गुरुनाथ तेंडुलकर
एका दिवंगत राजकीय नेत्याच्या पुतळ्याच्या अनावरण समारंभाला मी उपस्थित होतो. त्यावेळी त्या कार्यक्रमासाठी काही मंत्री, अनेक आमदार, खासदार आणि अनेक व्ही. आय. पी जमले होते. पोलीस बंदोबस्तही अर्थातच अगदी कडक ठेवला गेला होता. त्या प्रसंगी दोन पोलीस शिपाई आपापसात बोलताना मी ऐकले.एकजण दुसऱ्याला सांगत होता. ‘हे मोठ्या लोकांचे पुतळे असे चौकात कशापायी उभारतात कळत नाय बाबा… आजचे ठीक, आज मंत्री आले म्हणून बंदोबस्ताला आपण सगळे आहोत. पण उद्यापासून काय? उद्या या पुतळ्याची कुणी विटंबना केली, तर दंगल होणार नी आपल्यालाच त्रास…!’ एकंदरीत काय त्या बिचाऱ्या पोलीस शिपायाच्या दृष्टीने तो चौकातला पुतळा म्हणजे एक आपत्तीच होती. आणि त्याचे म्हणणेही खरेच होते. पुतळे उभारून आपण काय साधतो? फक्त विभूतीपूजा!, व्यक्तिपूजा! सभा संमेलनातून, वृत्तपत्रांतून, रेडिओ, टी.व्ही.वरील परिसंवादातून अनेक बुद्धीवादी आणि विचारवंत मंडळी या व्यक्तीपूजेच्या, विभूतीपूजेच्या विरोधात आपली मते मांडताना आपण पहातो. तरीही… विभूतीपूजेमागची मानसशास्त्रीय कारणे शोधणे अधिक सयुक्तिक ठरेल असे मला वाटते. व्यक्तिपूजा किंवा विभूतीपूजेमागचे एक महत्त्वाचे मानसशास्त्रीय कारण म्हणजे माणसाची अनुकरणशीलता. लहान मुल त्याच भाषेत बोलते ज्या भाषेत त्याच्या आजुबाजूची मोठी माणसे बोलतात. इंग्रजांच्या राज्यात आपण गोऱ्यासाहेबाच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावीत होऊन पुरुषांनी पँट, कोट, हॅट नि टाय वापरायला सुरुवात केली. गोऱ्या मॅडमच्या सुटसुटीत गोल झग्याने प्रभावित होऊन स्त्रियांनी नऊवारी लुगड्यांऐवजी पाचवारी गोल साड्या वापरायला सुरुवात केली. पोषाखातील हे बदल आपण स्विकारले. सुरुवातीस फॅशन म्हणून, आणि नंतर जीवनपद्धती म्हणून.
आपली भाषा, आपले जेवण खाणे, पोशाख, रीतीरिवाज, सण, उत्सव प्रत्येक बाबतीत आपण कुणा ना कुणाचे अनुकरण करतोच की. विभूतीपूजेचे दुसरे कारण म्हणजे प्रत्येक माणसाच्या मनात दडलेली एक सुप्त इच्छा. ही इच्छा म्हणजे मोठेपणाची इच्छा. आपण आहोत त्यापेक्षा अधिक मोठे होण्याची इच्छा. अर्थात अशी इच्छा बाळगण्यात गैर काहीच नाही. आज आहोत त्यापेक्षा अधिक मोठे होण्याच्या या इच्छेमुळेच, तर आज माणसाची प्रगती झालेली आपण पाहतो.
‘ठेविले अनंते तैसेची राहावे.’ हे आपल्यापैकी बहुतेकांना मान्य नसते म्हणूनच आहे त्यापेक्षा अधिक मोठे होण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करतो. मोठे होण्याच्या या प्रयत्नांचाच एक भाग म्हणजे मोठ्या माणसांचे अनुकरण करून त्यानुसार वागणे… आणि या आदर्शाच्या शोधातच सुरू होते विभूतीपूजा. पण दुर्देवाने बहुतेकांच्या बाबतीत ही विभूतीपूजा केवळ बाह्य स्वरूपापुरतीच मर्यादित राहते. म्हणजे आदर्शातील नेमके जे घ्यायचे ते न घेता नको तेच घेतले जाते. ज्याला आपण ‘आदर्श’ मानतो त्याचे गुण आत्मसात न करता केवळ त्याच्या सवयी तेवढ्या उचलल्या जातात. त्याच्या केवळ राहणीमानाचे अनुकरण केले जाते. कारण? कारण अगदी सोपे आहे. बाह्य राहणीमानाचे अनुकरण करणे फार सोपे असते. ज्या गोष्टी अंगीकारायला कठीण त्या गोष्टींचे अनुकरण केले जात नाही आणि ज्या गोष्टी सोप्या तेवढ्याच स्वीकारल्या जातात. अमिताभ बच्चनच्या हनुवटीवरील खास शैलीतली दाढी बघून घेऊन अनेक मध्यमवयीन पुरुष तशा प्रकारची दाढी वाढवायला लागलेत. बरं, हे अनुकरण आजचेच आहे असे नव्हे. लोकमान्य टिळकांच्या काळातही हेच होते. लोकमान्य टिळक सुपारी खात असत. टिळकांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून त्यावेळी म्हणे पुण्यातील अनेक तरुणांनी सुपारी खायला सुरुवात केली होती. ‘कित्ता’ गिरवणे कठीण म्हणून केवळ ‘आडकित्ता’ घेतला. पंडीत नेहरू पंतप्रधान असताना त्यांचे पाहून अनेक पुरुष आपापल्या शर्टाला, कोटाला गुलाबाचे फुल लावून फिरायचे. नेहरूंची प्रज्ञा, प्रतिभा मिळवणे अवघड पण शर्टाच्या खिशात गुलाबाचे फुल खुपसून मिरवणे सोप्पे. शर्टाला गुलाबाचे फुल लावून मिरवणाऱ्यांपैकी किती जणांनी पंडितजींची पुस्तके आणि लेख वाचले असतील? त्यांच्या सारखे लिहिणे, तर दूरच पण त्यांनी लिहिलेले तरी किती जणांनी वाचले असेल?
नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्यासारखे जॅकेट घालून मिरवायची फॅशनच सुरू झाली. पण आंधळेपणाने केवळ बाह्य गोष्टींचे अनुकरण केल्याने माणूस गोत्यात येऊ शकतो याची ही एक कथा… एक तरुण पत्रकार ब्रिटनचे त्या काळचे पंतप्रधान सर विन्स्टन चर्चिल यांची मुलाखत घ्यायला जाणार होता. चर्चिलसाहेबांबरोबर भेटीची वेळ ठरवली होती. हा पत्रकार तसा नवखाच होता. चर्चिल साहेबांच्या भेटीला जाताना त्या तरुण पत्रकाराला त्याच्या वृत्तपत्राच्या संपादकांनी अनेक सूचना दिल्या होत्या. ‘बघ, एका फार मोठ्या विद्वान आणि अत्यंत मिश्किल स्वभावाच्या माणसाला भेटायला जातो आहेस तेव्हा जरा सांभाळूनच… त्या मोठ्या लोकांचे रीतभात वेगळे असतात. त्यांच्या चालीरीती वेगळ्या असतात. तेव्हा जरा जपून… ते कसे वागतात ते बघ. नीट निरीक्षण कर आणि नंतरच काय ते कर.’ ठरल्याप्रमाणे हा तरुण पत्रकार चर्चिलसाहेबांना भेटायला गेला. त्याने प्रश्न लिहून आणले होते. ते प्रश्न तो विचारीत होता. चर्चिलसाहेब त्याच्या प्रश्नांना नीटपणे उत्तरे देत होते. त्या पत्रकाराने चर्चिलसाहेबांना अडचणीत आणणारा एक प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नाला सफाईने बगल देताना चर्चिल साहेबांनी मध्येच विचारले, ‘चहा घेणार ना?’ ‘अं… अं… नको.’ ‘नको म्हणण्यात काही दम दिसत नाही… घे… मला तुझ्याबरोबर चहा घ्यायला आवडेल… चालेल ना?’ ‘अं… चालेल…’
चर्चिल साहेबांनी चहाची ऑर्डर दिली. चहाची किटली, दुधाचे छोटे भांडे, साखर आणि तीन चार रिकामे कप असा तो सारा सरंजाम आला. त्याच बरोबर मस्का आणि पावाच्या काही स्लाईस, काही बिस्कीटे वगैरे सुद्धा होती. चर्चिल साहेबांनी त्यांच्या कपात चहा ओतला. भरपूर दूध ओतून त्यात तीन चार चमचे साखर टाकली. या तरुण पत्रकाराने सुद्धा त्यांचे पाहून आपल्या कपात भरपूर दूध ओतून तसाच चहा बनवला आणि चार चमचे भरून साखर घातली. वास्तविक त्याला एक चमचा साखर पुरेशी होती. पण त्याने विचार केला… ‘असेल बुवा या मोठ्या लोकांची पद्धत. आपण गरीब, सर्वसामान्य, आपल्याला एवढी साखर परवडत नाही म्हणून कदाचित आपण कमी साखर खायची सवय लावून घेतली असावी.’असा विचार करून त्या पत्रकाराने देखील त्याच्या चहात चार चमचे साखर घातली. इकडे चर्चिल साहेबांनी एक पावाचा तुकडा उचलला नि त्याच्यावर भरपूर मस्का चोपडला. त्यांचे बघून पत्रकारानेही तसेच केले. चर्चिल साहेबांनी तो मस्का लावलेला पावाचा तुकडा बशीत ठेवला नी त्यावर तो सगळा चहा हळूहळू ओतला. आता मात्र या पत्रकाराचे डोकेच चक्रावले. पण करतो काय ? ‘असेल बुवा या मोठ्या लोकांच्यात ही पद्धत…’ म्हणून त्याने देखील तशाच प्रकारे एका पावाच्या तुकड्याला मस्का चोपडला, बशीत ठेवला नि तो चार चमचे साखर घातलेला चहा त्याच्यावर ओतला. त्या गरम चहाने मस्का वितळून वर तरंगत होता. हे आता कसे खायचे…?शिसारी येऊन त्या पत्रकारांने ती बशी उचलली, डोळे मिटले आणि तोंडाला बशी लाऊन एकदाचे कसेबसे ते मिश्रण गिळले… गिळवत नव्हते तरीही घशाखाली घातले…
‘सुटलो बुवा एकदाचा…’ असे मनाशी म्हणून, निश्वास सोडून त्या पत्रकाराने डोळे उघडले आणि पाहतो तो काय…?
चर्चिल साहेबांनी पावावर चहा ओतलेली ती बशी उचलून आपल्या खुर्चीजवळ बसलेल्या कुत्र्यासमोर ठेवली होती अन् स्वतःसाठी वेगळा चहा बनवायला सुरुवात केली होती… आंधळेपणे अनुकरण करण्यातून हे असेही घडते. म्हणूनच यापुढे कुणाचेही अनुकरण करताना जरा जपूनच.