मुंबई: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेच्या(uddhav thackeray) शिवसेना(shivsena) गटाने ६५ जागांवर उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत ठाण्याच्या कोपरी-पाचपाखाडी जागेवरून केदार दिघे यांना शिवसेनेने तिकीट दिले आहे. ही महाराष्ट्राची हॉट सीट आहे कारण येथून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात उतरले आहेत.
कोण आहेत केदार दिघे?
केदार दिघे हे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे नातेवाईक आहेत. आनंद दिघे यांना एकनाथ शिंदे यांचे राजकारणातील गुरू मानले जाते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने जेव्हा मंगळवारी २२ ऑक्टोबरला आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली होती त्यात लिहिले होते की ‘हिंदूहृदय सम्राट आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आदरणीय आनंद दिघे साहेब यांच्या आशिर्वादाने शिवसेना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४साठी उमेदवारांची यादी जाहीर करत आहे’.
आनंद दिघे यांच्याच मार्गदर्शनाखाली एकनाथ शिंदे यांनी राजकारणात आपली पकड मजबूत केली होती. आनंद दिघे हे शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांपैकी एक होते. बाळासाहेब ठाकरे यांनी ठाण्यामध्ये पक्ष मजबूत करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती आणि त्यांनी ती निभावलीही होती. आता दिघेंचे नातेवाईक शिवसेनेकडून मैदानात उतरल्याने येथील चुरस अधिक रंगतदार झाली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या गटाने बुधवारी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. उद्धव ठाकरे यांचा मुलगा आदित्य ठाकरे यांना वरळी मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. तर ठाणे येथून राजन विचारे यांना तिकीट देण्यात आले आहे. वरूण सरदेसाई यांना बाबा सिद्दीकी यांचा मुलगा जिशान सिद्दीकी यांच्याविरुद्ध वांद्रे पूर्व येथून उमेदवारी देण्यात आली आहे.