Tuesday, December 10, 2024
Homeब्रेकिंग न्यूजAssembly Election 2024 : महाराष्ट्रात होणार पंतप्रधान मोदींच्या ८, गडकरींच्या ४० तर...

Assembly Election 2024 : महाराष्ट्रात होणार पंतप्रधान मोदींच्या ८, गडकरींच्या ४० तर योगींच्या १५ सभा

महाराष्ट्रात होणार पंतप्रधान मोदींच्या ८, गडकरींच्या ४० तर योगींच्या १५ सभा

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची (Assembly Election 2024) रणधुमाळी सुरु झाली आहे. येत्या २० नोव्हेंबरला राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे. राज्यातील २८८ मतदारसंघांसाठी एकूण ७ हजार ९९५ उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या बड्या नेत्यांचा प्रचाराचा धुरळा उडताना दिसत आहे. महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांसारखे अनेक मोठे चेहरे जाहीर सभा घेणार आहेत. भाजपाकडून १०० हून अधिक सभांचे नियोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मुंबई-कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ८ सभा पार पडणार आहेत.

देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरींवर मोठी जबाबदारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात ८ दिवस सभा होणार आहेत. येत्या ७ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात असणार आहे. या काळात ते महाराष्ट्रातील विविध मतदारसंघात सभा घेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या सभा फक्त भाजपच नाही तर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी घेतल्या जाणार आहेत. या सर्व सभांची जबाबदारी देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याही महाराष्ट्रात १५ सभा होणार आहेत. तसेच गोवा, मध्यप्रदेश, हरियाणातील मुख्यमंत्री हे देखील महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा दुप्पट सभा गृहमंत्री अमित शाहांच्या होणार आहेत. अमित शाह हे महाराष्ट्रात २० सभा घेणार आहेत. या सभा राज्यातील महत्त्वाच्या मतदारसंघांत होणार आहेत.

महाराष्ट्रात कोणाच्या किती सभा होणार?

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी – ८
  • अमित शहा – २०
  • नितीन गडकरी – ४०
  • देवेंद्र गडकरी – ५०
  • चंद्रशेखर बावनकुळे – ४०
  • योगी आदित्यनाथ – १५

प्रामुख्याने दोन आघाड्या मैदानात समोरासमोर

महाराष्ट्रात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस यांनी मिळून महाविकास आघाडी स्थापन केली. यावेळी महाराष्ट्र निवडणुकीत दोन आघाड्यांमध्ये प्रमुख लढत पाहायला मिळणार आहे. सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडी आमनेसामने आहेत. महायुतीत भाजपा, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -