Wednesday, December 4, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यमहाविकास आघाडी उमेदवारांच्या शोधात...!

महाविकास आघाडी उमेदवारांच्या शोधात…!

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. राज्यात भारतीय जनतापार्टी, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आरपीआय आठवले गट व सहयोगी यांची महायुती आणि राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट मिळून महाविकास आघाडी गठबंधन झालेले आहे. निवडणुका जशा जवळ येतात तसे ‘तुझे माझे जमेना तुझ्यावाचून करमेना’ अशीच काहीशी स्थिती युती, आघाडीत असते. सध्याच्या राजकारणात कमालीची अस्थिरता पहायला मिळते. आपण विचार करून थांबलो तर समोरचा कुरघोडी करून समोर उभा ठाकणार कोणीही कुणासाठीही थांबण्याच्या मानसिकतेत नसल्याचे चित्र महाराष्ट्राच्या राजकारणात आपणाला पहायला मिळते. लोकसभा निवडणुकीतील निकालात महाविकास आघाडीला कोकण वगळून उर्वरित महाराष्ट्रात चांगल यश प्राप्त झाले होते. लोकसभा निवडणुकीत एकिकडे महाराष्ट्रातील उर्वरित भागात जरी यश मिळाले असले तरीही कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघात मात्र महायुतीने यश सपादन केले.

माझे कोकण – संतोष वायंगणकर

संविधान बदलणार अशी हाकाटी पिटणारी काही बुद्धिवंत महाराष्ट्रात फिरून निवडणुका नजरेसमोर ठेऊन जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे प्रयत्न झाले. कोकणातील जनतेने आपला बुद्धीभेद होऊ न देता त्यांना योग्य वाटणारा निर्णय घेतला. विधानसभा निवडणूक कार्यक्रमाची घोषणा निवडणूक आयोगाकडून झाली आहे. महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजूने सत्ता संपादन करण्यासाठी आवश्यक त्या सारे फंडे वापरले जात आहेत. कोकण वगळून राज्यातील इतर भागात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडून नेहमीप्रमाणे फोडाफोडीचे राजकारण जोरदार सुरू आहे. याच फोडाफोडीला शरद पवार यांना मानणारे तथाकथित बुद्धिवादी समर्थक ‘मुत्सदेगिरी’ संबोधतात. राज्यात जमेल तितकी फोडाफोडी सुरू आहे. एकिकडे महाराष्ट्रातील इतर भागात जरी हे चित्र असले तरीही कोकणात मात्र महाविकास आघाडीला निवडणूक लढविण्यास उमेदवारच सापडत नाहीत अशी स्थिती आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, ठाणे या सर्वच जिल्ह्यांमध्ये महायुतीकडे उमेदवार आहेत; परंतु महाविकास आघाडीकडे उमेदवारच नाहीत ही वस्तुस्थिती आणि समजा महाविकास आघाडीत जे इच्छुक असतील त्यांना विजयाची खात्री नाही तर पराभवाची हमखास गॅरंटी आणि मनात भीती यामुळे तू नाय तर मी अशा समझोत्याच्या चर्चा होताना दिसत आहेत. कोकणातील लोकसभा मतदारसंघातील मताधिक्य किंवा काठावरची स्थिती ही इच्छुकांची डोकेदुखी वाढवणारीच आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर या पाचही जिल्ह्यांमध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गट यामध्ये कोकणात राष्ट्रवादी काँग्रेस रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण विधानसभा मतदारसंघ, रायगड जिल्ह्यात बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांचा मतदार संघ आणखी एका मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आहे. तर शिवसेना शिंदे गट रत्नागिरीतील रत्नागिरी-संगमेश्वर, लांजा-राजापूर, दापोली या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आहेत.

भारतीय जनता पार्टीचे रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी मतदारसंघ, गुहागर आणि दापोली या मतदारसंघात कार्यकर्ते आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली-वैभववाडी-देवगड, कुडाळ-मालवण आणि सावंतवाडी-वेंगुर्ले-दोडामार्ग या तीनही मतदारसंघात भाजपाचे प्राबल्य आहे. मात्र, यातील सावंतवाडी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर करीत आहेत. या सावंतवाडी मतदारसंघात अनेक इच्छुक आहेत. यात प्रामुख्याने माजी आमदार राजन तेली इच्छुक आहेत. राजन तेली केवळ इच्छुक नाहीत तर कोणत्याही स्थितीत निवडणूक लढविण्याचा निर्धारच त्यांनी अनेकवेळा केला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अर्चना घारे-परब या मतदारसंघात इच्छुक आहेत. मागील पाच वर्षांपासून या मतदारसंघाशी अर्चना घारे-परब जोडल्या गेलेल्या आहेत. उबाठाचा या मतदारसंघावर दावा आहे; परंतु उमेदवार कोण? असा प्रश्न आहेच. अर्थात कोकणातील सर्वच विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून कोण असा प्रश्न आहेच. ते इच्छुक असतील त्यांच्यामध्ये त्या-त्या मतदारसंघातून निवडून येण्याची क्षमता नाही. कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात उबाठाकडून विद्यमान आमदार वैभव नाईक पुन्हा एकदा निवडणुक लढवणार आहेत. गेल्या दहा वर्षांत मतदारांना सांगू शकतील, दाखवू शकतील असं विकासकाम नसल्याने साहजिकच कुडाळ-मालवण मतदारसंघातील जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे. याउलट गेली पाच वर्षे माजी खासदार निलेश राणे कुडाळ-मालवण मतदारसंघात लोकांच्या संपर्कात राहून जनतेचे प्रश्न सोडवत आहेत. कोणत्याही स्थितीत या मतदारसंघात आ.वैभव नाईक यांच्यासमोर महायुतीकडून निलेश राणे असतील ते या मतदारसंघात परिवर्तन घडवतील असा राजकीय धुरिणांकडून खात्रीपूर्वक म्हटले जात आहे. सिंधुदुर्गातील कणकवली-वैभववाडी-देवगड मतदारसंघात महायुतीकडून भाजपाचे आ. नितेश राणे हॅटट्रीक करतील यात कुणालाच शंका नाही. यामुळेच या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून निवडणूक कोणी लढवावी या प्रश्नाभोवतीच फिरत आहेत. या मतदारसंघात नको रे बाबा! त्यापेक्षा उमेदवारीच नको. यावर सर्व इच्छुकांचे एकमत आहे.

रत्नागिरी मतदारसंघात उद्योगमंत्री उदय सामंत पाचव्यांदा निवडणूक लढवतील. उदय सामंत यांनाही या मतदार संघात यावेळची निवडणूक सहजतेने आमदारकी खिशात घालण्याएवढी सोपी जाणार नाही, असे म्हटले जात आहे. मात्र, तरीही निवडणूक कशी लढवावी आणि विजयी कसे व्हावे याचा खास फंडा उदय सामंत वापरतील अशी चर्चा रत्नागिरीत आहे. सिंधु-रत्न मंडळाचे सदस्य किरण सामंत राजापूरमधून निवडणुक लढविण्यास इच्छुक आहेत. राजन साळवी यांना या मतदारसंघात कोणतंही काम नाही. मात्र, राजन साळवी यांचा जनसंपर्क हीच त्यांची जमेची बाजू राहिली आहे. किरण सामंत यांनी संपर्क अभियान राबवण्यात सुरुवात केली आहे. गुहागरमध्ये आ.भास्कर जाधव यांना यावेळची निवडणूक सहज सोपी जाणार नाही. चिपळणूमध्ये आ.शेखर निकम चेहऱ्यावरच हास्य कायम ठेवत आणि मनातलं चेहऱ्यावर येऊ न देता पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जातील. ईमेज जपणाऱ्या शेखरसरांसमोर महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल हे पहायचे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -