नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया कसोटी सामना निर्णायक वळणावर आला आहे. भारताने पहिल्या डावात १५० धावा केल्या आणि दुसऱ्या डावात ४८७ धावा करत डाव घोषित केला. ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी ५३४ धावांचे आव्हान दिले आहे. भारताने पहिल्या कसोटीत चमकदार कामगिरीचे दर्शन घडवले आहे. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर कर्णधार जसप्रीत बुमराहने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारताचा डाव १५० धावांवरच आटोपला. त्यामुळे भारताचं काही खरं असंच वाटत होतं. पण कर्णधार आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाचा डाव फक्त १०४ धावांवर आटोपला. त्यामुळे भारताला आधीच ४६ धावांची आघाडी मिळाली होती. या आघाडीसह पुढे खेळताना ओपनिंगला आलेल्या केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल जोडीने चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी या दोघांनी २०१ धावांची भागीदारी केली. त्यामुळे दुसऱ्या डावात टीम इंडिया मजबूत स्थितीत आली. यशस्वी जयस्वालने २९७ चेंडूत १५ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने १६१ धावा केल्या. तर केएल राहुलने १७६ चेंडूंचा सामना करत ५ चौकारांच्या मदतीने ७७ धावांची खेळी केली. त्यानंतर आलेल्या विराट कोहलीने जबरदस्त कामगिरी केली.
AUS vs IND: षटकारासह यशस्वीचे दमदार शतक, भारताकडे अडीचशे पार आघाडी
यशस्वी जैस्वालनंतर विराट कोहलीनेही पर्थ कसोटी सामन्यात शानदार शतक झळकावून नवा इतिहास लिहिला आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी चहापानाच्या विश्रांतीनंतर कोहलीने शानदार पद्धतीने शतक पूर्ण केले. कोहलीने आपल्या कसोटी कारकिर्दीतील ३० वे शतक १४३ चेंडूत पूर्ण केले. अशा प्रकारे कोहलीने गेल्या १ वर्ष ४ महिन्यांपासून सुरू असलेला शतकाचा दुष्काळ संपवला. कोहलीचे मागील शतक वेस्ट इंडिजविरुद्ध जुलै २०२३ मध्ये पोर्ट ऑफ स्पेन येथे झाले होते. आता या शतकाच्या जोरावर विराट कोहलीने सचिन तेंडुलकर आणि डॉन ब्रॅडमन यांना मागे टाकले आहे.
विराट कोहली आता ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा परदेशी खेळाडू ठरला आहे. कोहलीने जॅक हॉब्सचा ९ शतकांचा विक्रम मोडला. कोहलीच्या नावावर आता ऑस्ट्रेलियात कांगारू संघाविरुद्ध तिन्ही फॉरमॅटमध्ये १० शतके आहेत. इतकेच नाही तर कोहलीने सर्वाधिक कसोटी शतके झळकावण्याच्या बाबतीत महान ऑस्ट्रेलियन फलंदाज डॉन ब्रॅडमनलाही मागे टाकले आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध पर्थ येथे सुरु असलेल्या बॉर्डर गावस्कर मालिकेतील पहिल्या सामन्यात विराट कोहलीने धमाकेदार शतक झळकावून ही मोठी कामगिरी केली आहे.