नाशिक : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सोमवारी अखेर निवडणुकीच्या रण मैदानातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. मित्रपक्षाची यादी आलेली नाही. त्यामुळे एका जातीवर निवडणूक लढणे आणि जिंकणे शक्य नाही. त्यामुळे सर्व उमेदवारांना जरांगे यांनी अर्ज मागे घेण्यास सांगितले आहेत. उमेदवार द्यायचा नाही, आता कोणाला पाडायचे ते पाडा आणि कोणाला आणायचे ते आणा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. जरांगे पाटील यांनी ज्यांच्यावर सतत टीका केली, ते राष्ट्रवादीचे नेते, राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. विशेष बाब म्हणजे भुजबळ यांनी चक्क जरांगे यांचं कौतुक केलं आहे.
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मीडियाशी संवाद साधताना मनोज जरांगे यांचं कौतुक केलं आहे. जरांगे यांनी जो निर्णय घेतला त्याचे मी स्वागत करतो. देर आये दुरुस्त आये. एका समाजावर निवडणूक लढविणे शक्य नाही. इतर समाज साथ देत नाही. मराठा समाज आता मोकळेपणाने निवडणुकीत भाग घेईल. सर्वच पक्षाने जे उमेदवार दिले आहेत, त्यात ६० ते ७० टक्के मराठा समाजाचे आहेत. त्यामुळे मनोज जरांगे यांचा निर्णय अतिशय योग्य आहे, असं छगन भुजबळ यांनी म्हंटल.
त्यावर मी काय बोलणार?
मुस्लिम आणि दलित नेत्यांनी यादी सादर केली नाही. म्हणून निवडणुकीतून माघार घेत असल्याचं जरांगे म्हणाले. त्यावरही भुजबळ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. जरांगे यांनी सांगितलं. त्यावर मी काय बोलणार? त्यांना सर्व धर्मीय आणि समाजाचा पाठिंबा हवा आहे असा त्याचा अर्थ आहे, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.
सामाजिक सलोखा राहील
मराठा आंदोलन हा भाग वेगळा आहे. मी समता परिषदेचे काम करतो. सामाजिक काम वेगळं. आम्ही समता परिषदेच्या माध्यमातून निवडणूक लढवत नाही. तसेच आमच्या सामाजिक संस्थेचा सदस्य आहे म्हणून मतदान करा असं होत नाही. त्यांचे काम ते करतील त्रुटी सांगत राहतील. महाराष्ट्रातील निवडणूका मोकळ्या पद्धतीने होतील. सामाजिक सलोखा राहील असे वाटते, त्यांच्या म्हणण्यानुसार सगळे उमेदवार मोकळेपणाने भूमिका मांडतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
मुंबईतल्या नेत्यांनी विचार करावा
उमेदवारी हा टॉपिक नांदगावमध्ये संपला आहे. समीर भुजबळने मुंबई अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. मग निवडणुकीला उभे राहिले. अपक्ष उभे राहिले पाहिजे. आम्ही घड्याळ चिन्ह दिले असते. आम्ही इथिक्स पाळले. आता मुंबईत बसलेल्या नेत्यांनी विचार करायला पाहिजे, असा चिमटा भुजबळांनी काढला.
तर लोक चूक पोटात घालतात
बारामतीत अजित पवार यांनी चूक मान्य केली. सुनेत्रा पवार यांना उमेदवारी नको द्यायला होती असं ते म्हणाले. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. चूक झाली हे त्यांनी अनेक वेळा सांगितले. जाहीरपणे सांगितले तर लोक चूक पोटात घालतात, असं ते म्हणाले.