महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. महाविकास आघाडी तसेच महायुतीसाठी ही विधानसभा निवडणूक अस्तित्वाची आणि प्रतिष्ठेची होऊन बसली आहे. अनेक ठिकाणी बंडखोरी झाली आहे. बंडखोरांची समजूत काढण्यासाठी त्या-त्या पक्षातील नेते मंडळींकडून भगीरथ प्रयत्न सुरू आहेत. अनेक बंडखोरांनी उपसलेल्या तलवारी म्यानात न घालण्याचा निर्धार व्यक्त केल्याने माघार घेणार नसल्याचे स्पष्टही झाले आहे. आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा दिवस असल्याने सांयकाळपर्यंत महाराष्ट्रातील निवडणूक लढतीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्यात शिवसेना उबाठा गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार शायना एनसी यांचा उल्लेख ‘माल’ असा केल्याने महाराष्ट्रातील महिला वर्गामध्ये कमालीची संतापाची लाट उसळली आहे. अरविंद यांनी अप्रत्यक्षपणे शिंदे गटाच्या नेत्या शायना एनसी यांचा ‘इम्पोर्टेड माल’ असा उल्लेख केल्यानंतर गदारोळ सुरू झाला आहे. शायना एनसी यांनी अरविंद सावंत यांच्याविरोधात गुन्हा मुंबईच्या नागपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शायना एनसी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआर नोंदवण्यात आल्यानंतर महाविकास आघाडीचा उल्लेख महाविनाश आघाडी करत शायना एनसी यांनी जोरदार हल्लाबोल केला. एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना खासदार सावंत यांनी शिवसेना नेत्या शायना एनसी यांच्यावर निशाणा साधला आणि सांगितले की, त्यांची अवस्था बघा, त्या आयुष्यभर भाजपामध्ये राहिल्या, आता दुसऱ्या पार्टीत गेल्या आहेत. इथे ‘इम्पोर्टेड माल’ चालत नाही, फक्त ओरिजनल माल येथे चालतो. त्यांच्या वक्तव्यावर मुंबादेवी मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवार शायना एनसी यांनी पलटवार करत माफी मागण्याची मागणी केली.
खासदार अरविंद सावंत यांच्या माल या शब्दाची महाविकास आघाडीला जबरी किंमत मोजावी लागण्याची भीती आता महाविकास आघाडीतील नेते मंडळींकडूनच व्यक्त केली जात आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात महिला वर्गामध्ये संतापाची उसळलेली लाट पाहता महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणावर निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातच बॅकफूटला जावे लागले आहे. खासदार अरविंद सावंत यांनी याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केली असली तरी महिलांचा राग शमलेला नाही, मुळातच शिवसेना या शब्दामध्ये शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा शिव हा शब्द दडलेला आहे. शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये व्यासपीठावर शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अथवा प्रतिमेचा असतोच. शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवाजी महाराजांचे नाव घेत शिवसेनेने व शिवसेना नेत्यांनी आपली राजकीय उपजिविका आजवर भागविलेली आहे. कल्याणच्या सुभेदाराची सुन पाहिल्यावर ‘अशीच आमुची माता सुंदर असती, तर आम्हीही सुंदर झालो असतो’ असे शिवछत्रपती त्यावेळी म्हणाले होते. परस्त्रीबद्दलचा आदर, मानसन्मान, मातृत्वाची भावना त्यातून व्यक्त झाली होती आणि शिवछत्रपतींचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्या शिवसेना संघटनेचे खासदार अरविंद सावंत मात्र महिलांना माल असे संबोधतात. हे जर शिवकालीन युग असते आणि शिवछत्रपती सिंहासनावर असते, तर या अरविंद सावंत यांची या गुन्ह्याबाबत जीभ छाटून, चौरंगा करून नक्कीच कडेलोट केला असता. स्त्री ही एका क्षणाची पत्नी असली तरी अनंत काळाची माता, भगिनी असते, या संस्कारातच महाराष्ट्राची पूर्वापार काळापासून जडणघडण झालेली आहे. महिला उमेदवाराचा माल असा उल्लेख केल्याने महिलांबाबत पाहण्याचा दृष्टिकोण त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झाला आहे. यामुळे महाविकास आघाडी व महायुतीबाबत महिलांबाबतची भूमिका महाराष्ट्रातील महिला वर्गासमोर स्पष्ट झाली आहे. एकीकडे महाविकास आघाडीच्या खासदारांची महिलांबाबतची मुक्ताफळे आणि दुसरीकडे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबविताना सरकारने महिला वर्गाला दर महिन्याला देऊ केलेला मदतीचा हातभार ही तफावत महाराष्ट्रातील जनतेला पाहावयास मिळाली आहे. अनुभवयास मिळाली आहे.
महिलांचा मानसन्मान हा कृतीतून असावा लागतो, संस्कारातून तो घडवावा लागतो. महाराष्ट्रामध्ये जिजामातेच्या स्वप्नातून स्वराज्य घडले आहे. मुलाच्या भेटीसाठी हिरकणीने बुरुज सर केला होता. मुलींच्या शिक्षणासाठी प्रचलित व्यवस्थेच्या विरोधात लढा देणाऱ्या सावित्रीबाई फुलेंचा हा महाराष्ट्र आहे. ज्ञानेश्वर माऊलींना पडत्या काळात पाठराखण करणाऱ्या संत मुक्ताबाईंचा हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात पूर्वापार काळापासून आजतागायत घराघरामध्ये मातृसत्ताक पद्धत आहे. घरातील महिलांना नेहमीच मानसन्मान दिला जात आहे. या महाराष्ट्रामध्ये निवडणूक प्रचार करताना खासदार अरविंद सावंत यांनी शायना एनसी यांचा उल्लेख माल असा केल्याने महाविकास आघाडीतील एका घटक पक्षाचा प्रचाराचा दर्जा किती रसातळाला गेला आहे, याचा अनुभव महाराष्ट्रातील जनतेने घेतलाच आहे. या वक्तव्याची महाविकास आघाडीला फार मोठी किंमत मोजावी लागणार आहे. निवडणुका येतात आणि जातात, पण प्रचार करताना जीभेवर संयम ठेवण्याचे तारतम्य प्रत्येकानेच बाळगणे आवश्यक आहे. कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाही, कोणाच्या मान-सन्मानाला ठेच पोहोचणार नाही याची खबरदारी घ्यावी लागते. एकवेळ तलवारीने झालेला घाव भरून निघतो, पण शब्दांनी झालेल्या जखमा कधीही भरून येत नाहीत. त्यामुळे संभाषणात बोलताना व व्यवहारात वागताना प्रत्येकानेच काळजी घेणे आवश्यक आहे. कारण दुखावलेली मने पुन्हा जुळणे अवघड असते. प्रत्येकाचीच राजकीय प्रतिष्ठा पणाला लागलेली असताना महिलांचा अपमान करणे ही महाविकास आघाडीसाठी धोक्याची घंटा आहे. आता खासदार सावंत यांनी दिलगिरी व्यक्त केली असली तरी माल या शब्दाने महिलांच्या मनावर खोलवर झालेली जखम दिलगिरीच्या औषधाने भरून निघणे अवघड आहे.