देशांच्या यशाअपयशाच्या कारणमीमांसेला नोबेल पारितोषिक

जगात मुठभर देशच श्रीमंत असून गरीब देशांची संख्या प्रचंड आहे. श्रीमंत देश यशस्वी का होतात व गरीब देश अपयशी का होतात याची अत्यंत प्रभावीपणे अर्थविषयक मांडणी करणाऱ्या डॅरोन ॲसेमोगलू, सायमन जॉन्सन व जेम्स ए रॉबिन्सन या अर्थशास्त्रज्ञांना संयुक्त नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे. त्यांच्या संशोधन कार्याचा वेध घेण्याचा हा प्रयत्न.


प्रा. नंदकुमार काकिर्डे


द नोबेल पुरस्कार हा जागतिक मान्यतेचा खूप मोठा पुरस्कार असून २०२४ या वर्षासाठीचा आर्थिक क्षेत्रासाठीचा दिला जाणारा पुरस्कार डॅरोन ॲसेमोगलू, सायमन जॉन्सन व जेम्स ए रॉबिन्सन या तीन अर्थतज्ज्ञांना देण्यात आला आहे. त्यांनी जे संशोधन केलेले आहे ते खूप मोलाचे व महत्त्वाचे आहे. जगातील काही मोजके देश यशस्वी होऊन श्रीमंत होतात, तर काही देश अपयशी होऊन गरीब का राहतात याची नेमकी कारणमीमांसा या तिघांनी केलेली आहे. प्रत्येक देशातील सर्वसमावेशक आर्थिक संस्था आणि पिळवणूक किंवा शोषण करणाऱ्या संस्था यांच्यात नेमका फरक काय? त्याचेही विवेचन त्यांनी केलेले आहे. जगातील वसाहतवादी शक्तींनी इतरांचे शोषण करणाऱ्या संस्था निर्माण केल्या, तर काही वसाहतींमध्ये सर्वसमावेशक काम करणाऱ्या आर्थिक संस्था कशा निर्माण केल्या याचाही त्यांनी शास्त्रीय अभ्यास करून त्याची मांडणी केलेली आहे. गेली अनेक दशके जगातील काही मुठभर देश का श्रीमंत झालेले आहेत व अन्य शेकडो देश गरिबीच्या खाईत का जगत आहेत याबद्दल अर्थशास्त्रज्ञांमध्ये सातत्याने चर्चा व संशोधन सुरू आहे. जगातील २० टक्के श्रीमंत देश हे २० टक्के अत्यंत गरीब असलेल्या देशांच्या तब्बल तीस पट श्रीमंत आहेत असे विधान खुद्द नोबेल पुरस्कार देणाऱ्या समितीने व्यक्त केलेले आहे. किंबहुना औद्योगिक क्रांती झाल्यानंतर जगाची पूर्व आणि पश्चिम अशी उभी विभागणी झालेली असून श्रीमंत देश अधिक श्रीमंत होत आहेत, तर गरीब देश आणखी गरीब होताना दिसत असून त्यांच्यात महान भिन्नता निर्माण झालेली आहे. त्यामुळे जागतिक पातळीवरील अर्थशास्त्रज्ञांमध्ये गरीब देश आणि श्रीमंत देश यांच्यातील जीवनमानाची नेमकी कारणमीमांसा शोधण्याचा सतत प्रयास असतो. अनेक शास्त्रज्ञांनी याबाबत वेगवेगळे सिद्धांत मांडलेले आहेत.


काही ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञांनी पश्चिमेकडील देशांचा वसाहतवाद हाच त्यांच्या भरभराटीला आजही कारणीभूत असल्याचे नमूद केलेले आहे, तर काही अर्थतज्ज्ञांनी विविध देशांमध्ये असलेल्या साधनसंपत्ती व त्याच्या उपलब्धतेमुळे संबंधित देश श्रीमंत होत असल्याचे प्रतिपादन केले आहे. प्रत्येक देशातील बौद्धिक आणि ऐतिहासिक घडामोडी यांच्यामुळे त्या देशाचे नशीब निर्माण होत असल्याचा सिद्धांत त्यांनी सविस्तरपणे मांडलेला आहे. २०२४ मध्ये अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळणाऱ्या या तीन अर्थशास्त्रज्ञांनी असे प्रतिपादन केले आहे की, प्रत्येक देशात असणाऱ्या आर्थिक, राजकीय संस्थांच्या गुणवत्तेमुळेच त्या देशाच्या आर्थिक भविष्यावर चांगला किंवा वाईट परिणाम होत असतो. २०१२ मध्ये डॅरोन ॲसेमोगलू व जेम्स ए रॉबिन्सन या दोघांनी मोठा लोकप्रिय प्रबंध प्रकाशित केला होता. त्याचे शीर्षक "देश अपयशी का होतात - शक्ति, समृद्धी आणि गरिबीचे मूळ (व्हाय नेशन फेल्स - द ओरिजिन्स ऑफ पॉवर, प्रोस्पॅरिटी अँड पॉव्हर्टी)असे होते. त्याचप्रमाणे २००४ मध्ये याच तिघांनी एक प्रबंध लिहिला होता. त्याचे शिर्षक "आर्थिक संस्था याच दीर्घकालीन वाढीचे मूलभूत कारण आहेत" (इकॉनॉमिक इन्स्टिट्यूशन्स ॲज फंडामेंटल कॉज ऑफ लॉन्ग रन ग्रोथ) हेच होते.
एखाद्या देशात संस्था कशा तयार होतात त्याचा समृद्धीवर कसा परिणाम होतो यावर त्यांनी केलेले संशोधन असून त्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा नोबल पारितोषिक जाहीर करण्यात आला आहे. या तिन्ही अर्थशास्त्रज्ञांना १.१ दशलक्ष डॉलरचे पारितोषिक दिले जाणार आहे. डेरान असेमोगलू व सायमन जॉन्सन हे मॅसेच्युसेटस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी(एमआयटी)येथे काम करतात, तर रॉबिन्सन हे शिकागो विद्यापीठात संशोधन करतात. देशाच्या समृद्धीसाठी सामाजिक संस्थांचे महत्त्व या तिन्ही अर्थतज्ज्ञांनी अधोरेखित केलेले असल्याचे नोबेल समितीने स्टॉक होम येथे जाहीर केले आहे. ज्या समाजात कायदा व सुव्यवस्था चांगली नाही व तेथील लोकांचे आर्थिक शोषण केले जाते, त्या समाजात देशाचा विकास होऊ शकत नाही असे प्रतिपादन या तिन्ही संशोधकांनी केलेले आहे. त्यांच्या या संशोधनामुळे हे असे का घडते हे समजण्यास सर्वांना मोठ्या प्रमाणावर मदत झालेली आहे. विविध देशांमधील उत्पन्नातील मोठी तफावत भरून काढणे हे आजच्या आधुनिक काळातील मोठे आव्हान असून ते साध्य करण्यासाठी प्रत्येक देशातील सामाजिक तसेच आर्थिक संस्थांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे असे प्रतिपादन या तिघांनी केलेले आहे. त्यांच्या संशोधनामुळे देश अपयशी किंवा यशस्वी का होतात याची मूळ कारणे अधिक सखोलपणे स्पष्ट झालेली आहेत. अल्फ्रेड नोबेल नोबेल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अर्थशास्त्रातील पुरस्काराचा प्रारंभ स्वीडिश मध्यवर्ती बँकेने १९६८ मध्ये केली होती. अल्फ्रेड नोबेल यांच्या इच्छेनुसार स्थापन झालेल्या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, साहित्य आणि शांतता या क्षेत्रातील कामगिरीसाठी दरवर्षी हे पुरस्कार जाहीर केले जातात. खुद्द अल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाईटचा शोध लावला होता. व त्यांचे १८९६ मध्ये निधन झालेले होते. २०२३ मध्ये क्लाडिया गोल्डन यांना महिला व पुरुषांना समान वेतन मिळावे यासाठी केलेल्या संशोधनासाठी अर्थशास्त्रातील नोबल पारितोषिक देण्यात आले होते, तर यावर्षी वरील महत्त्वाच्या संशोधनासाठी अर्थशास्त्रातील तीन शास्त्रज्ञांना या वर्षीचा पुरस्कार देण्यात आला आहे.


अनेक देशांमध्ये अशा प्रकारच्या सर्व समावेशक आर्थिक संस्था का निर्माण होत नाहीत यावरही प्रकाश टाकलेला आहे. प्रत्येक देशामध्ये सत्तेवर असणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्या आवडीनिवडींप्रमाणे आर्थिक संस्था निर्माण केल्यामुळे हे यश किंवा अपयश त्या देशाला लाभते असे विविध उदाहरणासह स्पष्ट केले आहे. ज्या देशांमधील सत्ताधीश स्वतःच्या व्यक्तिगत लाभांसाठी निर्माण केलेल्या आर्थिक संस्थांच्या माध्यमातून संपत्ती हडप करतात, त्या देशांमधील एकूण आर्थिक व राजकीय विकास हा रसातळाला गेलेला असतो व असे देश गरिबीच्या खाईमध्ये लोटले गेलेले असतात असे प्रतिपादन त्यांनी केलेले आहे. अशा प्रकारचे शोषण करणाऱ्या आर्थिक व सामाजिक संस्थांच्या कार्यपद्धती विरोधात जोपर्यंत तेथील समाज उभा राहून विरोध करत नाही किंवा आंदोलन उभे करत नाही तोपर्यंत त्या देशातील गरिबी कायम राहते. मात्र जेव्हा एखाद्या देशात अशा प्रकारची आंदोलनाची शक्ती निर्माण होण्याचा सतत धोका असतो तेव्हा तेथील सत्ताधारी देशातील लोकइच्छेनुसार नाईलाजाने का होईना अशा आर्थिक संस्था निर्माण करतात आणि त्याचा अनुकूल परिणाम देशाच्या आर्थिक यशस्वीतेवर होतो असेही मत प्रबंधामध्ये व्यक्त करण्यात आलेले आहे. भारतासारख्या अत्यंत खंडप्राय व एकेकाळी सोन्याचा धूर निर्माण करणाऱ्या देशामध्ये इंग्रजांनी आक्रमण करून त्यांच्या वसाहती स्थापन केल्या. त्याचप्रमाणे त्यांच्या आर्थिक संस्था संस्थांच्या माध्यमातून भारत देशाला कंगाल केल्याचा इतिहास जगापुढे आजही आहे.


ज्या देशांमध्ये इंग्रजांना प्रदीर्घकाळ सत्ता उपभोगावयाची होती तेव्हा त्यांनी त्या-त्या देशांमध्ये सर्वसमावेशक आर्थिक संस्था निर्माण केल्याची अनेक उदाहरणे सुद्धा असल्याचे या प्रबंधात नमूद करण्यात आले आहे. भारतामध्ये रिझर्व बँक ऑफ इंडियासारखी मध्यवर्ती बँक ही इंग्रजांनी निर्माण केलेली होती हे लक्षात घेतले, तर काही प्रमाणात भारताचा आर्थिक विकास करण्याच्या दृष्टिकोनातून अशा संस्था अखेरच्या काळात निर्माण केल्या होत्या. अमेरिकेच्या बाबतीत इंग्रजांनी त्या काळामध्ये निर्माण केलेल्या सर्व समावेशक आर्थिक संस्थांमुळेच आज जगभरात सर्वाधिक श्रीमंत व प्रभावशाली देश म्हणून अमेरिकेचा उल्लेख केला जातो याचाही उल्लेख या प्रबंधामध्ये करण्यात आलेला आहे.या संस्थांमध्ये संस्कृती सारख्या महत्त्वाच्या घटकांचाही समावेश केलेला असतो त्यामुळेच त्या त्या देशांमधील एकूण राजकीय व आर्थिक संस्थांच्या माध्यमातून त्याचे नियम तयार होतात असेही नमूद करण्यात आलेले आहे. जर प्रत्येक देशातील सत्ताधाऱ्यांनी सर्वसामावेशक स्वरूपाच्या राजकीय व आर्थिक संस्था निर्माण केल्या व त्याला संस्कृतीची योग्य जोड दिली तर त्याचा निश्चित लाभ देशाला होऊन देश श्रीमंत, तर होतोच; परंतु त्या देशातील सर्व घटकांना आर्थिक न्याय दिला जाऊ शकतो. त्यामुळेच प्रत्येक देशातील अशा आर्थिक संस्थांची गुणवत्ता ही अत्यंत महत्त्वाची असल्याचे या संशोधकांनी अधोरेखित केलेले आहे. आज भारताचा आर्थिक विकासाचा दर जागतिक पातळीवर खूप चांगला असल्याने येत्या काही वर्षात जागतिक आर्थिक महासत्तांमध्ये आपला समावेश होऊ शकतो. मात्र त्याचवेळी दारिद्र्यरेषेखाली असणाऱ्या लोकसंख्येचा आकडा पाहता देशातील सर्व सामाजिक व आर्थिक संस्था अधिक बळकट करून सहकाराच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्ती समाज व पर्यायाने देशाची श्रीमंती निर्माण करणे हा त्यावर योग्य मार्ग निश्चित असू शकतो.


स्वातंत्र्योत्तर काळामध्ये देशातील सत्ताधाऱ्यांनी स्वतःसाठी लूट केल्यामुळे देश श्रीमंत होऊ शकला नाही व गरीब राहिला ही वस्तुस्थिती आहे. मात्र अमृत महोत्सवी काळात हे चित्र बदलून सशक्त व सर्वसमावेशक आर्थिक संस्थांच्या माध्यमातून व्यक्ती, समाज व देशाचा सर्वागिण विकास होऊन आपण महासत्तेकडे वाटचाल करू शकतो याचे दिग्दर्शन या संशोधनात आहे. त्यामुळेच अशा प्रकारचे मोलाचे संशोधन करून जगाला मार्गदर्शन करणाऱ्या व नोबेल पारितोषिकाने सन्मानित झालेल्या तिन्ही अर्थशास्त्रज्ञांना मानाचा मुजरा.

Comments
Add Comment

२०३० पर्यंत पुनर्विकास प्रकल्प बदलणार मुंबईचे स्कायलाईन

उपनगरीय कॉरिडॉर ठरणार मुंबईच्या पुनर्विकास कहाणीचे प्रमुख केंद्र  मुंबईचा गृहनिर्माण बाजार मोठ्या बदलाच्या

Ask Private Limited व Hurun India अहवालातून गेमिंग कंपन्या बाहेर तर Zerodha नंबर १

मोहित सोमण: एएसके प्रायव्हेट लिमिटेड (Ask Private Limited) व हुरून इंडिया (Hurun India Limited) ने आपला पाचवा Ask Private Wealth Hurun India Unicorn and Future Unicorn 2025 अहवाल

आतापर्यंत ६ कोटी लोकांनी ITR भरला आयकर विभाग म्हणाले, 'आतापर्यंत.....

प्रतिनिधी:कर निर्धारण वर्ष (Income Tax Assesment Year) २०२५-२६ साठी आतापर्यंत सहा कोटींहून अधिक आयकर विवरणपत्रे (ITR Filings) दाखल

Explainer- ITR भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस ! 'या' १५ चुका टाळल्यास तुमचा आयटीआर चुकणारच नाही

आयटीआर (Income Tax Returns) भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक आहे. त्यामुळे एकप्रकारे करदात्यांना धाकधूक असते. त्यावेळी

आरबीआयकडून फोन पे ला २१ लाखांचा दंड

प्रतिनिधी:आरबीआयने (Reserve Bank of India) फोन पे या आघाडीच्या फिनटेक कंपनीला २१ लाखांचा दंड ठोठावला आहे. शुक्रवारी याबद्दल

Will the ITR filing 2025 date be extended? : ITR फायलिंगसाठी तांत्रिक अडचणी! आता फक्त इतके दिवस शिल्लक, ITR डेडलाईन वाढणार का? अपडेट जाणून घ्या

मुंबई : आयकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम मुदत आता अगदी जवळ आली आहे. करदात्यांसाठी १५ सप्टेंबर २०२५ ही शेवटची तारीख