क्राइम – अॅड. रिया करंजकर
मुंबई हे औद्योगिक शहर आहे. औद्योगिक शहरांमध्ये नोकरीसाठी अनेक ठिकाणांहून लोक मुंबई शहरामध्ये येतात. सुरुवातीला नोकरीच्या निमित्ताने येतात व काही वर्षे स्थिर झाल्यावर ते आपल्या कुटुंबाला मुंबईला बोलवतात. जेव्हा कुटुंब मुंबईत येते. त्यावेळी राहण्याचा प्रश्न येतो. अशावेळी काही लोक भाड्याचे घर पसंत करतात तर काही स्वतःच्या कष्टाने छोटसे का होईना पण घर विकत घेतात.पण अनेक लोक भाड्याने राहणे पसंत करतात. आपली नोकरी संपली की, आपण आपल्या गावाकडे जाऊ. पंजाबी घर मालक भाडोत्री ठेवतो किंवा भाडोत्री एखादे घर भाड्याने घेतो. त्यावेळी अनेक प्रश्न निर्माण होतात. काही वेळा ते प्रश्न सुटतच नाहीत.
शोभा यांचेही घर असेच भाड्याने दिले होते. ते घर म्हणायला गेले तर तिच्या आई-वडिलांचे होते आणि त्यावर दोन बहिणी आणि दोन भावांचा अधिकार होता. पण शोभाचा मोठा भाऊ दिनकर याने ते स्वतःच्या नावावर करून घेतले होते. विशेष म्हणजे या चारही भावंडांची लग्न झालेली नव्हती. त्यामुळे दिनकरने घर नावावर करून घेतल्यावर कोणी त्याला अडथळे आणले नाही. कारण सर्वजण तिथे एकत्र राहणार होते. पण दिनकरच्या कर्जबाजारीपणामुळे बाकीच्या भावंडांना त्रास व्हायला लागला होता. दिनकर हा सरकारी कर्मचारी होता पण त्याने आपल्या हौशीसाठी अनेक प्रकारची कर्ज घेतलेली होती. कर्ज घेतल्यामुळे वसुलीवाले दारात येऊन उभे राहायचे. घरात दोन बहिणी होत्या. त्यांचे राहणे मुश्कील झालेले होते. म्हणून दिनकरने आपल्या भावंडांना वेगळ्या ठिकाणी राहायला पाठवून हे घर हेवी डिपॉझिटवर भाडे देऊन काही कर्ज कमी करता येईल का हा विचार भावंडांना विश्वासात घेऊन हे घर हेवी डिपॉझिटवर दलालाच्या मार्फत भाड्याने दिले. पण भाडोत्री कशी आहे त्याचा त्यांनी विचार केला नाही. आपल्या भावंडांना दिनकरने सांगितले की, पैसे मिळाले. दिनकरने घराचे मन्टेन्सही भरले नव्हते. ज्यावेळी त्या घरात नवरा, बायको मुलासह तिथे राहायला आले त्यावेळी त्यांना अनेक गोष्टींना सामोरे जावे लागले. विशेष म्हणजे दोघंही नवरा बायको आजारी होते. त्यांचा मुलगा हा मतिमंद होता. तोही तिथे बिल्डिंगमधल्या मुलांना त्रास देऊ लागला होता. दोन्ही नवरा- बायको आजारी असल्यामुळे घरात घाण करत होते. त्याचा त्रास आणि वास बिल्डिंगमध्ये येऊ लागला होता. एवढेच नाही तर या मुलाला बिल्डिंगमधली मुले घाबरून राहू लागले होते. बिल्डिंगचे सेक्रेटरी अध्यक्ष दिनकरला त्या भाडोत्रींना काढून टाका असे सांगू लागले, पण दिनकरकडे पैसे नसल्यामुळे त्यांने अाधीच हेवी डिपॉझिट घेऊन दुसऱ्याचे पैसे दिले होते. त्यातच त्या भाडोत्रीमधला माणूस मृत पावला. त्याच्या पत्नीला माहीत नव्हते कारण तिला डोळ्याने व्यवस्थित दिसत नसल्यामुळे ते तीन दिवस प्रेत घरातच होते. जेव्हा बिल्डिंगमधल्या लोकांना वास येऊ लागला तेव्हा पोलिसांना बोलावले. त्यावेळी समजले की, तो माणूस तीन दिवसांपूर्वीच गेला होता. मग त्यांच्या नातेवाइकांना बोलावून त्यांचे अंतिम संस्कार करण्यात आले. हे सर्व दिनकरला करावे लागले कारण त्यांच्याकडे पैसे नव्हते. बिल्डिंगच्या बाहेर प्रेत काढायला पाहिजे होते म्हणून हे सर्व दिनकरवर येऊन पडले होते. बिल्डिंगमधल्या लोकांनी त्या मुलाला आणि त्याच्या आईला बाहेर काढायला सांगितले. दिनकर आणि त्याचे कुटुंब दलालाकडे जाऊन भेटतात. तुम्ही अाम्हाला भाडोत्री देऊन फसवले असे विचारल्यावर दलालाने हात वरती केला.
तुम्हाला पैशाची गरज होती आणि एवढ्या पैशातून कोण घेऊ शकत नव्हता म्हणून मी दिला. तो मतिमंद मुलगा आपल्या आईवर अनेक अत्याचार करत होता. सकाळ, संध्याकाळ त्यांच्या घरामध्ये भांडण चालू असायची आणि भांडणांमुळे या बिल्डिंगमधल्या रहिवाशांना त्रास होऊ लागला होता. एक महिना झाला नाही तोच महिला मरण पावली. तीही गेली तेही कोणाला माहीत नव्हते. त्यावेळी दिनकरला सर्व करावे लागले. दिनकर या गोष्टीत फसला होता. कारण त्याने आपल्या घरामध्ये हे अशा प्रकारचे भाडोत्री ठेवलेले होते आणि आता तो मतिमंद मुलगा त्या घरात राहत होता. सोसायटीमधले दिनकरला सांगत होते की, त्या मुलाला तरी आता बाहेर काढा. तो मुलगा दिनकरकडे हेवी डिपॉझिट दिलेले पैसे मागत होता. ते पैसे मिळणार नाहीत तोपर्यंत मी बाहेर पडणार नाही असे तो दिनकर आणि सोसायटीवाल्यांना सांगत होता. सदिनकर अगोदरच कर्जात डुबलेला होता आणि त्यात याला पैसे कुठून देऊ असा प्रश्न त्याच्यासमोर होता.
सोसायटीवाले ही रूम खाली करायला सांगत असून सोसायटीवाल्यांनी दिनकर आणि त्या भाडोत्रींच्या विरुद्ध कंप्लेंट केली होती. दिनकरने पैशाच्या हव्यासापोटी भाडोत्री कशा प्रकारचे आहेत हे न बघता आपल्या आई-वडिलांनी घेतलेला रूम भाड्याने दिला आणि तो भाड्याने देताना आपल्या भावंडांना मात्र बेघर करून सोडले आणि इथे भाडोत्री ठेवून त्या भाडोत्रींच्या अंत्यसंस्कारापर्यंत काम या दिनकरवर येऊन ठेपलं. ‘इकडे अाड तिकडे विहीर’ अशी अवस्था दिनकरची झाली होती.
(सत्यघटनेवर आधारित)