नॉस्टॅल्जिया – श्रीनिवास बेलसरे
उत्तर प्रदेशातून ८० वर्षांपूर्वी शकील मसुदी नावाचा एक तरुण मुंबईत आला. आल्या आल्या त्याने पहिली भेट घेतली ती संगीतकार नौशाद आणि निर्माते ए. आर. कारदार यांची. त्यांना फिल्मी गीतकार व्हायचे होते.नौशादसाहेबांनी त्या बिचाऱ्या साध्याभोळ्या तरुणाला एक आव्हानच दिले. ते म्हणाले, ‘तुझे काव्यातले कौशल्य मला एका वाक्यात सांग!’ दिल्ली आणि बदायुनमध्ये अनेक मुशायरे गाजवलेल्या त्या शायरने ताडकन उत्तर दिले की,
‘हम दर्दका अफसाना दुनिया को सुना देंगे,
हर दिल मे मुहब्बतकी एक आग लगा देंगे.’
आणि पुढे ही मुहब्बतकी आग त्याने केवळ सिनेरसिकांच्या मनातच लावली असे नाही, तर काळाच्या मागे जाऊन एका मुगल सम्राटाच्याही हृदयात पेटवली होती. ‘मुगले आझम’मधील त्याचे एक गाणे शहजादा सलीमच्या हृदयात प्रेमाचा अग्नी भडकावणारेच होते. त्यात पुन्हा ते मधुबाला नावाच्या अप्सरेवर चित्रित केलेले! शब्द होते –
‘प्यार किया तो डरना क्या,
प्यार किया कोई चोरी नही की,
छुप छुप आहे भरना क्या,
जब प्यार किया तो…’
नौशाद आणि शकीलजीची ती भेट आयुष्यभर चाललेल्या एका जिवलग मैत्रीची आणि सर्व देशाला पुढे २४ वर्षे मिळणार असलेल्या संगीत मेजवानीची सुरुवात होती. शकील यांच्या उत्तराने नौशादसाहेब त्या दिवशी इतके खूश झाले की, त्यांनी लगेच ‘दर्द’(१९४७) या सिनेमाचे गीतलेखनाचे काम शकील यांना दिले. त्यावेळी आपले आपल्या गावाशी नाते जाहीर करत मसुदी यांनी ‘शकील बदायुनी’ असे नाव धारण केले.
‘दर्द’मधील सर्वच गाणी हिट झाली. विशेषत: उमादेवी ऊर्फ ‘टूनटून’ यांनी गायलेले ‘अफसाना लिख रही हुँ, दिले बेकरारका आँखोमे रंग भरके तेरे इंतजार का’ हे गाणे तर प्रचंड गाजले. मग संगीतकार नौशाद आणि गीतकार शकील बदायुनी असे एक अद्वैतच निर्माण झाले. त्यांनी एकापाठोपाठ एक दिलेल्या जबरदस्त गाण्यांचे चित्रपट होते ‘दुलारी’(१९४९), ‘दिदार’(१९५१), ‘बैजू बावरा’(१९५२), ‘शबाब’(१९५४), ‘मदर इंडिया’(१९५७), ‘मुगले आझम’(१९६०), ‘गंगा जमुना’(१९६१), ‘मेरे मेहबूब’(१९६३). ही झाली निवडक उदाहरणे. शकील बदायुनी यांनी एकूण ८९ सिनेमांची गाणी लिहिली. त्यांच्या गाण्यांच्या नुसत्या पहिल्या ओळी पाहिल्या तरी आपण भूतकाळातील रम्य आठवणीत हरवून जातो आणि या शब्दांच्या जोहरीने दिलेल्या एकेका सुंदर रत्नांची कल्पना येते.
‘सुहानी रात ढल चुकी ना जाने तुम कब आओगे?’, ‘ओ दुनियाके रखवाले, सून दर्द भरे मेरे नाले’, ‘मधुबनमे राधिका नाचे रे’, ‘चौदहवीका चांद हो, या आफताब हो’, ‘ये जिंदगी के मेले दुनिया में कम ना होंगे’, ‘मिलतेही आँखे दिल हुवा दिवाना किसीका’, ‘एक शहनशाहने बनवाके हंसी ताजमहल’, ‘कोई सागर दिलको बहालता नही’, ‘बेकरार करके हमे युं ना जाईये, आपको हमारी कसम लौट आईये’, ‘लो आ गई उनकी याद वो नही आये’, ‘आज पुरानी राहोसे, कोई मुझे आवाज ना दे’ ही सगळी रत्ने शकीलजींच्याच खजिन्यातली.
त्यांना १९६१ साली ‘चौदहवीका चांद हो’ या गाण्यासाठी सर्वोत्तम गीताचे फिल्मफेयर पारितोषिक मिळाले. पाठोपाठ १९६२ ला ‘घराना’मधील ‘हुस्नवाले तेरा जवाब नही’ या गाण्यासाठी, तर १९६३ मध्ये ‘कही दीप जले कही दिल’ या गाण्यासाठी सर्वोत्तम गीतकार अशी एकूण तीन फिल्मफेयर मिळाली. लोक त्यांना कौतुकाने ‘गीतकार-ए-आझम’ म्हणत.‘बैजू बावरा’मध्ये, तर त्यांनी कहरच केला होता. गाणे होते भक्तिरसाने ओतप्रोत भरलेले ‘मन तडपत हरी दर्शनको आज’ गाणे हिंदू श्रद्धेचे आणि तिन्ही कलाकार मुस्लीम! गीतकार शकीलजी, संगीतकार नौशादसाहेब आणि गायक महंमद रफी! कसला सुंदर काळ होता तो! गेला तो काळ! आता बॉलीवूडमध्ये देवाचे नावच बदलले आहे. ते ‘रब, अल्ला आणि मौला’ झाले आहे. आता अशा विलक्षण धार्मिक सौहार्दाचे दर्शन अशक्यच.
केंद्र सरकारने शकीलजींच्या भरीव योगदानाची ओळख ठेवत ३ मे २०१३ ला त्यांच्या गौरवार्थ पोस्टाचे तिकीट प्रकाशित केले होते.
शकीलजींनी फिल्मी गाण्यांबरोबर गझलाही लिहिल्या. त्याही जाणकारांना भावल्या. त्यांचा मोह बेगम अख्तरसारख्या गझल सम्राज्ञीपासून अगदी अलीकडच्या काळातील पंकज उधास, जगजीतसिंग यांनाही आवरला नाही. त्यांची बेगम अख्तर यांनी गायलेली एक गझल लोकप्रिय आहे. अनेकदा प्रेमाच्या नुसत्या कल्पनेनेही माणसाला अपूर्व आनंद मिळतो. कुणीतरी आपल्याला आवडते किंवा आपण कुणाला तरी आवडतो या सुखद जाणिवेपासून, तर आयुष्यभर ती व्यक्ती आपली हक्काची साथीदार होणार, पूर्णत: आपली होणार इथपर्यंतची भावना अपार सुख देऊन जाते. पण जेव्हा त्या नात्यात काहीतरी विपरीत घडते आणि जिने सगळे भावविश्व व्यापून टाकले होते ती व्यक्ती आयुष्यातून अचानक निघून जाते. एक असह्य एकटेपणा मनाला घेरून टाकतो तेव्हा येणारी निराशा जीवघेणी असते. मग सगळे जगणे व्यर्थ वाटू लागते. कालपर्यंत सुंदर वाटणारे जग भेसूर भासते. माणूस आपला रोष, आपली निराशा, आपली तक्रार कुणाकडेही करू लागतो. मनस्वी हृदयाचा कवी तर आपली कैफियत प्रेम या अमूर्त, अदृश्य भावनेपुढेच मांडू लागतो. प्रेमा, तुझ्या अनुभवामुळे माझ्या डोळ्यांत अश्रू दाटले रे. इतके दिवस अपर सुख देणारे नावही आता डोळ्यांसमोर नकोसे झाले आहे. त्याच्या नुसत्या विचारानेसुद्धा माझ्या डोळ्यांतून धारा वाहू लागतात-
‘ऐ मोहब्बत तेरे अंजामपे रोना आया
जाने क्यूँ आज तेरे नामपे रोना आया.’
आधी दिवस किती वेगळे होते, मन सुखात विहरत होते. दिवस कसाही जावो, संध्याकाळी मनात जीवलगाच्या भेटीची उत्कट आशा असायची, किती स्वप्ने डोळ्यांत तरळायची. पण आज मात्र डोळे फक्त अश्रूंनी भरून येत आहेत.
‘यूँ तो हर शाम उमीदों में गुजर जाती है,
आज कुछ बात है, जो शाम पे रोना आया.’
कधी नशिबाने केलेल्या उपेक्षेचे दु:ख, तर कधी जगाने दिलेल्या त्रासाची कैफियत. माझ्या प्रेमाच्या या प्रवासात प्रत्येक पाऊल रडत-रडतच पडू लागले.
‘कभी तकदीरका मातम कभी दुनिया का गिला,
मंजिल-ए-इश्क में हर गम पे रोना आया.’
नशिबाचे ग्रह इतके बदलले की, दु:खाच्या अतिरेकामुळे माझ्या कैफियतने टोक गाठले अन् मला रडूच कोसळले-
‘मुझपेही खत्म हुआ सिलसिला-ए-नौहागरी,
इस कदर गर्दिश-ए-अय्याम पे रोना आया.’
आता इतरांच्या प्रेमकथाचा नुसता उल्लेख कानावर पडला तरी माझ्या प्रेमातुर जीवाची शोकांतिका आठवून अश्रू अनावर होतात.
‘जब हुआ जिक्र जमाने में मोहब्बतका ‘शकील’
मुझको अपने दिल-ए-नाकामपे रोना आया.’
अशा उदास करणाऱ्या, हुरहूर लावणाऱ्या गझला दाखवून देतात की, अशा अनुभवातून सगळ्यांनाच कधी ना कधी जावे लागते. मनाला त्यातून एक वेगळाच दिलासा वाटून जातो हे खरेच. म्हणून कधी त्याही ऐकायच्या.