नाशिक : बारा ज्योर्तिलिंगांपैकी एक असणाऱ्या त्र्यंबकेश्वराचं दर्शन (Tryambakeshwar Temple) घेणाऱ्या भाविकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सध्या सणासुदीच्य काळात देवाचं दर्शन घेणाऱ्यांची संख्या मोठी असते. ये पाहता त्र्यंबकेश्वर मंदिर प्रशासनाने भाविकांना सुलभरित्या दर्शन मिळण्यासाठी सुविधा केली आहे.
येत्या २ नोव्हेंबरपासून त्र्यंबकेश्वराचं २०० रुपयात पेड दर्शन सुरू होत आहे. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर ऑनलाइन पेड दर्शनाचा शुभारंभ पार पडणार आहे. या सुविधेमार्फत दररोज ४ हजार भाविकांना ऑनलाईन पेड दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. यासाठी भाविकांना २०० रुपये मोजावे लागणार आहेत.
मंदिर उघडल्यानंतर पहाटे साडे पाच वाजेपासून रात्री ८ वाजेपर्यंत सुरू पेड दर्शनाची सुविधा सुरू राहणार असून मंदिराच्या उत्तर दरवाजातून भाविकांना प्रवेश मिळणार आहे. दरम्यान, दिव्यांगांसाठी मोफत दर्शनाची सुविधा देखील देण्यात आली आहे.