतून आणि निर्णयातून पाहिले पाहिजे.

हल्ली मी सकाळ संध्याकाळ मस्तपैकी फिरायला जाते तिथे अचानक मनात आले की, सुखदुःख हे पळणाऱ्या ढगांसारखे आहे, एक गेला की दुसरा हजर असतो. कधी सुखाचे निळ्याशार, निर्भर आकाश तर कधी काळेशार आभाळं. बघा हं ‘आकाश’ म्हणजे स्वच्छ तसेच नितळ आणि आभाळ म्हणजे, भरून आलेलं… ढगाळलेलं… आता या आभाळातील ढगात आपण ससा, हरिण किंवा मोर या आकृत्या शोधून आपले आयुष्य हसरे, खेळकर, आनंदी करायचे की राक्षस… चेटकीण… शोधून भयाच्या सावलीत काढायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे असते. कारण शुभंकर हे प्रत्येक गोष्टीत असते फक्त तेच आपण उचलावे. सकारात्मक तेच घ्यावे म्हणजे वाईट वाकड्या गोष्टी आपल्या आजूबाजूला फिरकतही नाहीत. आपण सारीच देवाची बाळं आहोत त्यामुळे तो जेव्हा आपल्याकरिता एक दरवाजा बंद करतो ना तेव्हा त्याने दुसरा दरवाजा आपल्याकरिता आधीच उघडून ठेवलेला असतो. हा विचार मनी बाळगला ना, तर यामुळे दोन गोष्टी घडतात एक तर आल्या प्रसंगाला आपण उत्तम पद्धतीने सामोरे जातो आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसरे चांगले मार्ग आपल्याला सापडतात.

सर्वात शेवटी मी असे म्हणेन की, आयुष्य हे अखेरीस तुमचे स्वतःचे आहे मग ते हसत हसत जगायचे की रडत रडत ते शेवटी तुमचे तुम्हीच ठरवायचे असते. या जगात आलेला कुणीही अमरत्वाचा पट्टा घेऊन आलेला नाही. मग आपण मेल्यावर, ‘एक भेकड, रड्या मेला बरं झालं’ असे आपल्याबद्दल कुणी म्हटलेले तुम्हाला चालेल की , ‘एक निडर, दिलखुलास दिलेर व्यक्तीमत्त्व लोप पावलं’ म्हणून समोरच्याच्या डोळ्यांत अश्रू आलेले तुम्हाला आवडेल…? सांगा बरं?

आणि यशाचेच म्हणाल ना, तर कसे आहे ना, आज आपण यशाच्या शिखरावर असलो तरी परिस्थिती कशी कुणाला धुळीला मिळवेल ते सांगता येत नाही. बरेचदा आपलेच मित्र-मैत्रिणी सगेसोयरेच याला कारणीभूत ठरतात. त्यामुळे आपणच आपल्या आयुष्याचे शिल्पकार होणे गरजेचे आहे. आता ताजमहालाचेच पाहा ना, कुणी त्याला जगातील सात आश्चर्यांपैकी एक आश्चर्य, एक सुंदर, सुरेख, शिल्प, प्रेमाचे मुर्तीमंत प्रतीक मानतात, तर कुणी त्याला ‘थडगं’ म्हणून संबोधतात. प्रत्येकाच्या विचारांतील किंवा दृष्टिकोनांतील हा फरक आहे असे मी म्हणेन.

नाण्याला नेहमीच दोन बाजू असतात आपण त्याच्याकडे कुठल्या बाजूने पाहतोय यावर सारे अवलंबून असते. म्हणूनच जिवनाच्या ‘खो खो’ मध्ये मृत्यूचा ‘खो’ बसण्याआधीच आपण दुःखाच्या विराण्या गात आयुष्य वैराण करण्याऐवजी, श्रमाच्या, सद्भावनांच्या श्रावणात मृद्गंधी झारीने ऋतू बदलावर लक्ष केंद्रित करून आपल्या जीवनशैली भावभावनांच्या आणि नात्यांच्या रेशमी इंद्रधनूने असे सप्तरंगी करा की, तृप्तीचा तृष्णेचा घुंगरूवाळा उन्नत आनंदाच्या देवचाफ्याच्या पुनर्बाधणीमुळे, परमोच्च परमसुखाच्या अनवट नक्षीदार लामण दिव्यांतील यशाचे अत्तर थेंब आपल्या जीवनात नक्कीच कायम दरवळत राहतील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -