Wednesday, May 27, 2026

Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे काळे कारनामे आता सिनेमातून उलगडणार, लवकरच भोंदू खरातचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला

Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे काळे कारनामे आता सिनेमातून उलगडणार, लवकरच भोंदू खरातचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला

Ashok Kharat : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण नाशिकमध्ये समोर आले आणि संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. खरात प्रकरणाने सामाजिक काय तर राजकीय वर्तुळातही मोठ्या हालचाली घडल्या. अशोक खरातची सध्या पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. अशातच आता महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अख्खा महाराष्ट्र हादरवणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरातच्या (Bhondu Baba Ashok Kharat) काळ्या कृत्यांवर लवकरच सिनेमा येणार आहेत.

 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'

नुकतीच घोषणा झालेल्या 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' (Maharashtra Epstein Files) या मराठी चित्रपटातुन संपूर्ण महाराष्ट्र हादरवणाऱ्या खरात प्रकरणाचा पर्दाफाश करण्यात येणार आहे. मोशन पोस्टर प्रदर्शित करून 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. 2 ऑक्टोबर 2026 रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असल्याचे मोशन पोस्टरवर घोषित करण्यात आले आहे.

सोशल मीडियावर मोशन पोस्टर प्रदर्शित करून आगामी 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' (Maharashtra Epstein Files) या मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. जैन फिल्म प्रोडक्शन आणि मातोश्री एन्टरटेन्मेंट वर्ल्ड प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी देवेंद्र भट, सुर्यकांत भुंडे आणि प्रशांत कदमपुरे यांनी स्वीकारली आहे. वास्तवदर्शी कथानकावर आधारलेल्या या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शक स्वरूप बी. सावंत यांनी एक आव्हानात्पक पाऊल टाकले आहे.

चित्रपटाची कथा अन कलाकार गुलदस्त्यात

'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटाची कथा सध्या तरी गुलदस्त्यात असून, कलाकारांची नावेही गुप्त ठेवण्यात आली आहेत. लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे. या चित्रपटाची कथा सागरकुमार एस. जैन यांनी लिहीली असून, पटकथा व संवादलेखन संजय नवगिरे यांनी केले आहे. डिओपी आकाश काकडे या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी करणार असून, कला दिग्दर्शन अक्षय आंबेकर करणार आहेत. वेशभूषा आकांक्षा गांधी यांची असून, सचिन घणवंत या चित्रपटाचे प्रोडक्शन हेड आहेत तसेच नेहा घोडके प्रॉडकशन कंट्रोलर म्हणून काम पाहणार आहेत.

दरम्यान, या सिनेमात अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपाली सैयद (Dipali Sayyed) या रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेत झळकण्याची शक्यता आहे. स्वतः दीपाली सैयद यांनी एका वृत्तावाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलताना हा खुलासा केला. या सिनेमात आपण एका अत्यंत महत्त्वाच्या राजकीय भूमिकेत असल्याची पुष्टी केली आहे. तेव्हापासूनच दीपाली सय्यद रुपाली चाकणकरांची भूमिका साकरणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, सिनेमात अशोक खरातचा (Ashok Kharat) ढोंगीपणा, या प्रकरणाशी संबंधित महाराष्ट्राच्या राजकारणामागील काही प्रभावशाली व्यक्तींचे वास्तवही उलगडलं जाणार आहे. त्यामुळे हा सिनेमा केवळ एका व्यक्तीच्या कथित कृत्यांपुरता मर्यादित न राहता सामाजिक आणि राजकीय पैलूंवरही प्रकाश टाकणार असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, अशोक खरात यांच्यावर अनेक महिलांचं लैंगिक शोषण केल्याचे आरोप करण्यात आले असून, या प्रकरणामुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर येणारा हा चित्रपट चर्चेचा विषय ठरत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >