ऋतुराज – ऋतुजा केळकर
जवळ जवळ एक वर्षापूर्वी एका काॅन्स्टेबलने पालघर येथे अंधाधुंद गोळीबार केला. त्यात काहीजणांचा मृत्यू झाला. खरं तर पोलीस हे कायद्याचे रक्षक असतात. तरीही त्यांच्या हातून असं कृत्य घडावं? काय कारण असेल बरं या मागे?
काल अचानक पोलीस स्टेशनमधून फोन आला, “मॅडम जरा मदत हवी आहे येता का लवकर?” जाऊन पाहते तर तिशीतल्या दोन मुलांना पोलिसांनी पकडलं होतं, त्या दोघांनी एका छोट्याशा मुलीला पळवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्याशी बोलताना खूप व्यथित झाले मी, त्यांनी सांगितलं “आम्ही दोघंही इंजिनिअर आहोत. नोकरी नाहीये आम्हाला. जिथे जातो तिथे नकार मिळतोय.
क्वालिफीकेशनमुळे रिजेक्ट झालो असतो, तर नसतं इतकं वाईट वाटलं पण; रिजेक्ट होतोय ते टी-शर्टची बटण उघडी टाकून, लाडेलाडे बोलून, वेळप्रसंगी अगदी आणखी पुढची पावलं टाकून नोकरी मिळवणाऱ्या या मुलींमुळे. नोकरी नाही तर घर नाही, घर नाही तर लग्न नाही, मग समाजात स्थान नाही. बरं हमाली करावी तर स्टेटस आडवं येतं. मग आम्ही करू तरी काय?”
खरंच गोळीबार करणारा तो काॅन्स्टेबल काय किंवा ही उच्च शिक्षित मुलं काय खरंच कोण चुकतं?
पुरुषांना आपण जन्मजात कायम शिकवत आलोय की,” तू पुरुष आहेस तुला रडणं शोभत नाही, तू स्टाॅगचं असलं पाहिजेस. “घरात एखादा मृत्यू झाला तरीही पाहा धाय मोकलून स्त्रियाच मोकळेपणाने रडू शकतात पण; पुरुषांना आपल्या समाजात तशी मुभा नसते. का त्यांना मन नाही? त्यांना भावना नाहीत? घराची जबाबदारी सांभाळताना त्यांचंही मन भावभावनांच्या हिंदोळ्यावर हेलकावे घेतच ना? त्यांच्याही काही इच्छा-आकांक्षा असतीलच ना? पण स्त्रीयांच्या तुलनेत पुरुषांच्या बाबतीत आपला समाज हा कायम कठोरच असतो. स्त्री ही नाजूक सोनसळी तर पुरुष हा रांगडा दगडासारखा हवा. द्वादश पाकळ्यांच्या भावभावनांचे त्याचे कमळरूपी मन हे कधीतरी मद-मोह-मत्सर या शड़रिपूंच्या बेभान लाटांनी उद्ध्वस्त होऊ शकते ना?
मग या सुखाचा मुखवटा बाळगता बाळगता हे पुरुषच एक मुखवटा होतात आणि मग मुखवट्यांच्या या जगात स्वतःचं अस्तित्वच हरवून बसतात, अन् मग द्वैत-अद्वैताचा आक्रंद उठतो मनात, यशापयशाच्या तराजूत स्वतःला तोलता तोलता मनात दाटून आलेले घन स्वप्न नगरीच्या पडशाळेत अलौकिक आदर्शांच्या शोधात नवनव्या ठिणग्यांनी करपून जातात.
मग हे असे त्या काॅन्स्टेबल सारखे किंवा या मुलांसारखे पडसाद उमटतात.
काय वाटतं तुम्हाला त्यांना नसतील का आव्हानं? नसतील का त्यांना अडचणी? कित्येकदा ऑफिसमध्येही ती स्त्री आहे तिला लवकर जाऊ दे असं म्हणून पुरुषांना जास्त काम देऊन चेपटवण्यात येतं. बदल्यांच्या वेळी ही तसंच का, पुरुषांना घर नसतं? त्यांना कुटुंब नसतं का? त्यातील जीवाभावाच्या माणसांची ओढ नसते का त्याला?
पण एक मात्र नक्की खरं जबाबदाऱ्यांच्या या ओझ्याखाली चेपलेला हा पुरुष कधीच हरत नाही. त्याला हरून चालत ही नाही. कारण शेवटी स्त्री ही शक्ती असेल तर पुरुषांकडे तर्क कठोर बुद्धिमत्ता आहे. स्त्री ही ममतेची ज्योत तेववत असेल, तर पुरुषांकडे धर्माची मशाल सांभाळण्याची जबाबदारी आहे. स्त्री ही सृजनतेच प्रतीक असेल तर पुरुषांकडे चैतन्य निर्माण करण्याची ताकद आहे. स्त्रीच्या भावमय अस्तित्वाचे गोडवे गाताना पुरुष हा परमात्म्याचं प्रतीक आहे हे विसरून चालणार नाही आणि त्याला जर जपलं नाही, तर स्त्री-पुरुषांची ही जीवननौका या संसार सागरात न तरता बुडून जाईल, म्हणूनच आकाशासारख्या विशाल प्रसंगी अग्नीसारख्या दाहक होणाऱ्या या पुरुषांना आपल्या प्रेमाने, भक्तीने जिंका. मग पाहा आपली प्रपंच रूपी नौका कशी सुरळीत भवसागर तरून पार जाईल.