हरियाणात भाजपा देणार २ लाख तरुणांना सरकारी नोकऱ्या, विद्यार्थ्यांना स्कूटर, महिलांना दरमहा २१०० रुपये
काँग्रेस देणार २ लाख तरुणांना सरकारी नोकरी तसेच ५ लाख तरुणांना रोजगाराच्या इतर संधी, शिवाय प्रत्येक कुटुंबासाठी १० लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार
रोहतक : हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी (Haryana Elections) भाजपाने आज, गुरुवारी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. हे संकल्पपत्र पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा आणि मुख्यमंत्री नायब सैनी यांनी रोहतक येथे जारी केले.
भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात हरियाणातील २ लाख तरुणांना सरकारी नोकऱ्या देणार असल्याचे म्हटले आहे. याशिवाय सर्व महिलांना दरमहा २१०० रुपये दिले जातील. तसेच ‘घर गृहिणी योजने’च्या माध्यमातून ५०० रुपयांना सिलिंडर दिला जाईल. पेन्शनमध्ये वाढ केली जाईल, नवीन वंदे भारत गाड्या सुरू करणार, ग्रामीण भागातील प्रत्येक महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कूटर दिल्या जातील, हरियाणाला जागतिक शिक्षणाचे केंद्र बनवणार. याशिवाय इतरही अनेक आश्वासने भाजपाने दिली आहेत.
दुसरीकडे काँग्रेसने हरियाणातील जनतेला ७ आश्वासने दिली आहेत. काँग्रेसच्या संकल्प पत्रानुसार राज्यात सरकार आल्यास महिलांना लाडो लक्ष्मी योजनेंतर्गत २१०० रुपये दिले जातील. शहरी आणि ग्रामीण भागात ५ लाख घरे, एमएसपीवर घोषित झालेल्या २४ पिकांची खरेदी केली जाईल. प्रत्येक कुटुंबासाठी १० लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतील. तसेच ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारांची सुविधा मिळेल. राज्यातील २ लाख तरुणांना सरकारी नोकरी तसेच ५ लाख तरुणांना रोजगाराच्या इतर संधी आणि नॅशनल अप्रेंटिस प्रमोशन योजनेतून मासिक स्टायपेंड दिले जाईल. लहान मागास जातींसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळे बनवणार. निवृत्ती वेतनामध्ये वाढ करणार. दक्षिण हरियाणात आंतरराष्ट्रीय स्तरावरील अरवली जंगल सफारी पार्क बनवणार. देशातील कोणत्याही सरकारी महाविद्यालयातून वैद्यकीय आणि अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या ओबीसी आणि एससी प्रवर्गातील हरियाणातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाईल. त्यासोबतच राज्य सरकार ओबीसी श्रेणीतील उद्योजकांसाठी मुद्रा योजनेव्यतिरिक्त २५ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची हमी देणार असून प्रत्येक जिल्ह्यात ऑलिम्पिकच्या खेळांसाठी प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे.