धुळे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) ८ नोव्हेंबर रोजी धुळे दौऱ्यावर (Dhule Daura) असणार आहेत. यावेळी ते पांझरापोळ गोशाळा, महात्मा गांधी तत्वज्ञान केंद्राजवळ, मालेगाव रोडद्वारे धुळे ठिकाणी येणार आहेत. विधानसभा निवडनुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या दौऱ्यादरम्यान पोलीस सतर्क झाले आहेत. त्यामुळे येत्या शुक्रवारी सभा परिसर ड्रोन उड्डाणास प्रतिबंधित करण्यात आला असून वाहतूक मार्गातही बदल करण्यात आले आहे.
जारी झालेल्या आदेशानुसार, या दिवशी हा परिसर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने नो फ्लाईंग झोन घोषित करण्यात येत आहे. तसेच कोणत्याही प्रकारचे ड्रोन उडविण्यास सक्षम प्राधिकारी यांची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय मनाई करण्यात आली आहे. असेही जिल्हाधिकारी पापळकर यांनी आदेशात नमूद केले आहे.
वाहतूक मार्गांत तात्पुरता बदल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांसह इतर मंत्री महोदयांच्या धुळे दौऱ्यादरम्यान नागरिकांची गैरसोय होवू नये, यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली. याबाबतची अधिसुचनाही जारी करण्यात आली आहे.
सकाळी ६ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत साक्री, मालेगांव, चाळीसगांव व सोनगीरकडून येणारी अवजड वाहने, एसटी बसेस, चारचाकी व तीनचाकी वाहने हे पारोळा चौफुली-गिंदोडिया चौक-तिरंगा चौक- लोकमान्य हॉस्पिटल मार्गे शहरात येतील व त्याच मार्गाने परत जातील.