Tuesday, December 10, 2024
Homeब्रेकिंग न्यूजSambhaji Brigade : उद्धव ठाकरेंनी दगा दिला; विश्वासघात केल्याने संभाजी ब्रिगेडने युती...

Sambhaji Brigade : उद्धव ठाकरेंनी दगा दिला; विश्वासघात केल्याने संभाजी ब्रिगेडने युती तोडली

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर संभाजी ब्रिगेडने (Sambhaji Brigade) उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेसोबतची युती तोडली आहे. पुण्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अडीच वर्षापूर्वी संभाजी ब्रिगेड आणि उद्धव ठाकरे गट यांची युती झाली. परंतु दिलेला शब्द पाळला नाही, आश्वासने पूर्ण केली नाहीत, उद्धव ठाकरेंनी आम्हाला दगा दिला, असा आरोप करत संभाजी ब्रिगेड या युतीतून बाहेर पडली आहे.

याबाबत संभाजी ब्रिगेडचे नेते मनोज आखरे म्हणाले की, २०२२ मध्ये संभाजी ब्रिगेडने ठाकरेंच्या शिवसेनेशी युती केली होती. लोकसभा निवडणुकीत संभाजी ब्रिगेडने महाविकास आघाडीचा धर्म पाळत प्रचंड ताकदीने सहकार्य केले. महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी प्रचारक, वक्ते फिरले. लोकसभेत महाविकास आघाडीला त्याचा फायदा झाला. चांगल्या जागा मिळाल्या. विधानसभा निवडणुकीत आम्हाला ५-६ जागा देऊ असे उद्धव ठाकरेंनी आश्वासन दिले होते. मात्र गेल्या महिनाभर बैठका घेतल्या, पण आम्हाला ताटकळत ठेवले. कुठलाही निर्णय घेतलेला नाही, असा आरोप आखरे यांनी केला.

तसेच महिनाभरापासूनचे महाराष्ट्राचे राजकारण पाहता आपण स्वबळावर निवडणूक लढवली पाहिजे असे आम्ही ठरवले. त्यामुळे संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रात ५०-६० जागांवर आमचे उमेदवार देणार आहे. संभाजी ब्रिगेडचा विश्वासघात झाला आहे. जो विश्वास आम्ही ठाकरेंच्या शिवसेनेवर ठेवला, महाविकास आघाडीवर ठेवला, त्याचा विश्वासघात झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मराठा बहुजनांच्या पुरोगामी चळवळी असतील त्यांना आवाहन आहे, त्यांनी महायुतीचे सनातन विषमता आणि महाविकास आघाडीचे बेगडी पुरोगामीत्व यांच्याविरोधात ताकदीने उभे राहिले पाहिजे.

हा महाराष्ट्र शिव शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. हे लोक केवळ भाषणात त्यांची नावे घेतात पण कृतीत कुठलेही काम नसते. त्यामुळे जे लोक पुरोगामी विचारांचे आहेत त्यांनी संभाजी ब्रिगेडसोबत सहभागी व्हावे, असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे मनोज आखरे यांनी केले आहे.

ऑगस्ट २०२२ मध्ये उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडसोबत युती केली होती. त्यावेळी मातोश्रीवर झालेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे म्हणाले होते की, प्रादेशिक अस्मिता वाचवण्यासाठी एकत्र यायला हवे असे अनेकजण म्हणतात, आता संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र येऊन मोठा इतिहास घडवू. आगामी सर्व निवडणुकीमध्ये संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र मैदानात उतरतील, असे ठाकरेंनी सांगितले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -