फुलांच्या बागेत रोजच
कुजबूज चालत होती
कान देऊन ऐकलं तर
फुलंच बोलत होती
गुलाब म्हणतो मी तर
आहे फुलांचा राजा
देखणेपणाचा मुळीच
नाही करीत गाजावाजा
गंधाचा बादशाह खरा
म्हणतात या चाफ्याला
मोहक रूपाने माझ्या
भुलवतो मी साऱ्यांना
देवाची देणगी म्हणजे
मी चमेलीचे फूल
माझ्या सुवासाची
साऱ्यांना पडते भूल
गुलछबू, गुलछडी
ही नावे माझीच खरी
निशिगंधाचा सुगंध दरवळे
उमलताना रात्री
प्रसन्न सात्त्विक मंगल
सुंगधदायी मी मोगरा
देखणा दिसे माझ्यामुळे
वेणीतील गजरा
सदाफुली नावासारखी
मी दिसे हसतमुख
सदाबहार सुंदर
माझेच आहे रूप
स्वर्गीय फूल जणू
पारिजातक देखणे
रूप, रंग, गंधाचे माझ्या
फुलते जणू गाणे
चांदण्यासारखे शुभ्र
मी फूल तगराचे
पूजेसाठी नेहमीच मला
आशीष देवांचे
कमळ म्हणे मला
राष्ट्रीय फुलाचा मान
डोलताना पाहून मला
हरपेल तुमचे भान
फुलांच्या गप्पा नेहमी
जातात अशाच रंगत
दिवस नाही, रात्र नाही
बसतात गुजगोष्टी सांगत
एकनाथ आव्हाड – काव्यकोडी
१) पशूंची, पक्ष्यांची
फुलांची, फळांची
वस्तूंची, व्यक्तींची
चराचरातील साऱ्यांची
कितीतरी नावे रोजच
ओठावरी येतात
या नावांनाच व्याकरणात
काय म्हणतात?
२) श्रीगणेश जयंती
वसंत पंचमी
रथसप्तमी
रामदास नवमी
महाशिवरात्रीला
शंकराचे दर्शन
कोणत्या मराठी महिन्यात
येतात हे सण?
३) कुष्ठरुग्णांसाठी माळरानावर
फुलवले ‘आनंदवन’
थकल्या-भागल्या वृद्धांसाठी
उभारले ‘उत्तरायण’
दुसऱ्यांसाठी जगण्याचा
आदर्श घालून दिला
‘भारत जोडो’ हा विचार
कुणी रुजवला ?