मुंबई : भूल भुलैया चित्रपटाला प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला होता. यामधील ‘आमी जे तोमार’ या गाण्याने प्रेक्षकांच्या मनात वेगळेच घर केले आहे. अजूनही या गाण्याने चाहत्यांच्या मनात रुंजी घातली आहे. आता लवकरच बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘भूल भुलैया ३’ (Bhool Bhulaiyaa 3) चित्रपट चित्रपटगृहामध्ये दाखल होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून आता ‘आमी जे तोमार ३.०’ हे गाणं देखील प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. मात्र या गाण्यात विद्या बालन या मंजुलिकेसोबत आणखी प्रसिद्ध अभिनेत्रीचा चेहरा दिसणार आहे.
भूल भुलैय्या ३ या चित्रपटातील आमी जे तोमार ३.० गाणं लाँच झालं असून गाण्याची एक झलक समोर आली आहे. या गाण्यावर दोन मंजुलिका दिसल्या आहेत. यामध्ये विद्या पहिली तर माधुरीला दुसरी मंजुलिका म्हणून दाखवले आहे. त्यामुळे यंदा विद्या आणि माधुरीची भन्नाट जुगलबंदीही पाहायला मिळत आहे. ”बंद दरवाजाच्या पलिकडे नक्की काय रहस्य दडलंय” असं लिहत हे गाणं लाँच करण्यात आले आहे.
दरम्यान, भुल भुलैया ३ चित्रपट लवकरच चित्रपटगृहामध्ये दाखल होणार आहे. अनीस बज्मी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून कार्तिक आर्यन, विद्या बालन, माधुरी दीक्षित, तृप्ती डिमरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याशिवाय विजय राज, राजपाल यादव आणि संजय मिश्रा हे कलाकार सहाय्यक भूमिकेत आहेत.