रवींद्र तांबे
अलीकडच्या काळात आपल्या राज्यात अनेक शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांवर अन्याय- अत्याचार होताना दिसतात. याचा परिणाम विद्यार्थी शाळेत दडपणाखाली वावरत असतात. त्यामुळे यातून विद्यार्थ्यांना मुक्ती मिळावी तसेच अशा शाळेतील प्रकारांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दोन वर्षांपूर्वी सखी सावित्री समितीची स्थापना केली आहे. तेव्हा विद्यार्थ्यांनी आपल्याला शाळेत विनाकारण कोणीही त्रास देत असेल तर या सखी सावित्री समितीच्या निदर्शनात आणून द्यावे, म्हणजे पुढील धोका टाळता येईल. सखी सावित्री समिती म्हणजे शाळेतील मुला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी शालेय स्तरावर स्थापन करण्यात आलेली समिती आहे. तेव्हा शाळेतील घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन समितीच्या सदस्यांनी नि:पक्षपातीपणे काम करणे गरजेचे आहे.
ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरांमधील आदर्श शाळेतील दोन चिमुकल्या मुलांवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर सखी सावित्री समितीची सर्वांना जाग आली. तसे पाहिल्यास राज्यातील शाळांमध्ये सखी सावित्री समिती स्थापन करण्यासाठी १० मार्च, २०२२ रोजी राज्य सरकारने शासन निर्णय निर्गमित केला आहे. मात्र त्याची अद्याप अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी व निकोप आणि समतामूलक वातावरण निर्मितीसाठी शासन स्तरावर सखी सावित्री समितीची स्थापना करण्यात आली आहे, असे शासनाच्या आदेशामध्ये म्हटले आहे. त्यामुळे राज्यातील शाळांनी त्याची त्वरित अंमलबजावणी करावी.
सखी सावित्री समिती
आता शाळेतील मुलांच्या माहितीसाठी आपण सखी सावित्री समितीचा विचार करता या समितीत कोण कोण असतात याची माहिती घेऊ. शाळेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हे सखी सावित्री समितीचे अध्यक्ष असतात तर समितीचे सचिव म्हणून शाळेचे मुख्याध्यापक काम पाहतात. सभासदांमध्ये शाळेतील महिला शिक्षक प्रतिनिधी, समुपदेशक, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ (महिला), अंगणवाडी सेविका, गावचे पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य (महिला), पालक (महिला), शाळेतील विद्यार्थी प्रतिनिधी (दोन मुलगे, दोन मुली) असे अकरा विविध क्षेत्रांतील सभासद असतात. तेव्हा समितीच्या सभासदांनी आपली जबाबदारी ओळखून तसेच कोणत्याही प्रकारे दबावाखाली न राहता समितीचे प्रामाणिकपणे काम करावे.
सखी सावित्री समितीची कामे
शाळेत केवळ समिती स्थापन करून चालणार नाही, तर त्या समितीला दिलेली कामे असतील त्याचा अभ्यास करून त्यांनी आपल्या कार्यकाळात शाळेतील कोणत्याही मुला-मुलींना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. आता सखी सावित्री समितीला कोणकोणती कामे करावी लागतात त्याची माहिती पालक व विद्यार्थ्यांना होण्यासाठी कामाचा आढावा घेऊ. सखी सावित्री समिती ही शाळेतील मुलांची नोंदणी करून त्यांची शाळेतील उपस्थिती १०० टक्के राहील त्या दृष्टीने प्रयत्न करेल. शाळेत न येणाऱ्या मुलांचे सर्वेक्षण करून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणेल. शाळेतील मुला-मुलींना शारीरिक, भावनिक व बौद्धिक विकास होण्यासाठी त्याचप्रमाणे पालक आणि विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी समुपदेशन करावे लागेल. पालकांसाठी खास कार्यशाळेचे आयोजन करणे. शाळेत समताचे वातावरण राहण्यासाठी मुला-मुलींना सर्वसमावेश उपक्रम राबविण्यात यावेत. शाळेमध्ये मुला-मुली कोणत्याही लैंगिक अत्याचाराला बळी पडणार नाही, असे वातावरण निर्माण करणे. शाळेतील मुलांना विविध शासकीय योजनांची माहिती देऊन त्यांचा लाभ विद्यार्थ्यांना कसा घेता येईल त्या प्रकारे प्रयत्न करणे. समितीतील वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ महिला किंवा परिसरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबीर आणि समुपदेशन केले जाते. बालविवाह रोखण्यासाठी मुलांमध्ये जागृती करणे. शाळेतील आर्थिकदृष्ट्या मागास मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदतीविषयी मार्गदर्शन व विविध शासकीय योजनांमार्फत मदत मिळवून देणे.
समजा शाळेतील विद्यार्थ्यांना अत्याचाराबाबत तक्रार दाखल करायची असेल तर योग्य माहिती देणे तसेच महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने तयार केलेल्या ॲपची माहिती व चाइल्ड हेल्पलाईन नंबर १९०८ शाळेच्या सूचना फलकावर लावण्यासाठी शाळेला निर्देश दिले जातात. शाळेच्या दर्शनी भागात ‘सखी सावित्री समिती’चे बोर्ड लावावे अशी सूचना केली जाते. आपल्या राज्यातील वाढत्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवणे बंधनकारक असल्याचे मार्च २०२२ मध्ये तत्कालीन शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी घोषणा केली होती, तर आता शाळेमध्ये सीसीटीव्ही बंद असल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी २० ऑगस्ट, २०२४ रोजी सांगितले आहे. याकडे अधिक लक्ष समितीने द्यावे.
महाराष्ट्र शासनाच्या २०१७ सालच्या शासन निर्णयानुसार शाळेच्या दर्शनी भागात तक्रारपेटी बसवणे आवश्यक आहे. महत्त्वाची बाब म्हणजे तक्रारपेटी दर शनिवारी शाळेचे मुख्याध्यापक, पोलीस प्रतिनिधी, पालक आणि विद्यार्थी प्रतिनिधी यांच्यासमोर उघडण्यात येऊन त्वरित कारवाई करण्यात यावी. आता मात्र तक्रार पेटी रोज उघडावी लागणार आहे. त्याचप्रमाणे शाळेमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीच्या पात्रतेबरोबर त्यांची वैयक्तिक आणि व्यावसायिक पार्श्वभूमी बघणे बंधनकारक असणार आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सखी सावित्री समिती जरी नेमण्यात आली तरी विद्यार्थ्यांनी एकजुटीने राहणे गरजेचे आहे. तसेच एखाद्या सेवकाने गैरप्रकार केल्यास तत्काळ सखी सावित्री समितीच्या निदर्शनास आणून द्यावे. त्यावर समितीने वेळीच ॲक्शन घ्यावी. तेव्हा बदलापूरच्या आदर्श शाळेतील जो प्रकार घडला, त्यामुळे सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे. अशा प्रकारमुळे शाळेतील मुले मानसिकदृष्ट्या खचली जातात. तेव्हा सखी सावित्री समिती राज्यातील शाळांमध्ये स्थापन करून ती कागदोपत्री न राबविता शाळेतील मुला-मुलींच्या सुरक्षितेसाठी राबविण्यात यावी, ही पालक व मुलांची अपेक्षा आहे. त्यासाठी शाळेत स्थापन करण्यात आलेल्या सखी सावित्री समितीने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे करावी.