इगतपुरी : कसारा घाटामध्ये कंटेनरचे ब्रेक फेल झाल्यामुळे चार वाहनांना धडक दिल्यामुळे तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना (Kasara Accident) घडली आहे. या सर्व जखमींना कसारा येथील प्रथम आरोग्य केंद्र मध्ये दाखल करण्यात आले असून याबाबतचा गुन्हा हा कसारा पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास नाशिकहून कसाराकडे जाणाऱ्या कंटेनरचा ब्रेक अचानक फेल झाला. कंटेनर चालकाने कंटेनर थांबविण्याचा आटोकाट प्रयत्न केला परंतु त्यामध्ये त्याला यश आले नाही. त्याने चार वाहनांना धडक दिली. त्यामध्ये दोन लहान मुलांसह अन्य एक व्यक्ती जखमी झाले आहेत.
कंटेनरची चार वाहनांना धडक लागली. ही धडक इतकी भीषण होती, चारही वाहने चक्काचूर झाले. या अपघातामध्ये कंटेनर ड्रायव्हर आणि एक लहान मुलगा कारमध्ये अडकला होता. त्यांना बाहेर काढण्यासाठी एक तासापेक्षा अधिक वेळ लागला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर महामार्ग पोलीस रूट पेट्रोलिंग टीम त्या ठिकाणी दाखल झाली त्यांनी मोठ्या प्रयत्नानंतर या दोघांना बाहेर काढले.
दरम्यान या अपघातानंतर कसारा इगतपुरी महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.