बाळकुम येथील बंद तरण तलाव खुला करण्यासाठी आमदार संजय केळकर यांचा अल्टीमेटम
- आंतरराष्ट्रीय दर्जाच्या धर्मवीर आनंद दिघे तरण तलावात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आमदार संजय केळकर यांचा आरोप
- तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी उद्घाटन केलेले कलाभवन अनेक वर्षे धूळ खात पडून, अशा अनेक वास्तूंच्या कामात भ्रष्टाचार
ठाणे : बाळकुम येथील धर्मवीर आनंद दिघे तरण तलाव (Dharmaveer Anand Dighe Swimming Pool) मागील दोन वर्षांपासून बंद असून ठाणेकर या सुविधेपासून वंचित आहेत. हा तलाव १ ऑक्टोबरपर्यंत खुला न केल्यास नागरिकांना घेऊन या तरण तलावाचा वापर सुरू करू, असा इशारा आमदार संजय केळकर यांनी दिला आहे.
गेली दोन वर्षे बंद असलेल्या आणि वादग्रस्त ठरलेल्या बाळकुम येथील तरण तलावाची पाहणी आमदार संजय केळकर यांनी अधिका-यांसह केली. ३० कोटी खर्च करून उभारलेल्या या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तरण तलावाचे उद्घाटन २०२२ साली झाले. मात्र यावर झालेला कोट्यवधींचा खर्च आणि कामातील त्रुटी यामुळे यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत होता. शिवाय गेली दोन वर्षे त्याचा वापर करण्यास खुला करण्यात न आल्याने ठाणेकर या सुविधेपासून वंचित राहिले आहेत.
या तरण तलावाच्या कामाची पाहणी आमदार संजय केळकर यांनी गेल्या दोन वर्षांत चार ते पाच वेळा करून अधिका-यांना सूचना केल्या होत्या. तसेच झालेल्या कामांबाबत संशय व्यक्त करून प्रशासनाच्या अक्षम्य दिरंगाईबाबत संताप व्यक्त केला होता.
केळकर यांनी केलेल्या पाहणीत अधिका-यांना चांगलेच झापले. अजून काही त्रुटी शिल्लक असून या कामांबाबतच्या कागदपत्रांची मागणी त्यांनी केली. तसेच येत्या १ ऑक्टोबरपर्यंत हा तरण तलाव खुला करावा अन्यथा नागरिकांना घेऊन त्याचा वापर सुरू करू, असा इशाराच केळकर यांनी दिला.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. कलाल, उप अभियंता रोहित गुप्ता, उपायुक्त मीनल पालांडे, तसेच तरण तलाव विभाग आणि प्रभाग समितीचे संबंधित अधिकारी, भाजपचे रवी रेड्डी, ॲड.हेमंत म्हात्रे, तन्मय भोईर, भानुदास भोईर, भावेश पाटील, अनुराधा रोकडे, मेघनाथ घरात, आदी पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कला भवनचे कुलूप कधी उघडणार?
तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी उद्घाटन केलेले कलाभवन (art gallery) गेली काही वर्षे नादुरुस्त अवस्थेत असून धूळ खात पडले आहे. हे शहर सांस्कृतिक असून येथे अनेक कलाकार आणि कला रसिक नागरिक आहेत. याची दुरुस्ती करून ठाणेकरांना ते तातडीने उपलब्ध करून द्यावे अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी अनेक वेळा केली आहे. अशा अनेक वास्तूंच्या कामात scam होऊन त्या धूळ खात पडल्या असल्याची माहिती आमदार केळकर यांनी दिली.