Saturday, February 8, 2025
Homeताज्या घडामोडीPolling : सिंधुदुर्गात ६७.६० टक्के मतदान

Polling : सिंधुदुर्गात ६७.६० टक्के मतदान

तरुण चाकरमानी मोठ्या संख्येने मतदानासाठी जिल्हयात

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी या तीन विधानसभा मतदार संघातल्या ९२१ मतदान केंद्रावर आज सकाळी ७ वाजल्यापासून शांततेत मतदानाला सुरुवात झाली. सकाळपासूनच मतदारांत उत्साहाचं वातावरण होते. जिल्ह्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुमारे ६७.६० टक्के मतदान (Polling) झाले. सायंकाळी उशिरा सुद्धा मतदान केंद्रावर रांगा दिसून येत होती. किरकोळ मतदान यंत्र बंद पडण्याच्या घटना वगळता मतदान नीटपणे पार पडले. मतदानासाठी मोठ्या प्रमाणात रेल्वने दाखल झालेले तरुण चाकरमानी हे या वेळच्या मतदानाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

आज सकाळी तीनही मतदारसंघात उत्साहात सुरुवात झाली. थंडीची चाहूल लागल्याने वातावरणात उत्साह होता. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बंडखोर उमेदवार अर्चना घारे यांनी सावंतवाडी तालुक्यात भालावल येथे पतीसह मतदानाचा हक्क बजावला. महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांनी सावंतवाडी येथे पत्नी आणि मुलासह मतदानाचा हक्क बजावला. मंत्री आणि महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी सावंतवाडी येथे पत्नी, मुलगी, जावई आणि नातवासह मतदानाचा हक्क बजावला. भाजपचे बंडखोर उमेदवार विशाल परब यांनी देखील सावंतवाडी येथे सपत्नीक मतदान केले. महाआघाडीचे उमेदवार राजन तेली यांनी पत्नी आणि मुलासह सावंतवाडी मध्ये मतदान केले. खासदार नारायण राणे, आमदार नितेश राणे यांनी कणकवली तालुक्यात वरवडे येथे परिवारासह आपला मतदानाचा हक्क बजावला. आमदार वैभव नाईक यांनी कणकवलीमध्ये सपत्नीक मतदान केले. महायुतीचे उमेदवार निलेश राणे हे जरी कुडाळ मधून निवडणूक लढवत असले तरी त्यांनी कणकवली तालुक्यात वरवडे येथील मतदान केंद्रावर सायंकाळी उशिरा आपला मतदानाचा हक्क बजावला.

सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार कणकवली मतदार संघात ६७.४६ टक्के, कुडाळ मतदारसंघात ६८.८५ टक्के तर सावंतवाडी मतदारसंघात ६६.५६ टक्के मतदान झाले होते.

Assembly Election 2024 : राज्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५८.२२ टक्के मतदान!

यामध्ये ६ लाख ७८ हजार ९२८ मतदारांपैकी ४ लाख ५८ हजार ९५५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये २ लाख ३४ हजार ३०८ पुरुष आणि २ लाख २४ हजार ६४७ महिला मतदारांचा समावेश आहे.शेवटच्या एका तासात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांचे मतदारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु होते. त्यामुळे शेवटच्या तासाभरातसुद्धा मतदानकेंद्राबाहेर मोठ्या रांगा दिसत होत्या.

मतदान शांततेत पार पडावे यासाठी जिल्हा प्रशासन सुद्धा तत्पर होते. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अनिल पाटील आणि जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अगरवाल यांनी जिल्हयातल्या मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. त्याच बरोबर कुडाळ मध्ये पोलिसांच्या मदतीसाठी १७ एनसीसी कॅडेट्स आणि ६ राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक तैनात होते. महायुतीचे उमेदवार निलेश राणे हे जरी कुडाळ मधून निवडणूक लढवत असले तरी त्यांनी कणकवली तालुक्यात वरवडे येथील मतदान केंद्रावर सायंकाळी उशिरा आपला मतदानाचा हक्क बजावला.

दरम्यान मंत्री दीपक केसरकर, खासदार नारायण राणे, आमदार नितेश राणे यांनी महायुतीच्या विजयचा दावा केला आहे तर आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, संदेश पारकर यांनी महाविकास आघाडीच्या विजयाचा दावा केला आहे. बंडखोर उमेदवार अर्चना घारे आणि विशाल परब यांनी सुद्धा आपापल्या विजयाचे दावे केले आहेत.

मोठ्या संख्यने मुंबईकर चाकरमानी मतदानासाठी जिल्ह्यात

विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आज मतदान होत असताना या निवडणुकीत केव्हा नव्हे ते मुंबईला असलेले मतदार मोठ्या प्रमाणावर दाखल झाले. ज्या पद्धतीने गणेशोत्सव कालावधीमध्ये रेल्वे स्टेशन तुडुंब गर्दीने फुलून जाते तसेच काहीसे चित्र यावेळी निर्माण झाले. यामध्ये तरुण मतदार वर्गाचा मोठा सहभाग होता. सिंधुदुर्गाच्या दिशेने येणाऱ्या रेल्वेमध्ये ज्या ठिकाणी जागा मिळेल तेथे घुसून रेल्वे प्रवासी हे मतदानाकरता जिल्ह्यात दाखल झाले. कणकवली रेल्वे स्टेशनवर आज बुधवारी सकाळी अक्षरशः तुफान गर्दी झाली होती. तर कणकवली रेल्वे स्टेशनवर अचानक सकाळच्या रेल्वेने झालेल्या या गर्दीमुळे तिथे असलेल्या रिक्षा देखील कमी पडल्या. त्यामुळे अनेकानी चालत बसस्थानक गाठणे पसंत गेले. यावेळी कणकवली नरडवे रोडवर रेल्वेने उतरलेल्या मतदार प्रवाशांची गर्दी पाहून सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -