इस्लामाबाद : पूर्वनियोजित रूपरेषेप्रमाणे पाकिस्तानमध्ये होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स चषक (ICC Champions Trophy) स्पर्धेसाठी भारताने पाकिस्तानच्या भूमीत येण्यास नकार दिल्यानंतर (INd vs PCB) याचे विविध पडसाद क्रिकेट वर्तुळात उमटत आहेत. भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तान क्रिकेट मंडळाला मोठा फटका बसणार आहे. भारतीय व्यवस्थापनाची ही भूमिका कायम राहिल्यास पीसीबीला सुमारे ५४८ कोटी रुपयांचा फटका बसू शकतो.
पाकिस्तानला २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद जेव्हा जाहीर झाले, त्याचवेळी सहभागावरून गोंधळ उडणार, हे स्पष्ट झाले होते. हायब्रीड आयोजनाचा प्रस्ताव येणार, हे देखील साहजिक होते. याशिवाय, भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाणार नाही, हे स्पष्टच होते. बीसीसीआने आयसीसीला तसे कळवले आणि नंतर आयसीसीने ई मेल करून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला त्याची माहिती दिली.
आयसीसीने ICC Champions Trophy या स्पर्धेसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला ६५ मिलियन अमेरिकन डॉलर जाहीर केले होते. जर ही स्पर्धा (INd vs PCB) स्थगित झाली किंवा दुस-या देशात हलवण्यात आली, तर पाकिस्तानला ही रक्कम मिळणार नाही. भारतीय चलनात ही रक्कम ५४८ कोटींच्या घरात पोहोचते. शिवाय कराची, रावळपिंडी व लाहोर येथील स्टेडियमसाठी केला जाणारा खर्चही वाया जाण्याची शक्यता आहे.