रोहिणी खडसे यांची रुपाली चाकणकरांवर घणाघाती टीका
जळगाव : एकनाथ खडसे (Eknath Khase) यांच्या कन्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
रूपाली चाकणकर यांनी मुक्ताईनगरमध्ये येऊन राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसेंवर टीका केली. यावरून आता वाक युद्ध सुरू झाले असून रोहिणी खडसेंनी रुपाली चाकणकरांवर घणाघाती टीका केली आहे.
‘रूपाली चाकणकर ह्या बाप बदलणांऱ्या सारख्या आहेत’ असं रोहिणी खडसे यांनी म्हटलं आहे. “रूपाली चाकणकर यांना बाप बदलणं सोपं आहे. आधी पवार साहेबांसोबत होत्या, नंतर अजित पवार. ज्या जनतेने सर्व दिलं, त्या जनतेच्या होऊ शकत नाहीत, त्या आपल्या काय होतील?” अशा शब्दात रोहिणी खडसे यांनी रुपाली चाकणकरांवर टीका केली.
“तुमच्या नेहमीच्या वक्तव्याबाबत खाली येत असलेल्या कमेंट एकदा वाचा. मग तुम्हाला तुमचं अस्तित्व कळेल. ज्यांचं नगरपालिकेत डिपॉझिट जप्त झालंय अशा लोकांचा जनाधारक शिल्लक राहिलेला नाहीय. रूपाली चाकणकरांच्या वक्तव्याला मी फार महत्त्व देत नाही” असं रोहिणी खडसे म्हणाल्या.
“माझ्या वडिलांच्या वारशावर मी सध्या काम करते, याचा मला अभिमान आहे. माझ्या वडिलांचा वारसा घेऊनच मी पुढे गेली आहे. रूपाली चाकणकर ह्या शरद पवार साहेबांच्या आशीर्वादाने सध्या पद भोगत आहेत. शरद पवार साहेबांच्या भरोशावर आतापर्यंत पद यांना मिळत आली आहेत” अशी टीकाही रोहिणी खडसे यांनी केली.
दरम्यान, एकनाथ खडसे म्हणाले की, “रूपाली चाकणकर यांना मी म्हणतो, दुसऱ्यांच्या घरात डोकावणं चांगलं नाही. रूपाली चाकणकर आधी तुम्ही तुमचं स्वतःचं बघा. आधी शरद पवारांकडे तुम्ही होता, नंतर अजितदादांकडे गेलात, तर तुमचं काय?” असे एकनाथ खडसे म्हणाले.