मुंबई : जनता महायुतीसोबत असून राज्यात सरकार महायुतीचेच येईल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे, ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. महायुतीत जिथे एकमेकांच्या उमेदवारासमोर तिकिट नसताना उमेदवार उभे राहिले आहेत. त्यांनी उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.
पक्षांतर्गत बंडखोरही आपली उमेदवारी मागे घेतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. यासंदर्भात काल घटक पक्षांची चर्चा झाली असून एकदोन दिवसात प्रश्न निकाली निघेल, असे त्यांनी सांगितले. माहीम मतदारसंघात लवकरच तोडगा निघेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. ४-५ नोव्हेंबर म्हणजे दिवाळीनंतर महायुती आपल्या जोरदार प्रचाराला सुरुवात करेल, अशी माहिती फडणवीस यांनी यावेळी दिली.
यावेळी काँग्रेसचे मुंबईतले बडे नेते आणि महानगरपालिकेतले माजी विरोधी पक्षनेते रवि राजा यांनी भाजपात प्रवेश केला. त्यांना मुंबई भाजपाचं उपाध्यक्ष पदही देण्यात आले आहे. काँग्रेसमध्ये तिकीट वाटपात भेदभाव केला जातो, असा आरोप रवी राजा यांनी यावेळी केला.