Tuesday, May 26, 2026

DCM Eknath Shinde : मोदी खरे धुरंदर, त्यांच्यावर टीका करणारे दलिंदर, हर्षवर्धन सकपाळ यांच्या मोदीवरील टीकेला उपमुख्यमंत्री शिंदेंचे प्रत्युत्तर

DCM Eknath Shinde : मोदी खरे धुरंदर, त्यांच्यावर टीका करणारे दलिंदर, हर्षवर्धन सकपाळ यांच्या मोदीवरील टीकेला उपमुख्यमंत्री शिंदेंचे प्रत्युत्तर

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या बारा वर्षांत देशाचे यशस्वीपणे नेतृत्व करत भारताला विकास, आत्मनिर्भरता आणि जागतिक प्रतिष्ठेच्या नव्या उंचीवर नेले आहे. त्यामुळे मोदी हे खरे “धुरंदर” असून त्यांच्यावर टीका करणारेच खऱ्या अर्थाने “दलिंदर” आहेत, अशी खरबरीत आणि आक्रमक टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ आणि विरोधकांवर केली. मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी मोदींवरील टीकेचा तीव्र शब्दांत समाचार घेतला. शिंदे म्हणाले,“देशहिताला सर्वोच्च प्राधान्य देणारे नरेंद्र मोदी हे आज जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेत्यांपैकी एक आहेत.

गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून १३ वर्षे आणि देशाचे पंतप्रधान म्हणून १२ वर्षे त्यांनी जनतेचा विश्वास संपादन केला आहे. भारताला महासत्तेकडे नेण्याचे, आत्मनिर्भर भारत उभारण्याचे आणि देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचे ऐतिहासिक कार्य मोदीजींनी केले आहे.”

विरोधकांवर निशाणा साधताना त्यांनी म्हटले की, “ज्यांनी आयुष्यात देशासाठी कोणतेही भरीव योगदान दिले नाही, ते आज मोदीजींवर टीका करत आहेत. ‘कहाँ राजा भोज और कहाँ गंगू तेली’ अशीच त्यांची अवस्था आहे. मोदीजींवर आरोप करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे. अशा टीकांमुळे मोदींची प्रतिमा कमी होणार नाही, उलट विरोधकांची राजकीय दिवाळखोरीच उघड होत आहे.”

“मोदीजींनी देशाला भ्रष्टाचारमुक्त आणि निर्णयक्षम नेतृत्व दिले. संरक्षण क्षेत्रात भारताला आयातदारातून निर्यातदार बनवले. पायाभूत सुविधा, डिजिटल क्रांती, परराष्ट्र धोरण आणि आर्थिक सुधारणांमुळे भारताची जागतिक पातळीवरील ताकद वाढली आहे. बारा वर्षांच्या कार्यकाळात मोदीजींवर भ्रष्टाचाराचा एकही डाग लावता आलेला नाही. हीच त्यांच्या नेतृत्वाची सर्वात मोठी पावती आहे, असेही शिंदे म्हणाले.

काँग्रेस नेत्यांच्या वक्तव्यांचा समाचार घेताना त्यांनी स्पष्ट केले की, "देशाच्या पंतप्रधानांवर खालच्या दर्जाची भाषा वापरणे ही भारतीय संस्कृती नाही. राजकीय विरोध असू शकतो, पण वैयक्तिक पातळीवर घसरून केलेली टीका जनता कधीही सहन करणार नाही. १४० कोटी भारतीय मोदीजींच्या कामगिरीचे साक्षीदार आहेत आणि योग्य वेळी विरोधकांना उत्तर देतील.”

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >