Monday, December 9, 2024
Homeताज्या घडामोडीशरद पवारांचे राजकीय निवृत्तीचे संकेत

शरद पवारांचे राजकीय निवृत्तीचे संकेत

बारामती: मी सत्तेत नाही, राज्यसभेत आहे. अजून माझे दीड वर्ष आहे. दीड वर्षांनंतर राज्यसभेत जायचं की नाही याचा विचार मला करावा लागेल. लोकसभा मी लढणार नाही. यापुढे कोणतीही निवडणूक लढणार नाही. किती निवडणुका करायच्या. आतापर्यंत १४ निवडणुका केल्या. तुम्ही एकदाही घरी पाठवलं नाही. दरवेळी निवडून देत आहात. त्यामुळे कुठे तरी थांबलं पाहिजे. नवी पिढी समोर आली पाहिजे हे सूत्र घेऊन मी कामाला लागलो आहे, अशी भावनिक साद घालत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले आहेत.

बारामती विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांची प्रचारसभा पार पडली. या प्रचारसभेत ते बोलत होते. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

पवार पुढे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी राज्याचा विचार करायचा असतो. इथल्या राज्यकर्त्यांनी इथल्या राज्यातील लोकांच्या हितासाठी जी धमक दाखवायची ती दाखवत नाहीत. त्याचा परिणाम म्हणजे आमचं काम दुसरीकडे चाललं आहे. ते थांबवायचं असेल तर इथली सत्ता बदलली पाहिजे. सत्ता बदलण्याशिवाय गत्यंतर नाही. शेतीला पाणी आणि हाताला काम यासाठी अधिक लक्ष देण्याची गरज आहे. तरच सरकारचा दृष्टीकोन चांगला राहतो. दुर्देवाने दिल्ली आणि राज्याचे राज्यकर्ते त्या दृष्टीने काम करत नाहीत.

माणसं मला ओळखतात. मी त्यांना ओळखतो. कुणाचं काय करायचं कसली भावना कसलं काय. काम करणं महत्त्वाचं आहे. तुम्ही भारी आहात, तुम्ही मतदान करायला कधी चुकता? कालची निवडणूक ताईंची झाली. ताईंची निवडणूक काय साधी होती का? निवडणूक घरातीलच होती. पण तरीही बारामतीकर भारी आहेत. या तालुक्याने ताईंना ४८ हजार मते अधिक दिले. हे काम तुम्ही केलंय. आताही तुम्ही मागे पाहणार नाही. त्यामुळे मला चिंता नाही. उद्याच्या निवडणुकीत हाच दृष्टीकोन ठेवा, असे आवाहनही पवारांनी यावेळी केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -